भूतबित काही नसतं रे !

read horror stories in Marathi

एम एच २८.इन च्या सर्व वाचकांना सूचित करण्यात येते आजची कथा प्रल्हाद दुधाड यांनी पाठवली आहे. ती तुमच्या समोर मांडण्यात येत आहे. तुमचे सुद्धा काही अनुभव असतील तर आम्हांस मेल करा. आम्ही ते आपल्या बुलडाणा जिल्ह्याच्या एकमेव ऍप्प वर नक्कीच प्रकाशित करू. आमचा ईमेल आयडी : mh28.in@gmail.com

 

ते १९८३ साल होते. टेलिफोन खात्यात टेलिफोन ऑपरेटर म्हणून मी नोकरी करत होतो. वेगवेगळ्या शिफ्टमधे ड्युटी करावी लागायची.मी नोकरी करून शिकतही होतो त्यामुळे जास्त करून दुपारची किंवा रात्रीची शिफ्ट करायचो. रात्री उशिरा सुटल्यावर तेथेच झोपायची सोय होती. त्या काळी एसटीडीची वा मोबाईलची सोय नव्हती त्यामुळे ट्रंककॉलचे बुकिंग करूनच बाहेरगावी बोलायला लागायचे आणि हे ट्रंक टेलिफोन एक्स्चेंज मी जेथे काम करायचो त्याच बिल्डिंगमध्ये होते. विशेष म्हणजे या ट्रंक एक्स्चेंजमधे सगळ्या शिफ्टमध्ये फक्त लेडीज टेलिफोन ऑपरेटर्सच काम करायच्या. रात्रंदिवस तेथे ट्रंककॉल लावून द्यायचे काम चालू असायचे. रात्री बारा वाजता ड्युटी संपणाऱ्या लेडीजसाठी त्याच बिल्डींगमधे रात्री झोपण्याची सोय होती.रात्री बारानंतरसुध्दा सुमारे शंभरेक लेडीज तेथे काम करायच्या.

एक दिवस या ट्रंक एक्स्चेंजमधील मागच्या बाजूला रात्रीच्या वेळेस भूत दिसले अशी अफवा उठली. त्या रात्री ड्युटीवर असलेल्या दोनतीन लेडीजना ते भूत दिसले होते आणि त्या एवढ्या घाबरल्या की त्यातली एक तापाने आजारी पडली. बाकीच्या “आम्ही आता नाईट ड्युटी करणारच नाही” असे म्हणू लागल्या. दुसऱ्या दिवशीही भूत दिसल्याचे अजून काही लेडीज सांगायला लागल्या त्याही खूप घाबरलेल्या होत्या. आठवडाभरात या भूताच्या अफवेने स्टाफमधे घबराट पसरली. ज्यांना नाईट ड्युटी लागेल त्या लेडीज कामावर गैरहजर राहू लागल्या.रात्रीच्या ट्रंककॉल्सवर याचा परिणाम व्हायला लागला.”भूत बीत काही नसते!” असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अनेक लेडीज घाबरून नाईट ड्युटीपासून लांब पळायला लागल्या. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत राहिले. रात्रंदिवस कडक सिक्युरिटी असूनही नाईट ड्युटी कुणी करायला तयार होत नव्हते.
“रात्री साडेबाराच्या सुमारास एक प्रचंड मोठी सावली मागच्या कायमच्या बंद असलेल्या खिडक्यांच्या अपारदर्शक काचांवरून पुढे पुढे सरकत जाते, ती सावली एवढी मोठी असते,की एक्स्चेंजमधे काम करणाऱ्या लेडीजची घाबरून जायच्या. आपले काम सोडून त्या दुसऱ्या खोलीत निघून जायच्या. रात्र रात्र बसून राहायच्या.मागच्या बाजूला एक जुना पारशी माणसाचा बंगला होता. त्या बंगल्यात कित्येक वर्षापासून कुणी रहात नव्हते.त्या बंगल्यात भुताटकी आहे अशी चर्चा आधीपासून होतीच आणि सध्या रात्री दिसणाऱ्या या कथित भूतामुळे तर त्या भुताटकीच्या चर्चेला अजूनच घबराटीचे स्वरूप आले होते. एक्स्चेंजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्टाफला “असे काही नसते” हे समजावण्याचा प्रयत्न केला पण स्टाफ ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. ”ही भुताटकी बंद झाल्याशिवाय आम्ही कुणीही नाईट ड्युटी करणार नाही असे लेडीज म्हणू लागल्या.रात्रीच्या वेळचे अर्जंट व लायटनिंग ट्रंककॉलसुध्दा लागणे बंद झाले. या बद्दलच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्या.

