दानवीय असुरी शक्ती झाली नतमस्तक

वेशीवरच भूत अंतिम भाग
गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. तरी तिथे दानवीय शक्ती वावरत होती आणि सर्व लोक त्या अमानवीय शक्ती चा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे.

तसे विराट बोलला कोण हाये बे तो धिप्पाड पोऱ्या अन तुले कसा काय वयखते ? किशोर म्हणे अबे मले काय माहित कोण हाये तर मले त आज या भूतायन मांगचा जनम भी सांगितला की मले दोन भाऊ होते अन मोठा भाऊ राज्या होता अन लहाना भाऊ बिघडेल होता पण मले थोडी आठवते मांगचा जनम अशीन भी.. नशीन भी. नाहीतन हे भूत खोट बोलत असतीन आपल्याले फिरवत असतीन यायची प्रवृत्तीच आहे ती. तिकडे भूत आणि त्यांचे राक्षस कोणी आकाशी पाळण्यात तर कोणी कुठ जाऊन बसले. आणि युद्धाची तयरी करू लागले. महादू बुआ बोलले काय होवून रायले हे सायाचे काहीच समजून नाई रायल मले…. माय त डोक्स बंद बधीर झाल लेक हो. मांगच्या जन्मी काय पाप केलत की हा दिवस पाह्याले भेटला…!!
सुन्या बोलला आपल्या सगळ्यांची पळता भुई थोडी झालेली आहे……टांगा पलटी अन घोडे फरार अशी अवस्था त्यात आपुन सगळ्यांन जगण्याची आशा सोडलेली. सर्वांना कळून चुकले आज की आज आपली विकेट पडणार कुणाची आधी त कुणाची नंतर… पण नक्कीच पडणार रे भो.. जीव जाते आज आपला.
जाक्र्या म्हणे मले फकत अठीसाक तो पोऱ्या लय पटला…. वीराट्या बोलला कोनसा बे तोच धिप्पाड पोऱ्या…..किशऱ्याले कसा म्हणे मेरे यार….. मेरे भाई…. मेरे दोस्त अन गपागप बाटलीत भूत कोंबे.
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली. तसे सर्व ओरडायला लागले. बुडा रगत ओकू लागला. त्याले वाचवणार तितक्यात जाक्र्याच्या कानाखाली कोणी मारली अन जाक्र्या बेशुद्ध पडला. सगळे सैरा वैरा पळू लागले. आणि महादू बुआ पळत असताना एका भुताने बुआ चा पाय पकडला अन फेकल बुआले बुआ पडला कुपात जाऊन. साऱ्या अंगात काटे घुसले. सोपान्याच्या पायाचे लचके कोल्हे तोडत होती… महाभयंकर तो आवाज आणि सगळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. रात्रीचे अडीच वाजले असावेत असे मन्या बोलला. आज आपण वाचणार की नाही हे तर माहित नाही पण इकडे तिकडे पळाल्या पेक्षा यांच्याशी दोन-दोन हात करूनच मरू. किशऱ्या म्हणे बरोबर आहे मन्याचे हि वेळ इकडे तिकडे पळायची नाही हि वेळ आहे एकत्र येण्याची आणि गुरुमंत्राचा जप करण्याची किशऱ्याने सर्वांना एकत्रित केले आणि सर्व एकाजागी बसून नामजप करत होते तेव्हा त्यांना कळल की असे केले की आपल्याला कुणी मारत नाही. आणि ते तेच करू लागले. आणि होत असलेल्या वेदना सहन करू लागले.
आणि त्यांची प्रतीक्षा संपली तिथे दत्ताआबा पोहचले.
त्यांनी सर्वात आधी गावकऱ्याना सांगितले की मी जसे सांगतो तसे करा. इथे मोठमोठी राक्षस, असुर, दैत्य, दानव उपस्थित आहेत. त्यामुळे थोडीशी चूक सर्वांचा अंत करु शकते. आबांनी सर्वांच्या बाजूला एक रिंगण आखले व सर्वांना सांगितले की या रिंगणाच्या बाहेर कोणी निघणार नाही. आणि सर्व लोक त्यात बसलीत आणि दत्ताआबा रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्या धिप्पाड पोराला व दाढी वाल्या बुआ ला काहीतरी सांगत होते हे तीघ तिथे उभे राहून यांनी त्या राक्षसराजला चुनोती दिली आणि आबा ने शंख वाजवला तसे राक्षसांनी सुद्धा किंचाळायला सुरुवात केली आणि यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले ते एकमेकांवर वार करू लागलेत राक्षस चमकणारे गोळे