महाऔषधी – गुळवेल (अमृतकुंभ)

Giloy

बहुतेक ठिकाणी दृष्टीस पडणारी हि औषधी आहे कुठे कुंपणावर तर कुठे झाडावर वेली पसरलेली असते आपल्या नजरेखालून गेलेली हि वनौषधी पण तिची ओळख नसल्याने आपण तिला एक वेल म्हणून बघतो बहुतेक वेळा कडुनिंबाच्या झाडावर या अमृतकुंभाचे वास्तव्य दिसून येते.
आज आपण या महाऔषधी बद्दल जाणून घेणार आहोत हिरवीगार हृदयाच्या आकाराची पाने असलेली विविध आजारांवर उपाय म्हणून आयुर्वेदिक औषधी मध्ये हिचे सत्व वापरले जाते अशी हि अमृता औषधांचा बहुमूल्य ठेवा स्वतःमध्ये सामावलेली सर्वांना स्वास्थासाठी हितकारक, विशिष्ट गुणांनी युक्त नेहमी हिरवीगार राहणारी हि वेल.
ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता (अमृतकुंभ) हे नाव दिले आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागात ही वनस्पती सहज आढळते.
अशी हि अमृतकुंभ गुळवेल आरोग्यासाठी लाभदायक आहे.

या वेलीचे सर्व अंग उपयोगाची आहेत. या गुळवेलीला कसे ओळखावे याची थोडक्यात ओळख

गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या झाडांवर, कडुनिंबाच्या झाडावर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.
वेलीच्या खोडास लांब दोऱ्यासारखी, हिरवी मुळे फुटून ती लोंबकळतात. खोड थोडे जाड असून त्यावरील साल पातळ असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात. खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार दिसतो. गुळवेलीचे खोड मात्र चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. पाने साधी, एक आड एक, हृदयाकृती. गडद हिरवी व गुळगुळीत असतात. अंदाजे जून-जुलै महिन्यात या वेलीला बहर येतो तिला छोटी छोटी फुले येतात व लाल रंगाची गोल वाटाण्याएवढी फळे गुच्छाने येतात. हि अमृता बहरते तेव्हा तिचे सौंदर्य खुलून दिसते.

दैनंदिन जीवनात आपण या अमूल्य संजीवनीचा आपल्या स्वास्थासाठी उपयोग करू शकतो:

मधुमेह, मूळव्याध, मूत्रविकार, सर्दी पडसे, नेत्र विकार, वमनविकार, पांडुरोग , प्रमेह, यकृत विकार, ज्वर, कॅन्सर, त्रिदोषविकार, त्वचा रोग, हृदयविकार, रक्तशर्कराविकार अजून कितीतरी विकारांवर गुळवेल हे एक उपयुक्त औषध आहे.
ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.
गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारातही उपयुक्त आहे.
मधुमेहात लाभदायक – गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते.
हृदयरोगात लाभदायक – गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध व हृदयविकाराचे  रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत.
या गुळवेलीच्या पानांची भाजी तसेच पराठे सुद्धा बनवली जातात ते चवीला छान लागतात.

औषध म्हणून गुळवेलीचे सेवन करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

मैद्याचे पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.
मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही.परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.

उदाहरण – बिस्किट्स नानखटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक्स, नूडल्स, कचोरी, सामोसे, असे बरेच पदार्थ हे मैद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया: गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी संरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.
गुणधर्म, खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मैद्यामध्ये असतो. मैद्यामध्ये फक्त कर्बोदक (carbohydrates) जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मैद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर बनते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतड्यामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हे ही आजार वाढीस लागतात. पोटाचे आजार: मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे याच्या सेवनाने पोट खराब होते व बद्धकोष्ठताहोण्याची शक्यता असते.
अशक्तपणा: मैद्याचे पदार्थ नियमित खाल्ल्याने शरीरातील इम्‍यून सिस्‍टम कमजोर होते व शरीर अशक्त बनते नेहमी नेहमी आजारी पडण्याची शक्यता असते. असे विविध आजार होण्याची शक्यता बळावते. मैद्यामध्ये शरीराला पोषक अशी नैसर्गिक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते.

उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे असे विविध), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.
आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या प्रक्रियेत क्रोमियम, झिक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो खाणे टाळावे, हि एक योग्य अशी आरोग्यासाठी टिप्स आहे. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये आवश्यक आहेत, परंतु समाजातील मोठे सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मैद्याच्या पदार्थाना गैरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात.