शेवटी असे ठरले की रात्री चार पाच पुरूष कर्मचारी ट्रंकएक्स्चेंजमधे थांबून तथाकथीत भुताटकीची खातरजमा करतील व रिपोर्ट देतील. दुसऱ्याच रात्री या भुताटकीची खातरजमा करायचे ठरले. मीसुध्दा त्या गृपमधे थांबलो. रात्री बारा वाजले आणि आम्ही त्या खिडक्यांकडे नजर लाऊन बसलो. आम्हीही थोडे घाबरलेलो होतो, पण उसने अवसान आणून त्या भुताची वाट पहात होतो. रात्रीचे साडेबारा होवून गेले तरी भूत काही आले नाही. आता आम्ही त्या घाबरणाऱ्या बायकांची आपापसात चर्चा व टिंगलटवाळी करायला लागलो. ”भुताटकी वगैरे काही नसते.मनाचे खेळ असतात,त्या बायकाना नाईट ड्युटी नको म्हणून बहाणा करत असतील!” अशी टिंगलटवाळी करू लागलो. रात्रीचा एक वाजला आणि अचानक प्रचंड मोठी सावली एका खिडकीच्या काचेवर दिसली या खिडक्या उघडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे कसली सावली आहे ते बघणेही शक्य नव्हते. हळूहळू ती सावली पुढे पुढे सरकायला लागली,आता ती पुढच्या खिडकीवर दिसायला लागली. मोठ्ठे केस पिंजारलेले डोके त्या सावलीत दिसत होते!  आता मात्र आमच्यातले एकदोघे घाबरले होते. मागच्या बाजूला जाणे लगेच शक्य नव्हते. पुढच्या रस्त्यावर जावून बिल्डिंगला वळसा घालायचे आम्ही ठरवले आणि अंधारात तसे गेलोही पण त्या बंगल्याच्या आवारात गवत वाढलेले होते आणि माणसांचा वावर नसलेल्या त्या बंगल्यात जायचे आम्हाला मुळीच डेअरिंग नव्हते त्यामुळे आम्ही परत आलो. आत असलेले आमचे साथीदार प्रचंड घाबरले होते. त्यांचे म्हणणे होते की ती प्रचंड सावली सगळ्या दाही खिडक्यांवर नंतर दिसून दिसेनाशी झाली. त्या दिवशीची मोहीम सोडून आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशीही खात्री करायची असे ठरवले गेले त्यासाठी वरिष्ठांच्या परवानगीने एका खिडकीची काच थोडी फोडायचे ठरले.दुसऱ्या दिवशी जेथून नीट दिसेल अशा ठिकाणच्या खिडकीच्या काचेचा खालचा कोपरा आम्ही फोडला. दिवसा उजेडी मागच्या बंगल्याचे निरीक्षण केले व कुठल्या बाजूने बंगल्याच्या परिसरात शिरता येईल याचाही अंदाज घेतला. त्या रात्री अजून दोघेजण आमच्यात सामील झाले आज हे भूत बघायचेच असे आम्ही ठरवले होते!

दुसऱ्या रात्री आम्ही रात्रभर त्या खिडक्यांकडे बघत बसलो पण भूत आलेच नाही! काल जे पाहिले ते खरे की आजचे आम्ही सगळे चांगलेच बुचकळ्यात पडलो होतो.रात्रभर जागरण झाले होते.तिसऱ्या दिवशी परत प्रयत्न करू असे ठरवून आम्ही आपपल्या घरी गेलो. तिसऱ्या रात्री पुन्हा आम्ही भूतासाठी सापळा लावला.रात्री एकच्या सुमाराला पहिल्या खिडकीवर ती अजस्र सावली पडली आणि आम्ही सावध झालो.एकजण फुटलेल्या काचेतून बाहेर बघत होता पण त्याला पहिल्या खिडकीच्या समोरचा भाग दिसत नव्हता.ती सावली हळूहळू पुढे सरकायला लागली साधारण चवथ्या खिडकीवर आल्यावर ती सावली आली आणि फुटलेल्या काचेसमोर असलेला आमचा सहकारी खो खो हसायला लागला.त्याने दुसऱ्या सहकाऱ्याला त्या अरुंद फटीतून पहायला सांगितले त्याने बाहेर बघितले आणि तोही हसायला लागला.एकेक करून आम्ही सर्वांनीच ते बाहेरचे दृश्य पाहिले आणि पोट धरधरून सगळेजण हसायला लागलो कारण भूत भूत म्हणून सगळे ज्या सावलीला घाबरत होते ती एका वेडया बाईची सावली होती! एरवी ही बाई पुणे स्टेशनवर कायम फिरत असलेली प्रत्येकाने पाहिली होती! केस पिंजारलेली अंगावरच्या कपड्याचे भान नसलेली व कायम काही ना काही बडबडत हातवारे करत ती तिथे फिरत असायची!

