अष्टांग योग

मागील भागात आपण अष्टांग योग मध्ये आठ अंग पाहिले होते
१) यम २) नियम ३) आसन ४) प्राणायाम ५) प्रत्याहार ६) धारणा ७) ध्यान ८) समाधी
हे पतंजली योगसूत्राचे आठ अंग आहे. याची आणखी परिपूर्ण माहिती, त्यातील काही उपांगे व त्यांची ओळख आज आपण पाहूयात.

१) यम – चा अर्थ ‘निग्रह’ करणे होते. निग्रह म्हणजे स्वतःला बंधन घालणे, कुठले कार्य न करणे असा होतो. यम हे पाच आहे. योगसूत्रानुसार हे जीवनात आणणे फार आवश्यक आहे.
१) अहिंसा – म्हणजे मन, वाचा व कर्माने कोणाला आपल्या कडून त्रास न होऊ देणे म्हणजे अहिंसा होय.
२) सत्य – म्हणजे मनात जे आहे, डोळ्यांनी जे पहिले व कानाने जे ऐकले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे सत्य होय.
३) अस्तेय – म्हणजे मन, वचन व कर्माने चोरी न करणे तसेच दुसऱ्याच्या संपत्ती, वस्तू व अधिकारांचा लोभ न करणे (इच्छा न करणे) अस्तेय होय.
४) ब्रम्हचर्य – म्हणजे सर्व इंद्रिये व विषय-विकार यांवर संयम करणे म्हणजे ब्रम्हचर्य होय.
५) अपरिग्रह – म्हणजे पैसा, संपत्ती यांचा संग्रह न करणे तसेच भोग-विलास अश्या गोष्टींचा त्याग करणे हेच अपरिग्रह होय.

२) नियम – यात पण पाच गोष्टींचा सहभाग आहे त्याचे जीवनात पालन करणे आवश्यक आहे.
१) शौच – म्हणजे शरीर व मनाची शुद्धता (पवित्रता) होय.
२) संतोष – म्हणजे अनुकूल व प्रतिकूल परिस्थिती मध्ये प्रसन्न चित्त राहणे हेच संतोष होय.
३) तप – म्हणजे थंडी असो वा गर्मी, सुख असो कि दुःख अश्या कुठल्या हि परिस्थितीत तन व मनाने करण्यात येणारी अखंड साधना हेच तप होय.
४) स्वाध्याय – विचारांच्या शुद्धीते करीता व ज्ञान प्राप्ती करीता जे आत्मचिंतन केले जाते त्यास स्वाध्याय म्हणतात.
५) ईश्वर प्राणिधान – मन, वाचा व कर्माने ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे म्हणजे ईश्वर प्राणिधान होय.

३) आसन – ज्या स्थिती मध्ये शरीर स्थिर व त्या स्थिती मध्ये मनाला सुख व शांतीची अनुभूती होते त्या स्थितीला आसन म्हटल्या जाते. आसन केल्याने शरीरातील नस-नाड्यांची शुद्धी होते त्यामुळे आपले स्वास्थ चांगले राहते, तन व मन प्रसन्न राहते. नियमित योगाभ्यास केल्यास शरीर शक्तिशाली व निरोगी बनते.

४) प्राणायाम – योगिक क्रिये मध्ये प्राणायाम हा सर्वात महत्वाचा भाग आहे. ‘प्राणायाम’ म्हणजे आपल्या श्वासावर नियंत्रण करणे होय. प्राणायाम केल्याने आपला श्वास संतुलित व नियमित होतो. बाह्यशरीर जसे शुद्ध ठेवावे लागते तसेच मनाच्या शुद्धतेसाठी प्राणायाम आवश्यक आहे.

५) प्रत्याहार – इंद्रिय काम-विकार, भोग-विलासाकडे घेऊन जातात या विकारांपासून मनाला मुक्त करून मनाला अंतर्मुखी करणे म्हणजे प्रत्याहार होय.

६) धारणा – मनाच्या एकाग्रतेलाच धारणा म्हटल्या जाते.

७) ध्यान – मन धारणा करून कुठल्याही एका ठिकाणी स्थिर होणे या क्रियेला ध्यान म्हटल्या जाते.

८) समाधी – ध्यानाच्या अति उच्च अवस्थेला प्राप्त करणे म्हणजे समाधी होय.