पर्यायी पदार्थ – सर्व पदार्थ बनविण्यासाठी मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.
पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.

स्वास्थवर्धक कापूर

कापूर म्हटल्या बरोबर आपल्या डोळ्यांसमोर देव पूजा येते. कारण की देव पूजेमध्ये आरतीच्या पूर्वी तर काही ठिकाणी आरतीच्या नंतर कापूर जाळला जातो. कापूर जाळल्या नंतर जवळील परिसर सुगंधित होतो व वातावरणही शुद्ध होते. असा हा कापूर दिसायला मेणबत्ती प्रमाणे पांढरा असतो. कापूर हवेशीर ठेवल्यास तो हळू हळू हवेत उडून जातो. त्यामुळे कापूर हवेशीर ठेवल्या जात नाही. अशा या कापूरचे आपणास धार्मिक उपयोग माहीतच आहे. आज आपण ऐकण्यात आलेले… घरी थोरा-मोठ्यांकडून ऐकलेले कधी वापरून बघितलेले  असे या कापराचे काही घरगुती आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत . 

१) घरात कापूराचा वापर – जर आपण घरात कापूर ठेवल्यास त्याचा सुगंध हवेने संपूर्ण घरात पसरतो व एक सुगंधित वातावरण आपणास मिळते. तसेच वातावरणातील किटाणू देखील याच्या सुवासाने नष्ट होतात. जर आपण कुठे गावाला जात असणार तेव्हा घरात कापूर ठेवून जा. असे केल्यास जेव्हा आपण परत येणार तेव्हा घरात एक सुगंधित वातावरण मिळेल. घरात आपणास जे जाळे तयार होत असतात ते पण असे केल्याने दिसणार नाही.

२) काही चावल्यास – जर आपल्याला एखादा छोटासा किटक चावले असल्यास आपल्याला त्रास होतो अशा वेळी कापूर त्या जागेवर घासा आपल्याला होणारी वेदना कमी होईल.

३) आपणास कुठलाही त्वचा विकार असेल जसेकी मुरूम, ऍलर्जी झालेली आहे त्या भागाला कापूराचे तेल लावा. काही दिवसातच आपणास फरक दिसून येईल.

४) आपल्याला कोठे जखम झाली असेल अथवा कुठे भाजले असेल अश्या वेळी आपण कुठले तरी मलम किंवा एंटीबायोटिक क्रीम वापरतो त्या ऐवजी आपण कापराचा वापर केल्यास जास्त फायदा व एक घरगुती उपाय केल्या जाऊ शकतो. त्याकरता पाण्यात कापूर टाका व थोड्या वेळाने जेथे जखम आहे किंवा भाजलेले अश्या ठिकाणी हे एका कापसाने लावा आराम मिळेल.

५) जर आपले केस गळत असेल आंघोळीच्या काही तासा पूर्वी कापूर तेल डोक्याला लावा व नंतर डोके धुवून काढा तुम्हाला काही दिवसात फरक दिसून येईल.

६) जेव्हा आपले पोट दुखत असेल त्या वेळेस ओवा, पुदिना व कापूर बारीक करून याचे शरबत बनवा व प्या काही वेळातच आराम मिळेल.

७) आपल्याला जर पायाला भेगा पडल्या असेल त्या करता गरम पाणी घ्या त्या पाण्यात कापूर मिक्स करा व त्यात आपले पाय टाकून ठेवा असे काही वेळ करा व पाय पुसून घ्या. असे काही दिवस करून पहा आपणास बराच फरक दिसून येईल.

८) आपणास लूज मोशन (संडास लागली असेल) तर अशा वेळी आपण जर कापूरचा वापर केल्यास आपणास चांगला फायदा मिळेल. त्या करता ओवा, पुदिना व कापूर बारीक करून पाण्यात टाका व हे पाणी काही वेळ उन्हात ठेवा. थोड्या थोड्या वेळाने हे मिश्रण फिरवत रहा. काही वेळाने त्यात साखर टाकून पिऊन घ्या काही वेळाने आपणास बरे वाटेल.

९) आपल्या डोकयात उवा झाल्या असेल तर त्या करता आपण कापूरचे तेल लावल्यास उवा निघून जातात.

१०) कुठले त्वचेचा रोग अथवा कुठली स्किन इन्फेक्शन असल्यास आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकून आंघोळ करा आपणास चांगला फायदा मिळेल.

११) आपले हात-पाय दुखत आहे तर जेथे दुखते त्या ठिकाणी कापूरच्या तेलाने मालिश करा.

