बहुतेक प्रत्येकाच्या घरी सहजतेने उपलब्ध होणारी वनस्पती, सर्वांच्या परिचयाची कुणी अंगणात,परसबागेत तर कुणी कुंडीमध्ये या कोरफडीला स्थान देतात कुणी या वनस्पतीला सहज म्हणून लावतात तर कुणाला याचे औषधी फायदे सुद्धा माहित असतात. पण साधारणतः प्रत्येकाकडे हि वनस्पती बघायला मिळते.
आज आपण छोटीशी हिरवीगार काटेरी पाने असलेली औषधांचा बहुमूल्य ठेवा स्वतःमध्ये सामावलेली सर्वांना स्वास्थासाठी हितकारक, विशिष्ट गुणांनी युक्त अशा या कोरफडीची माहिती बघणार आहोत.
हिरवी हिरवी पाने, पानांच्या किनाऱ्यावर छोटे काटे पाने हि लांबट असून खोडांभोवती गोलाकार वाढतात,पानांच्या आत पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. या वनस्पतीच्या मध्यातून एक काडी बाहेर येते या काडीला केशरी रंगाची फुले येतात ती दिसायला मनमोहक असतात. याच कोरफडीचा आयुर्वेदामध्ये घृतकुमारी म्हणून संबोधल्या जाते. तसे या वनस्पतीला विविध नावाने सुद्धा ओळखतात. कोरफड, ग्वारपाठा, घृतकुमारी, एलोवेरा इ. या वनस्पतींचा उपयोग विविध औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधने यांमध्ये केल्या जातो. तसेच घरगुती औषधांमध्ये हि कोरफडीचा उपयोग होतो.
आयुर्वेदामध्ये अगणित वनस्पतींचा आरोग्यवर्धक उपयोग सांगितलेला आहे. त्याप्रकारेच कोरफड सुद्धा आयुर्वेदातीलच एक वनस्पती आहे. या वनस्पतीला जास्त जागा लागत नाही आणि विशेष म्हणजे थोड्याश्या पाण्यावरही या वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. कुंडी मध्ये टांगून सुद्धा ठेवलं तरी हि वनस्पती त्यात पण वाढते.
दैनंदिन जीवनात आपण या अमूल्य संजीवनीचा आपल्या स्वास्थासाठी कसा उपयोग करू शकतो ते आपण आज बघुयात.
मूळव्याध अति भयंकर त्रास या त्रासांमध्ये कोरफडचा ताजा गर नुसता ठेवला तरी दाह कमी होण्यास मदत होते व आराम मिळतो.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्टापासून आराम मिळतो.
डोळ्यांची आग उन्हाळ्यात जास्त जाणवते किंवा वेल्डिंग सारख्या प्रखर प्रकाशाकडे बघितल्यास डोळ्यांमध्ये आग होते अशावेळी कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यात होणारी आग कमी होण्यास मदत होते.
शरीरावर कुठे चटका लागला, करपल तर यावर त्वरित उपाय म्हणून कोरफड लावावे आग कमी होण्यास मदत होते.
काही दिवस कोरफड सेवन केल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होते.
रोज कोरफडीचा चमचाभर गर घेतल्यास पाळी नियमित येण्यास मदत होते.
कोरफडीमध्ये अँटि-फंगल गुणधर्म असतो. त्यामुळे योनीमार्गाजवळ झालेल्या इंन्फेक्शनमुळे होणारी जळजळ, खाज व दाह कमी होण्यास मदत होते.
अंघोळीच्या अगोदर कोरफडीचा गर काढून त्याचा रस केसांना लावल्यास केस निरोगी होण्यास मदत मिळते.
त्वचेवर रोज कोरफडीचा गर लावल्यास त्वचा सतेज राहण्यास मदत मिळते. कोरफडीमध्ये एंटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या यामुळे कमी होण्यास मदत होते. तसेच कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड बरे होतात.
ताज्या कोरफडीचा रस नियमित पिल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत मिळते.
सर्दी-खोकला झाल्यास त्यावर घरगुती उपाय म्हणून कोरफडीचा रस हा उत्तम पर्याय आहे.
तसा हा कोरफडीचा रस खूप कडू चवीचा असतो लवकर पिल्या जात नाही पण रोजच्या सवयीमुळे ते शक्य होऊ शकते.
सांधेवात हि वृद्धावस्थेत जाणवणारी समस्या या समस्येवरही कोरफड फायदेशीर ठरते.
हिरड्यांना आलेली सूज, दात निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा कोरफडीचे सेवन करणे हितावह आहे.
तोंड आलेले असल्यास सुद्धा कोरफडीचा वापर आरामदायक असतो.
कोरफडीचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आहे.
कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा कमी होतो.
उटण्यामध्ये या कोरफडीचा वापर होतो. त्वचेसाठी जणू वरदानच आहे कोरफड.
गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने चमक येते.
अशाप्रकारे भरपूर उपयोग आहेत या अमूल्य कोरफडीचे हि विशेष गुणधर्माची आहे.या वनस्पती पासून विविध औषधे बनतात शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. केसांच्या समस्यांसाठी कोरफडीचे तेल केसांना निरोगी ठेवते केसांना चकाकी आणते. त्वचेला दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यांवरसुद्धा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुले झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी पडतो. सौदर्यवृद्धीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात.
चला तर मग आजपासून आपण सुद्धा एक तरी कोरफड आपल्या परसबागेत लावूयात व या निसर्गाच्या अमूल्य औषधींचा आपल्या स्वास्थाकरिता उपयोग करूयात.
औषध म्हणून कोरफडीचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.