फेकत होता तसे आबा त्यावर भस्म फेकत होते. असे हे खूप वेळ चालले… तिकडे धिप्पाड पोरगा भूत बाटलीत कोंबे…दाढी वाला बुआ त्या चूडेल, डाकिन. आग्या, वेताळ यांच्यावर धावून जाये. किशऱ्याला व बाकी रिंगणात बसलेल्याना काम दिल होत की गोवऱ्या जाळायच्या व सर्वत्र धूर करायचा. त्यात थोडे जडीबुटीची पावडर टाकायची. सर्व धूर करण्यात व बघण्यात मग्न होते सर्वांना छोटे छोटे कापडांचे तुकडे दिले होते ते सर्वांनी मनगटावर बांधले व सर्वांनी जोरजोरात ईश्वराचा नामघोष सुरु केला सर्व भूत प्रजाती हतबल झाल्या…. सर्व दत्ताआबाला विनवणी करू लागल्या की आम्ही परत अशे शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. खोट-नाट बोलून लोकांना फसवणार नाही आणि आजच्या सारखे कुणाला कधीच त्रास देणार नाही. आम्ही शरण येतो आम्हाला क्षमा करा. तुमची शक्ती आमच्या पेक्षा महान आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही परत गावावर आमची छाया पडू देणार नाही. आम्ही जंगलातच भटकत जाऊ. आम्ही जेवढ्या लोकांना त्रास दिला पछाडल त्यांना सोडून देतो. पण आम्हाला आमची हि सजा पूर्ण करू द्या. नाहीतर विधाता रागवेल. शेवटी आबा बोलले की या वेशीवरच्या भूतामुळे आमचा सर्वांचा लाडका दिप्या गेला त्यामुळे मी या भुताला क्षमा नाही करू शकत आणि आबाने वेशीवरच्या भुताला नष्ट केल. किशाऱ्या व सर्व दिप्या गेल्यामुळे शोक करू लागलीत व सर्व स्वताला दोष देऊ लागली…आबा बोलले पोर हो तुमच्या क्षणिक सुखाच्या नादात तुमच्या व्यसना पाईच आज दिप्या गेला. पण दिप्या काही काळानंतर परत येईल जनम घेऊन. राक्षसराज ला सुद्धा पश्चाताप होत होता. आबा बोलले की राक्षसराज तुम्हाला खरोखर तुमची चूक मान्य झालेली दिसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा अधर्माने कितीही पायमूळ पसरली तरी धर्माला ती परास्त करू शकत नाही. असत्य कितीही हुशारीने बोला ते सत्य लपवू शकत नाही. आबा लोकांना उद्देशून बोलले की लोकहो क्षणिक सुख शेवटी क्षणिकच असते. ते परम शांती कधीच देऊ शकत नाही.
किशोर बोलू लागला त्याने आबाचे पाय पकडले व क्षमा मागू लागला आणि बोलला मी आज तुम्हाला व सर्वांना साक्षी मानून शपथ घेतो की आजच्या नंतर कोणत्याच गलत गोष्टीत मन ठेवणार नाई. अन आबा जे सांगतात तेच करत जाईन. व किशोर ने शपथ घेतली. आबाला त्यांची नम्रता पाहून चांगले वाटले व आबाने किशोरला सांगितले की बाळ किशोर रडू नकोस शोक आवर स्वताचा एक दिवस हा दिप्या परत येईल दुसऱ्या कुठे तरी जनम घेऊन…आणि तुला तो परत मिळेल. तेव्हा त्याचा खूप लाड कर…आणि आज जे घडले असे कधी कुणासोबत घडणार नाही यावर कार्य कर…यालाच ध्येय समज आणि रक्षणकर्ता हो..! परत एकच सांगू इच्छितो हा तमाशा एक क्षणिक सुख आहे… आणि तुम्ही शहाणे असते तर तुम्ही त्याची पायरी चढले नसते. व्यसन हे कोणतेही असो ते शेवटी घातच करते म्हणून आजच याच ठिकाणी किशोर ने घेतली तशी शपथ घ्या की कुठल्याही क्षणिक सुखाच्या नादाला लागणार नाही आणि कुणाच्याही सांगण्यावरून कोणतच व्यसन करणार नाही. एवढी मोठी राक्षसांची, भूतांची प्रजाती त्यांच्या फालतूच्या अहंकारा पायी नष्ट होणार होती. ईश्वराला शरण जा….त्याची महिमा खूप मोठी आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच मी आज तुम्हा सर्वांचा जीव वाचवू शकलो आणि शेवटी अमानवीय शक्ती दैवी शक्तीच्या पुढे हरली आणि नतमस्तक झाली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

