• Home  
  • परिसीमन विधेयकावरून महाविकास आघाडीत खळबळ; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर काँग्रेस व विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- राजकारण

परिसीमन विधेयकावरून महाविकास आघाडीत खळबळ; शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर काँग्रेस व विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई (MH28.in Buldana News): प्रस्तावित परिसीमन (Delimitation Bill) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पाठिंबा दिल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या चर्चांनंतर काँग्रेस पक्षाने तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. […]

ncp supports delimitation bill

मुंबई (MH28.in Buldana News): प्रस्तावित परिसीमन (Delimitation Bill) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पाठिंबा दिल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या चर्चांनंतर काँग्रेस पक्षाने तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. आगामी संसदीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या वादामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत मार्च २०२६ मधील राज्यसभा निवडणुकीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्या वेळी महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक झाली होती आणि एका उमेदवारासाठी ३६ मतांचा कोटा आवश्यक असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतर राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी सकारात्मक भूमिका घेत स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवला आणि काँग्रेसच्या १६ आमदारांसह महाविकास आघाडीच्या पाठिंब्याने शरद पवार यांना वयाच्या ८५ व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यात आल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच नेते आणि पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार असतील तर ही बाब धक्कादायक असल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे.

डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊतांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; म्हणाले, ‘तर हा निर्णय दुर्दैवी’

डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने पाठिंबा दिल्याच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विविध पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राऊत यांनी डिलिमिटेशन विधेयकावर जोरदार टीका करत हे विधेयक लोकशाहीचा गळा घोटणारे असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सध्या असलेल्या ५४३ खासदारांच्या जागी ८६० खासदार करण्याचा प्रस्ताव असून, त्यानंतर मतदारसंघांची पुनर्रचना सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार केली जाऊ शकते. या माध्यमातून जनतेच्या हातातील सत्ता काढून घेण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी भाजपच्या निवडणुकीतील विजयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आतापर्यंत भाजपने मिळवलेले विजय हे गुणवत्तेच्या किंवा जनतेच्या खऱ्या मतदानाच्या जोरावर मिळालेले नसल्याचे राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने खरोखरच या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो पक्षाच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरेल, अशी टीका त्यांनी केली. तसेच, अशा निर्णयानंतर कोणत्याही पक्षाने महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करू नये, असे परखड मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. डिलिमिटेशन विधेयकावरून संजय राऊत यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील राजकीय चर्चांना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

ध्रुव राठी (Dhruv Rathee) च्या अडचणीत वाढ; दिल्लीच्या साकेत कोर्टाकडून जमानती वॉरंट जारी

विजय वडेट्टीवारांचा घणाघात; सत्तेसाठी भूमिकेचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांचे वय ८६ वर्षे असून त्यांनी आपले आयुष्य पुरोगामी विचारात घालवल्याचे सांगितले जात असले, तरी या पक्षाला सत्तेशिवाय जगणे मान्य नसल्याचा आरोप त्यांनी केला. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार टिकावा या भावनेतून आम्ही सर्व मिळून त्यांना ८५ व्या वर्षी राज्यसभेवर पाठवले, मात्र त्यांच्या भूमिकेमुळे वैचारिक तडजोड होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

परिसीमन प्रक्रियेमुळे भविष्यात लोकशाही आणि संविधानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करताना वडेट्टीवार यांनी १० आमदारांच्या जोरावर मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा ठेवणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या अलीकडच्या राजकीय भेटीगाठी आणि प्रवासाचा संदर्भ देत, सत्तेत जाण्याची आणि मंत्री होण्याची इच्छा यामागे असल्याचा दावा त्यांनी केला. पक्ष फुटण्याच्या भीतीतून हा निर्णय घेतला जात असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना, सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचा निर्णय हा अनेक दिवसांपासूनचा आणि दोघांमध्ये घरातच झालेला निर्णय असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign