ऐतिहासिक : बाळापूर किल्ला

Buldhana district official website

आपल्या बुलडाण्यापासून जवळच असेलला बाळापूर किल्ला आपण बघितलाच असेल. अकोला जाताना खामगाव सोडल्यावर किंवा अकोल्यावरून येताना एस टी बाळापूरला थांबते तेव्हा आपल्या दृष्टीस हा गड पडतो. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूर येथे हा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूर किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे. या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजाग पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.