आम्ही लगेच त्या बंगल्याकडे गेलो.आम्ही बंगल्यात भूत येते असे समजत होतो मात्र सत्य वेगळेच होते.त्या पारश्याच्या बंगल्याच्या कंपाऊंडला लागून एक पायवाट होती त्या पायवाटेवर लोक कचरा टाकायचे तिथे टाकलेले अन्न खायला ही वेडी तिथे येत होती,कारण आम्ही गेलो तर ती त्या कचऱ्यात पडलेले अन्न वेचून खात होती! ती जेंव्हा कधी इकडे यायची तेंव्हा पलीकडे असलेल्या पुना क्लब ग्राउंडवर लावलेल्या प्रखर दिव्यांमुळे तिची सावली ट्रंक एक्स्चेंजच्या खिडकीवर पडायची ती जसजशी पुढे पुढे जायची तिची मोठी मोठी होत जाणारी सावली पुढच्या खिडक्यांवर पडायची आणि आतल्या काम करणाऱ्या बायकांसाठी ती भुताटकी ठरत होती! सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मात्र त्या गोष्टीवरून त्या घाबरणाऱ्या स्टाफची बरेच दिवस बाकीचा स्टाफ टिंगल करायचा!

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

तो गाडीवाला नक्की कोण होता ?

घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खणाणला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी… ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! त्यामुळे त्या सोयऱ्याच्या गावाला जायची गडबड सुरु झाली. रात्रीच्या गाडीने निघायचे होते. त्यामध्ये आम्ही फार लहान होतो. आम्हांला घरी सोडूनही कसे जावे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत घेऊनही कसे जावे ? हाच प्रश्न बाबांना पडला होता. एकवेळ बाबा म्हणालेही, तुम्ही भावंडे घरीच राहा, आम्ही जाऊन उद्या परत येतो. पण आपल्या वासरांना एकटे सोडून निघेल ती माय कसली. तिने हट्टच धरला ! त्यांना एकटे सोडून जायचे नाही, आपल्या सोबतच घ्यायचे. मग अशा वेळेला नाही म्हणणे तरी कुठे जमणार होते. म्हणून त्यांनाही लगेच होकार दिला आणि आवरून निघालोच आम्ही गावी जायला.

रात्रीची एकच ट्रेन होती आम्हांला त्या गावी जाण्यासाठी, तिनेच लवकर पोहोचू या विचाराने ती ट्रेन पकडली. कारण मरते वेळी आपण तिथं नव्हतो निदान मयतीला (मयत विधीला) तरी हजर पाहिजेच, ह्याच विचाराने बाबांची घाई सुरू होती. रात्रीचा प्रवास, कडाक्याची थंडी आणि झोपेची घाई, सर्व काही एकदमच. पण प्रसंग आणि ओढच अशी होती की, काही केल्या पोहोचायचेच होते लवकर. ते गावही तसे फार दूरच होते आणि ट्रेनने जायचे तर एका दुसऱ्या स्टेशनला उतरून पुढे मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा होता.

