स्त्रियांचे ते अवघड दिवस म्हणजे पाळी.. तीच ती. एमसी.. पीरियड.. प्रॉब्लेम.. अडचण.. विटाळ.. कावळा शिवणे.. बाहेर बसणे.. महिना.. मासिकपाळी.. वयात आल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात घडणारी एक सर्वसामान्य घटना.. असंख्य अंधश्रद्धा, भ्रामक कल्पना, भीती, गुप्तता, लाज, शरम यांच्या काटेरी कुंपणात जखडलेली.. स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत खासगी किंवा खरं तर गुप्तच मानला जाणारा हा विषय
मासिकपाळी सामान्यपणे प्रत्येक स्त्रीमध्ये दर २८ दिवसांनी मासिकपाळी येते मासिकपाळी संपल्यानंतर दोन आठवड्यांनी अथवा पुढची पाळी येण्याअगोदर दोन आठवडे स्त्रीचे बीजांड परीपक्व होऊन बीजपुंजापासून अलग होते.
मासिक पाळी (MC)म्हणजे काय?
मुलगी वयात आल्यावर दर महिन्याला योनीमार्गातून साधारणतः ३ ते ५ दिवस रक्त जाते.या शारीरिक क्रियेला मासिक पाळी असे म्हणतात. या काळात गर्भाशयातील त्वचेचे अस्तर बाहेर फेकले जाते.तसेच स्त्री बीजाचा पुरुषाच्या शुक्रजंतूशी संयोग न झाल्यास ते बीज शरीरातून बाहेर फेकले जाते. मासिक पाळीचे हे चक्र २८ ते ३५ दिवसांचे असते. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना गर्भाशयाच्या आकुंचन प्रसारणामुळे काही स्त्रियांना पोटदुखी व कंबरदुखीचा त्रास होतो.
मासिक पाळीत घ्यावयाची काळजी
मासिक पाळी चालू असताना आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता पाळणे अतिशय महत्वाचे ठरते. तसेच फार काळ रक्त साचू देता कामा नये त्यात रोगजंतू वाढून जननइंद्रियांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. हे होऊ नये यासाठी स्वच्छ ,कोरडे कपडे वापरावेत. तसेच पुरेसा आहार, विश्रांती व मानसिक स्थिती चांगली ठेवावी.
घरातील मोठ्या स्त्रियांचे मार्गदर्शन कसे असावे ?
आयुष्यातील हि सर्वात मोठी घटना त्यामुळे ती घाबरलेली असते. त्यामुळे सर्वप्रथम तिची भीती कमी करायला पाहिजे. तिला उचित मार्गदर्शन करायला पाहिजेत, स्वतःचे अनुभव तिला सांगायला पाहिजेत. हे प्रत्येकीलाच होते यात घाबरण्यासारखे काहीही नाही असे पटवून देणे आवश्यक. स्वच्छ कापड, सॅनेटरी नॅपकिन्स त्यांचा नीट वापर कसा करावा हे सांगायला पाहिजे. हा कुठलाही आजार नसून हा मासिकधर्म आहे. तू आता मोठी झाली आहेस. तू आता चांगलं वागायला पाहिजेत तसेच विशेष काळजी कशी घ्यावी हे समजून सांगायला हवे.
मासिकपाळी येणे शाप की वरदान ?
वंश चालवण्यासाठी महत्वाचे योगदान स्त्रीचेच असते. आणि हे नैसर्गिक आहे. प्रकृतीचाच नियम आहे. मासिकपाळी सुरु झाली म्हणजे मुलगी वयात आली असे समजले जाते. मुलीची माता बनण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी सुरु झालेली असते. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील ती एक अतिमहत्त्वाची घटना असते. आणि याच मासिकपाळी नंतरच मुलीचा विवाह होतो व योग्यवेळी तिला मातृत्व प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच मासिकपाळी हि नैसर्गिक क्रिया आहे. याला शाप म्हणणे योग्य ठरणार नाही.
मासिक पाळी विटाळ नव्हे
योग्य माहिती नसली की त्या मुद्द्याभोवती अनेक गैरसमजुती तयार होतात. स्त्रियांना येणा-या मासिक पाळी बाबतीत ही समाजात अनेक गैरसमजुती आहेत. मासिक पाळीत स्त्रीला विटाळ मानले जाते परंतु मासिकपाळी ही स्त्रीला प्रजननक्षम करणारी शरीरातील केवळ एक क्रिया आहे. मासिकपाळीत पुरुषाच्या शुक्रबिजाशी संयोग न झाल्याने निरुपयोगी ठरलेले स्त्रीबीज व अस्तर शरीराबाहेर टाकून दिले जाते. त्यात अमंगल असे काहीच नसते. या काळात स्त्रीने स्वयंपाकघरात जाऊ नये, पाणी भरू नये, घरात एका बाजूला बसून राहावे नाही तर पाप लागते,असे म्हटले जाते. या सगळ्या प्रथांमागे दोन महत्वाची कारणे दिसून येतात ती म्हणजे, आपली पुरुषप्रधान संस्कृती, पूर्वी लोक फारसे शिकलेले नव्हते त्याना शास्त्र माहित नव्हते, तसेच शास्त्रीय कारणे पटवून देण्यापेक्षा पाप पुण्याची भीती घातली की गोष्टी नक्कीच केल्या जातात. या काळात कामे करू नये म्हटले की आपोआपच बायकांना आराम करता येतो. परंतु सध्याचे धकाधकीचे राहणीमान, छोटी कुटुंबं पाहता स्त्रियांना ना कंपनीतून चार दिवस सुट्टी मिळणार ना घरातून. त्यामुळे काळानुसार या रूढी बदलणे ही काळाची गरज आहे.