शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना- अजिंठा लेणी

tourist spot near buldana

जगविख्यात असलेली अजिंठा येथील लेणी पर्यटकांचे आवडीचे स्थान राहील आहे. देशविदेशातून हजारो लोक याठिकाणी भेट देत असतात. बुलडाणा पासून फक्त ५0 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोणत्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.

अजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे. औरंगाबादहून दिवसभर बसेस असतात. तसेच बुलडाणा येथून सुद्धा जाण्यासाठी भरपूर बसगाड्यांची सोय आहे. अजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. याशिवाय वेरुळयेथील लेणी सुद्धा अप्रतिम आहेत. वेरुळहे औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत आहे. दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशातील एकमेव लेणी आहे.