रात्री अंदाजे २ वाजता आम्ही त्या स्टेशनवर उतरलो . सर्वत्र अंधार पसरलेला. स्टेशनही असे सामसूम होते. बराच वेळ स्टेशनच्या बाहेर थांबलो, पण चिटपाखरूही दिसत नव्हते. पुढे जाण्यासाठी एखादी गाडी येते का ? याची आम्ही वाट पाहत होतो. तितक्यात एक ट्रक समोरून आला. थोडं बरं वाटलं, चला जास्त वाट पहावी लागली नाही. पण जसं ठरवलं तसं न होणेच, असेच काही आज नशिबी होते. बाबांनी ट्रक वाल्याला थांबवले, त्याला सांगितले की आम्हांला अमुक-तमुक गावी जायचे आहे, पण तो म्हणाला, “”म्या तर दुसरीकडं चाललोया बघा, पण तुम्हांसनी त्या फाट्यावर सोडितो. बघा जमतंय का. तिथून गाव फार लांब नाय. तिथून कोणचंही वाहन (गाडी) भेटलं तुमासनी”

एवढ्या रात्री दुसरी गाडी मिळणेही अशक्य होते म्हणून त्या ट्रकने जायचे बाबांनी ठरवले आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर कापताच त्या ड्रायवर ने सांगितल्या फाट्यावर येऊन पोहोचलो. आम्हांला तिथे उतरवून तो ट्रक त्याच्या मार्गी लागला. फाट्यावर सर्वदूर अंधार पसरलेला. ज्या दिशेला जायचे होते, त्या दिशेच्या रस्त्याच्या कडेला आम्ही थांबलो होतो. पुढे जाण्यासाठी काही गाडी येते का याची वाट पाहत. पण दूर दूरवर कुठलीही गाडी येताना दिसत नव्हती. फार अंधार होता म्हणून साहजिकच आईला अगदी खेटून आम्ही उभे होतो आणि ह्या अंधारात आम्ही घाबरू नये ह्याची ती देखील काळजी घेत होती. तितक्यात जणू दोन काळ्या सावल्या आमच्या पुढ्यातून समोरच्या झाडीत शिरल्याचे जाणवले. आई-बाबा, आम्ही सर्वांनी ते दृश्य पाहिले, अगदी छातीत धडकीच भरली. काय होते ते ? कोण गेले तिकडे ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण आईचा माझ्या हातावरच्या घट्ट झालेला हात पाहून, नक्कीच ते काहीतरी विचित्र होते हे मला कळून चुकले. त्यात तीही पूर्ण घाबरली होती हे ही मला समजले.

त्यावेळेस माझे वय इतके होते की, भुतं तर दूरच पण नुसता अंधार जरी म्हंटला तरी चड्डी ओली व्हायची. त्यातच पहिल्यांदा असे काही पाहिले, जे खरोखर भयानक होते. कारण आम्ही सोडून तिथे कोणीही दुसरे नव्हते आणि अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या.बाबांनी देखील सावध पवित्र घेतला होता. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला आणि हा नक्कीच भास नव्हता. आता तर आमची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कारण घडलेल्या घटना नक्कीच साधारण नव्हत्या, पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत… पुन्हा आमच्या समोरच्या झाडीत, पण थोड्या दूरवर आम्हाला त्या दोन काळ्या सावल्या धावताना दिसल्या. मी तर एवढा घाबरलो की तिथेच आई-आई ओरडत तिला घट्ट पकडू लागलो. आम्हांला सावरण्यासाठी लगेच बाबा म्हणाले, ” एखादं कुत्रं बित्रं असलं तिकडं दुसरं कुणी नाहीये तिकडं”.

बाबा आमचे लक्ष्य वळवीत होते, हे आम्हांला कळून चुकले होते. तितक्यात पुन्हा तोच टाळ्यांचा आवाज आणि ह्यावेळेस आमच्या कानाच्या फारच जवळ. आम्ही सारेच दचकलो. आईने लगेच देवाचा धावा केला आणि जोरजोरात मोठ्या आवाजात देवांचे नाव घेऊ लागली. कारण आमच्या बरोबर जे घडत होते, ते नक्कीच काहीतरी विपरीत होते. पुढ्याच क्षणाला त्या दोन काळ्या आकृत्या दूरवरून कसले तरी हातवारे करत आमच्या दिशेने चालत यायला लागल्या. आतातर बाबांचेही भान हरपले होते. तेही अगदी आम्हांला येऊन खेटून उभे राहिले. कर्रर्रर्रर्रर्रर्रर…. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र….. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. आवाज कानी ऐकू येऊ लागला आणि मधेच पुन्हा तो टाळ्यांचा आवाज. आवाज, टाळ्या, सावल्या…. आवाज, टाळ्या, सावल्या… आवाज, टाळ्या, सावल्या…. त्या सामसूम ठिकाणी, अंधाऱ्या रात्री कुठला खेळला जात होता हेच कळत नव्हते आणि ह्यावर करायचे तरी काय ? हाच प्रश्न आम्हां सर्वांना पडला होता. त्या काळ्या आकृत्या आमच्याच दिशेने येत होत्या. इकडे आईचे देवाचे नामस्मरण चालूच होते. ती जोरजोरात देवाचा धावा करू लागली.

