बुलडाणा जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेले आगार म्हणजे मलकापूर आगार. मलकापूर बस स्थानकाहून राज्यभरात अनेक बसेस सुटत असतात. लांब पल्ल्याच्या फेऱ्यासाठी मलकापूर आगार ओळखल्या जाते. फलटण (सातारा) पासून तर देवास, नांदेड पासून मुंबई पर्यंत मलकापूर आगारातून बसेस उपलब्ध आहेत. परंतु बस स्थानकाची अवस्था मात्र लाजिरवाणी झाली आहे.
मलकापूर बस स्थानकातून दिवसभरातून अनेक बसेस धावत असतात तर विदर्भ आणि खान्देश ला जोडणारे महत्वाचे ठिकाण आहे. याशिवाय मध्य प्रदेश कडे आणि मराठवाड्यात जाण्यासाठी बस स्थानकावर तोबा गर्दी असते. असे असले तरी अनेक वर्षांपासून या स्थानकाचा कायापालट होत नाही. कुणी बस स्थानकाकडे लक्ष देत नाही आहे. एक तर बसेस ची गर्दी आणि त्यातही फलाट संख्या कमी आहे. त्यामुळे बसेस इतर ठिकाणी उभ्या असल्याचे चित्र पहावयास मिळते. येथील फरशी आणि फ्लोरिंग सुद्धा उखडले असल्याने बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. सोबतच प्रवाशांसाठी उभारलेले गेलेले ‘उपहार गृह’ सुद्धा कसे तरी थोड्याशा जागेत ठाण मांडून बसले आहे. एकंदरीत मलकापूर आगारचा व्याप बघता बस स्थानकाचे नूतनीकरण करणे गरजेचे झाले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या मलकापूर आगाराचा कायापालट कधी होणार याकडे प्रवाशी जनतेचे लक्ष लागून आहे. अनेक जण बुलडाणा ते मलकापूर रोज प्रवास करीत असतात. त्या प्रवाशांशी संवाद साधल्यावर त्यांनी बस स्थानकाच्या परिस्थिती विषयी नाराजी व्यक्त केली.
बस स्थानकाची जी दुरवस्था झाली आहे. त्या कडे कुणी तर लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.