काका आणि लाकूड तोडणारे भूत

लोडशेडिंग असल्याने आधी सर्वच त्रस्त होते. पण सर्वात जास्त त्रास शेतकरी लोकांना व्हायचा आणि अजूनही काही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. दिवसातून १२ तास लोडशेडिंग असल्याने लाईट येईल तेव्हा शेतात जाऊन पिकास पाणी द्यावे लागायचे. मग त्यासाठी कुठला वार अन कुठलं काय ? कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री शेतात जाऊन हे काम करावे लागते.. अख्खी रात्र जागून काढावी लागते. अशाच एका अमावस्येच्या रात्री पिंपळगाव येथील हरिभाऊ (काका) आपल्या शेतात पिकास पाणी पाजण्यास गेले.

काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. शेत गावाबाहेर आणि जंगली भाग असल्याने फक्त अंधार आणि रातकिड्यांची साथ ती काय होती बाकी कुणी नाही. आपल्या खिशातून बिडी काढली आणि हरिभाऊने शिलगावली आणि ओढत बसले. ती ओढून झाल्यावर थोडं आंग टाकू म्हणून ते मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते झोपले. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो सदाशिव! काकांना आवाज देऊन तो उठवीत होता.

काका उठल्यावर तो म्हणाला, ‘हऱ्या, झोपलायस काही काम नाही का?’ काका म्हणाले, ‘अरे सर्व सरींना पाणी सोडलेय. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तु इथे काय करतोयस?’ अरे तुझ्याकडेच आलोय, सदा बोलला. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते. दिवसा डोँगरात फॉरेस्टवाला (वनरक्षक) असतो. म्हणून म्हटलं रातच्याला जाऊ. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, ‘चल ठीक आहे, जाऊया’.

काकांनी जवळची बॅटरी घेतली आणि दोघेही गप्पा करीत डोंगराकडे निघाले. ते कधी डोंगरात पोहोचले. काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, ‘बरं चल तोड आता तुला हवे ते लाकुड’. तो म्हणाला, ‘जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत’. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला.

काका दत्तमार्गी होते. नेहमी देवपूजा, नामस्मरण करायचे. आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्याला म्हणाले, ‘कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?’. आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या हद्दीत न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, ‘वाचलास तू’! आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन थेट शेतात पोहोचले. मूर्च्छा येऊन हरिभाऊ तिथेच पडले ते थेट सकाळी हॉस्पिटलमध्ये भानावर आले.

सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मात्र हरिभाऊ कधीच रात्री शेतात गेले नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

झपाटलेली गंगी

horror story in marathi

माझे वडील नोकरीला असल्यामुळे आम्ही शहरात राहतो. आजकाल दैनंदीन जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे आणि त्यामध्ये निवांत वेळ फारसा मिळत नाही. आणि मिळलच तर तो जीवनावश्यक कामे करण्यात, कुटुंबाला वेळ देण्यातच निघून जातो. त्यामुळे भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणे हे अशक्यच झालेले आहे. असे विषय आजही ग्रामीण भागात फार चवीने बोलले जातात.

मी १० वी ला शिकत होतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मजा मारण्यासाठी माझ्या मामाच्या गावाला जायचो. मामाचे घर तसे धाब्याचे होते. जुन्या पद्धतीने बांधलेले. त्यातल्या त्यात ते शेतातच बांधलेले खूप मोठे, एकत्रित कुटुंब पद्धती माझ्या आजोबांना आवडायची, त्यामुळे आजी,आजोबा, ३ मामा, मामी, आत्या असे एकंदरीत शेतात काम करणारे गडी माणूस पकडून, १५ जण तिथे राहायचे. घराच्या समोरच थोडा बागबगीचा बनवलेला. बाजूलाच गुरांचा गोठा. आणि त्यात भरपूर गाई-म्हशी आणि बैल होते.