तितक्यात जोरजोरात हॉर्न वाजवत एक अँबेसिडर आम्हांला आमच्या दिशेला येताना दिसली. दूरवरून तिची दिसणारी हेड लाईट हा आशेचा किरण म्हणावा की निराशेचा, हे काहीच कळत नव्हते. कारण रात्रीच्या वेळेस जिथे अगदी सुमसाम मोकळा रस्ता आहे, त्या ठिकाणी ही व्यक्ती जोर जोरात हॉर्न वाजवत का येत होती ? आम्ही लगेच रस्त्याच्या कडेने त्या गाडीला हात करू लागलो. ती गाडी आली आणि नेमकी आमच्या समोर येऊन थांबली. एक पांढरी शुभ्र कार, त्या अंधाऱ्या रात्रीत मस्त चमकत होती. बाबा लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला ला अमुक-तमुक गावी जायचे आहे असे सांगितले. पण तेही काही विचित्रच होते. एक पांढरी शुभ्र कार, जोरजोरात हॉर्न वाजवत अचानक आमच्या पुढ्यात येऊन थांबते. त्या गाडीच्या वाहन चालकाचा पेहराव म्हणावा तर, अगदी पांढरे कपडे घातलेली जणू काही मोठी आसामीच होती. अगदी गोरापान, सरळ उभं नाक असलेला असं त्याचं वर्णन होतं. साधारणतः गावी सगळेच पांढरा पोशाख घालतात, पण ह्या महाशयांचा पेहराव काही वेगळाच होता. त्याने जरूर आमच्या समोर गाडी थांबवली, पण त्याने मान वळवून आमच्याकडे एकदाही पाहिले नाही. तो एकटक सरळच पाहत होता, त्याच दिशेला ज्या दिशेने त्या काळ्या सावल्या आमच्याकडे येत होत्या. बाबा पुढे सरसावले त्यांनी त्याला सांगितले की, आम्हांला त्या-त्या गावी जायचे आहे, त्यावर तो लगेच म्हणाला, “”मला माहित आहे तुम्हांला कुठे जायचंय ते, बसा लवकर गाडीत”.

पण एवढेही बोलताना देखील त्याने बाबांकडे काही पाहिले नाही. आम्ही लगेच गाडीत शिरलो. पण बसता – बसता आईने आणि मी मागे वळून पाहिले, तर चमत्कार असा की त्या दिसणाऱ्या सावल्या, आकृत्या जणू कुठेतरी नाहीशा झाल्या होत्या. बाबा बऱ्याच गोष्टी काढत त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती व्यक्ती काही केल्या बोलायचं नावं घेत नव्हती. एकदाही मान वळवून बाबांकडे अथवा आमच्याकडे पाहत नव्हती. माघे बसलेली आई आणि मी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही आवभाव नव्हते. तो फक्त पुढे बघत गाडी चालवत होता. बराच बोलायचा एकांगी प्रयत्न केल्यानंतर, आता बाबा शांत झाले होते. पण त्या गोष्टीने आमची धाकधूक फारच वाढली होती. पुढे आमचे काय होणार, हे त्या ईश्वरालाच ठाऊक होते आणि त्याचाच धावा आई सतत करत होती. ह्या सर्व घटनेत सकाळचे ५ केव्हा वाजले कळले नाही. काळरात्र बाजूला सारत पहाटेचा प्रकाश तिची जागा घेऊ लागला आणि आम्ही शेवटी त्या गावी पोहोचलो. जसे पोहोचलो तसे पटकन आम्ही सारे गाडीच्या खाली उतरलो. बाबांनी त्या व्यक्तीला पैसे देऊ केले, पण ते न स्वीकारता आणि बाबांकडे न बघता, फक्त हात नकारार्थी हात हलवत तो व्यक्ती गाडी पुढे घेऊन निघून गेला.आम्ही सुखावलो होतो, कारण सरतेशेवटी सुखरूप आम्ही त्या गावाच्या स्टँडवर पोहोचलो होतो. पण एक प्रश्न मात्र, आमच्या सर्वांच्या मनात तसाच अनुत्तरित राहिला… हा गाडीवाला नक्की होता कोण ?