विविध गुणांनी युक्त एक कल्पवृक्ष- कडुनिंब

कडुनिंब हा वृक्ष आपल्या सर्वांचा परिचयाचा. आपल्या कडे सर्वत्र सहजच उपलब्ध होणारा. रस्त्याच्या कडेला, शेतात, जंगलात, तर अंगणात सुद्धा याने स्थान प्राप्त केलेले आहे. या जंगलातील वृक्षाला घराच्या परिसरात अंगणात स्थान प्राप्त झाले ते याच्या विशिष्ट गुणांमुळेच. तर आज आपण या कल्पवृक्षाची माहिती व गुण तसेच याचा औषधी उपयोग पाहणार आहोत.
कडुनिंब हा अंदाजे ३०-४० फूट सहज वाढणारा दाट सावली देणारा वृक्ष आहे, त्याची हिरव्या रंगाची करवतीसारखी पाने, आणि सुगंधित पांढऱ्या रंगाची इटुकली-पिटुकली फुले या वृक्षाचे सौंदर्य खुलवतात. याची फळे हिरव्या रंगाची व पिकल्या नंतर पिवळ्या रंगाची, कडू चवीची फळे असतात. हि निंबोळी म्हणजे लहान मुलांचा खेळातील आंबा.
या झाडाची निर्मिती बऱ्याच ठिकाणी नैसर्गिकरित्याच होते. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत .
विविध गुंणांनी युक्त असा हा वृक्ष. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. या पासून उत्तम प्रकारचा डिंक मिळतो. याच्या अनेक गुणांमुळे हा सर्वांचा आवडता आहे. हा जंतुनाशक असल्यामुळे मनुष्य, पशु, पक्षी, पीक, इ. सर्वांच्या उपयोगाचा आहे. धार्मिक दृष्टीने गुढीपाडवा हा महत्वपूर्ण दिवस आहे. साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आणि नववर्षारंभ या दिवसापासून होतो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सेंधव मीठ, ओवा, गूळ, हिंग, हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खाल्ल्या जाते. गुढी उभारताना गुढी वर याचा वापर करतात. तसेच गुढीला कडूनिंबाची डहाळी लावून त्याची पूजा करतात.. घरातील थोर-मोठी लोक नेहमीच सांगत असतात हा वृक्ष म्हणजे ब्रम्हदेव आणि जगन्नाथाचे प्रतिक आहे तसेच कालीमाता आणि दुर्गामाता यांनाहि तो प्रिय आहे.यावर भैरवाचा निवास असतो. या वृक्षात परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. हे झाड तोडणे म्हणजे एकाद्या तरुण मुलीची हत्या करण्या इतके अशुभ मानतात. ग्रामदेवतेच्या पूजेत या वृक्षाच्या डहाळ्याना विशेष महत्व आहे. या झाडाचे सरपण करून त्यावर शिजवलेले अन्न खाणाऱ्या माणसाला सापाचे विष चढत नाही असे म्हणतात. असे ऐकण्यात आहे.
तसेच या झाडाचे लाकूड टिकाऊ असते इमारती साठी याच्या लाकडाचा उपयोग होतो. तसेच शेतीची अवजारे तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. झाडाच्या फळांपासून तेल काढतात आणि उरलेला चोथा झाडांना कीड लागू नये म्हणून मातीत मिसळतात. तसेच. धान्याला कीड लागू नये म्हणूनही ह्याची पाने धान्यात घालतात. हि पाने जाळल्यास त्या धुराने डास मरतात. घराच्या बांधणीत दारे किंवा खिडकीच्या चौकटीत या लाकडाचा उपयोग करतात कारण त्यामुळे अनिष्ट शक्ती दूर राहते असा समज आहे.
तसेच साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने अशा विविध गोष्टींसाठी कडुनिंबाचा वापर होतो. यापासून विविध औषधी बनवल्या जातात.
रोजच्या दैनंदिन जीवनातील याचे महत्व:
अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आजही बहुतेक ठिकाणी सकाळी दात घासण्यासाठी याच्या काडीचा वापर होतो. याने दात व हिरड्या मजबूत होतात.
कडुनिंबाची पाने रोज चावून खाल्ल्यास शरीराला फायदा होतो याने रोगप्रतिकार शक्ती वाढते असे म्हणतात.
कडुनिंबाच्या पानांचा रस घेतल्यास रक्तर शुद्ध होते. मान्य आहे हा रस अतिशय कडू असतो, पण निरोगी आरोग्यासाठी याचा उपयोग अवश्य करायला हवा.
कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील कफ कमी करण्यास मदत होते. तसेच श्वसना संबंधित विकारांवर याचा उपयोग होतो.
पोटाच्या विविध आजारांवर कडुनिंब उपयोगाचा ठरतो.
मधुमेहसाठी तर उत्तमच शर्करा नियंत्रण ठेवण्याचे काम करतो.
चांगल्या प्रकारे अग्निप्रदीपक आणि पाचक असणारा कडुलिंब ताप, विषमज्वर, दाह, जखम, इ. अनेक रोगांवर गुणकारी आहे.
जंतूनाशक म्हणून ओळखल्या जाणार्याि कडुनिंबाच्या प्रथिनांचा वापर कर्करोगावर नियंत्रण आणण्यासाठी देखील होतो.
याच्या फळांमधून तेल निघत ते जंतू नाशक असते व्रण, खरूज, इ. त्वचाविकारांवर तसेच संधिवातावरही गुणकारी आहे.
सांधेदुखीवर याच्या तेलाने मालिश केल्यास आराम मिळतो.
याच्या पानांच्या अति सेवनामुळे कामवासना कमी होते.
याच्या सालीचा उगाळून केलेला लेप सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर उपयुक्त आहे म्हणूनच याचा वापर उटण्यांमध्ये करत असावा.
रक्तअशुद्धी करणारा हा रस प्यायल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांपासूनही सुटका होते.
याची पाने पाण्यात टाकून उकळल्यास व त्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा रोग दूर होतात.
केस गळत असल्यास कडुनिंबाचा वापर करावा.
कावीळ झालेल्या रुग्णाला सुद्धा कडुनिंबाचा रस दिल्या जातो.
अश्या विविध गुणांनी युक्त हा कल्पवृक्ष आहे तरी प्रत्येकाने घराच्या परिसरात याला स्थान दिले पाहिजेत आणि एक तरी वृक्ष जोपासला पाहिजेत. आज काळाची गरज आहे वृक्ष जगवणे…. म्हणून आजच सुरुवात करा आणि वृक्ष हेच मित्र समजून यांचे संघटन करा हेच वृक्षांचे संघटन उद्याच्या पिढीला सहाय्यक ठरेल.