१२) आपणास मुका मार लागल्याने शरीरावर सुजन आली असेल त्या ठिकाणी कापूरचे तेल लावा सुजन कमी होण्यास मदत होईल.

१३) घरात कापूरच्या तेलाचा दिवा लावल्यास मच्छर घरात राहत नाही.

१४) सर्दी झालेली असल्यास कापुराचा वास घ्या त्या मुळे सर्दी कमी होण्यास मदत होईल.

१५) स्वाईन फ्लू सारख्या आजारात वातावरणात त्याचे किटाणू असता ते कापुराच्या वासाने नष्ट होतात. त्यामुळे अशा वेळेस आपल्या रुमालामध्ये कापूर ठेवा या फ्लू पासून आपले रक्षण होईल.

स्वास्थासाठी कुठलेही प्रयोग करण्या अगोदर त्यांचे प्रमाण तसेच आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.

सौंदर्य खुलवण्यासाठी उपयुक्त

आपल्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. याचे कारण म्हणजे शरीरामध्ये कॅल्शियम व आयरन ची कमतरताही असु शकते.महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्रासलेले आहे. तसेच आपण जर कॉम्पुटर वरच काम करत असाल तर यामुळेही आपल्या डोळ्याखाली काळे डाग पडतात. डोळ्याखाली काळ वर्तुळ होणे हा आपल्या बदल्या जीवनशैलीचा भाग आहे. जास्त काम करने, तणावात राहणे, झोप पुरी न होणे तसेच अन्य कारणांने डोळ्याच्या खाली काळे डाग दिसतात. हे काळे डाग घालविण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण बघणार आहोत.
१) रोज पुरेशी म्हणजे ६-८ तास रोजची झोप घेणे आवश्यक आहे.
२) निदान ३ महिन्यातून एकदा डॉ. सल्ला घ्यावा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. डॉ. सल्ल्याने चष्मा वापरावा तसेच डोळ्यांचे व्यायाम करावेत. जेणे करून आपल्या डोळ्यांवर येणारा ताण कमी होईल.
३) टॉमेटोतील अनेक गुण तुमच्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. याने त्वचेला ग्लो प्राप्त होतो. एक चमच्या टॉमेटोची पेस्ट आणि लिंबाचा रस (काही थेंब) एकत्र करुन मिश्रण तयार करावे. हे मिश्रण आपल्या डोळ्याखाली लावावे. दोन मिनीट ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून काढा.
४) बदाम तेलात अनेक गुणधर्म आहेत. डोळ्याजवळील त्वचेला याचा लाभ मिळतो. बदाम तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते. रात्री डोळ्याखाली बदाम तेल लावावे. हलक्या हाताने मसाज करावा. सकाळी उठल्यानंतर तोंड धुवावे.
५) पुदिना हे थंड असतो हे आपणा सर्वांना माहिती असेलच तसेच हा पुदिना आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता पुदिन्याची पेस्ट तयार करा त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करून बघा तुम्हाला फरक दिसेल.
६) काकडी हि थंड असते तसेच काकडी हि आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करते. या करता काकडीचा रस त्यात निंबूचा रस टाकून मिश्रण तयार करा व दोन्ही डोळ्या खाली लावा व काही मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा. हा प्रयोग काही दिवस करू शकता.
७) कोरे दुध म्हणजे गरम न केलेले दुध एका कापसाच्या साहाय्याने डोळ्यांच्या आजू बाजूला लावा हा प्रयोग काही दिवस करावा.
८) संत्रीची साल बारीक केलेली व थोडे गुलाब जल यांचे मिश्रण करा व तो डोळ्यांच्या आजू बाजूला लावा.
९) टमाटर, काकडी व लिंबु प्रत्येकाच्या घरी असतो तर त्याच्या दोन चकत्या दोन्ही डोळ्यान वर ठेवा.
१०) आलु हे आपल्या डोळ्यांच्या खालील काळे डाग कमी करण्यास मदत करतो. या करता आलुचा रस त्यात निंबूचा रस टाका व हे मिश्रण दोन्ही डोळ्याना लावा व १० ते १५ मिनिट राहु द्या त्यानंतर थंड व स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
११) दुधाची साय २ चमचे व पाव चमचा हळद हे मिश्रण एकत्रित करून डोळ्यान जवळील जे काळे डाग आहे त्या वर लावा.

कुठलेही प्रयोग करण्या अगोदर आपल्या प्रकृतीवर त्यांचा होणारा परिणाम या गोष्टींचा विचार करणे महत्वाचे. त्यासाठी जाणकार वैद्यांचा सल्ला घ्यावा.