आम्ही शहरात राहणारे म्हटल्यावर छोट घर आणि त्याच छोट्टया जागेत वावरायचं-खेळायचं पण इकडे मामा कडे मोठ्ठ घर ते ही शेतात, त्यात आमच्यासाठी बनवलेली बाग, खेळण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात मोकळ शेत. दिवसभर तिथेच उनाडक्या करायचो. माझ्या मामाला दोन मुल आणि मावशी, आत्या, या सर्वांची मुले-मुली आणि या सर्वांत मी मोठा  आणि सर्वाचा लाडाचा. खेळताना सकाळ ते संध्याकाळ कशी होऊन जायची कळायचं सुद्धा नाही. मामा सुद्धा मला विविध शेतीचे कामे,शेतीची माहिती द्यायचे तसेच बैलगाडी चालवायला शिकवायचे, आणि संध्याकाळी गाईचे दुध काढायला शिकवायचे. मी जेव्हा तिथे गोठ्यात जायचो तेव्हा त्या म्हशी पाहून भीती वाटायची कारण त्यातली एक म्हैस माझ्याकडे काही तीव्र आवेशाने बघायची जसकाही मला शिंगणे फेकून देणार. मी मामाला सांगितले की ही म्हैस इतर गुरांपेक्षा थोडी वेगळीच दिसते. त्यावेळी मामाने सांगितले की या गोठ्यात सर्वांत जास्त दुध देणारी व माझ्या परिस्थितीला बदलणारी हीच गंगी आहे. काही महिन्यापासून ती काही विचलित असते दोनदा तिचे रेडकू मरण पावले. सध्या बी ती गाभण आहे काय हुईल या काई दिवसात ते पांडुरंगच जाणो बाबा. तेव्हा पासून काही तिचे लक्ष ठीक दिसत नाहीत गड्या. तिला कुणी काही केल असाव, अंगावरून गेल असाव काई किंवा काई बाहेरच असाव… मला कळाल नाही की बाहेरच म्हणजे काय ? मी तसाच आजी कडे गेलो व आजीला विचारले की आज्जी मामा असे असे बोलले की बाहेरच म्हणजे काय हे मला कळाल नाही ग. जसे विचारले तसे आजीने मला जवळ बसवले व सांगू लागली बाळा तू यात पडू नकोस आणि गप्प झाली जा तू बाहेर खेळ. तरी माझी जिज्ञासा काही शांत होत नव्हती तसे मी आबा कडे गेलो ते आराम करत होते. तसा मी त्यांच्या जवळ जाऊन बसलो, त्यांनी माझ्या कडे बघितल आणि बोलले की कसल्या विचारात आहेस सोन्या. मी त्यांना सर्व सांगितले तेव्हा त्यांनी तर मला तंबीच दिली की, तू आज नंतर त्या गोठया कडे जाणार नाहीस. आणि या प्रकारा पासून दूरच राहशील. ती लोक मला जेवढी दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती तेवढा मला ते बाहेरच नेमक काय हे जाणून घेण्याची इच्छा प्रबळ झाली. दिवस जात होते माझे सवा लक्ष तिच्या प्रसूती कडे लागून होते आणि एक दिवस संध्याकाळी तिला परत रेडकू झाल आणि सर्व खुष झाले. पण मामा कुठल्या तरी टेंशन मध्ये दिसत होते मी राहवून विचारलं, काहो मामा आता झाल ना तिला रेडकू आणि बघा तिच्या जवळच आहे ते.  आता तर खूष व्हा तर मामा बोलले की मला ही तुफान येण्यापूवीची मशान शांतता दिसते गड्या.  ते पिल्लू काई अलगच दिसून रायल. तुमी जाऊन झपा मी येतोच. माझी आई मला घेऊन गेली आम्ही जाऊन झोपलो. तेवढ्यात काही वेळाने ती म्हैस कावऱ्या-बावऱ्या सारखी करायला लागली तिने हंबरायला सुरवात केली तिचा आवाज आणि तो आक्रोश त्यामुळे सर्वांची झोप उडाली. आम्ही अंगणात जाऊन बघितलं तर मामा सुद्धा रडायला लागले आणि बोलत होते की गंगे यावेळी पण म्या काईच नाई करू शकलो जे व्हायचं नव्हत ते घडल.

क्रमश :

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.