ती तर अतृप्त आत्म्यांची अदृश्य दुनिया

प्रसंग २ सोन्याचा प्रेतलोकातील प्रवास

सदू बुआ सुरश्याला कथा सांगू लागले. काल जसा दगडू पिशाचच्या तावडीतून सुटला होता. तसेच आज सोन्या अदृश्य लोकातून परत येतो. त्याचा प्रेतलोकातील प्रवास खूप काही शिकवतो. हि कथा मला माझ्या आबांनी सांगितलेली आहे असे सदू बुआ सांगू लागले. सोन्या हा एकुलता एक मुलगा. त्याच्या आई-वडिलांनी त्याचा एवढा लाड केला की त्याला चांगले संस्कार द्यायचे ते विसरलेत. सोन्या जसा मोठा झाला तसा त्याने सर्व गावात उनाडक्या करून सर्वांना खोडकर वृत्तीने त्रास देणे सुरु केले. त्याच्या आई-वडिलांना कुणी सांगितले की तुम्ही याला एखाद्या आश्रमात नेऊन घाला आजवरच याला शिकायला पाठवलं असत तर हा असा बनला नसता.
त्याच्या घरचे त्याला किसना बुआकडे घेऊन जातात. व नम्र विनंती करतात की तुम्ही याला शिक्षण द्या. किसना बुआ त्याला ठेऊन घेतात. दिवसेंदिवस शांत आश्रमाचे वातावरण सोन्यामुळे बिघडते. गुरुजी त्याला दंडित करतात. हळू हळू त्याला तिथे राहण्याची सवय होते. पण त्याची वृत्ती हि खाण्यामध्ये, उनाडक्या करण्यामध्येच लागून असते. दिसायला धिप्पाड व उन्मत्त सोन्या त्याच्या कक्षात सर्वांपेक्षा मोठा दिसतो त्यामुळे त्याच्या कक्षातील सर्व मुल त्याला भितात. तो सांगेल तसे सर्वांना करणे भाग पडते, असेच एक दिवस उन्मत्त सोन्या सर्व मित्रांना घेऊन एक दिवस कुणालाच न सांगता जंगलात भ्रमण करायला जातो. जंगलात फिरत असताना नाल्या खोऱ्यात अंघोळ करणे, झाडांची फळे खाणे, गुल्लर ने पक्ष्यांना मारणे, झाडावरून पक्ष्यांची घरटी पाडणे, अशाप्रकारची मौज मजा करण्यातच सोन्याचा दिवस निघून जातो. ते सर्व एका टेकडीवर उभे असतात. व अचानक सोन्याच्या पाय सटकतो व सोन्या खाली दरीत कोसळतो सर्व मित्र आरडाओरड करतात तितक्यात सोन्या सर्वांच्या दृष्टीआड जातो. आणि दिसेनासा होतो.
इकडे सर्व मित्र आश्रमात पळत जातात आणि गुरुजींना जे घडले त्याचा सविस्तर वृतांत सांगतात. गुरुजी सर्वांवर रागवतात की कोणी सांगितले होते जंगलात जायला. माझी अनुमती घेतली होती का ? तेव्हा मुले बोलतात गुरुजी सोन्याने भीती दाखवली होती की त्याचे नाही ऐकले तर तो आम्हाला त्रास देईल. गुरुजी काही विशेष शिष्यांसोबत त्या जागेवर जातात आणि तपास करतात. पण सर्व प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश मिळत नाही. सर्व आशा सोडून देतात. पण गुरुजी आशा सोडत नाहीत ते म्हणतात की मला काहीतरी वेगळ घडल असा संशय आहे. तो येईल. पण सध्या तो आपल्याला दिसू शकत नाही. आणि तिथून निघून जातात. सोन्याच्या आई बाबाला निरोप देऊन सूचित केल्या जाते. ते येऊन आबांना भेटतात आबा त्यांना सांगतात की, सोन्याच्या वर्तणूकी मुळेच सोन्या आज संकटात सापडलाय.
तुम्ही त्याचा एवढा लाड केला की त्याला पुरता बिघडवून ठेवलाय. या आश्रमातील सर्वात खोडकर मुलगा आहे तो. मला नेहमी हीच भीती होती की असे काही विपरीत घडू नये. असो. सध्या तुम्ही ईश्वराचे स्मरण करायला बसा. किसना आबा महादेवाचे एकनिष्ठ भक्त असतात ते सोन्याच्या कुशल मंगलतेसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करतात. तिकडे सोन्या एका सरोवरात पडतो व त्याला डोळ्यासमोर काही वेगळेच दिसायला लागते. तो एका भयानक साम्राज्यात जाऊन पोहचतो तिथे त्याला कुठेच उजेड दिसत नाही त्याला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याला तिथे एक धुरांनी बनलेला वायुक्त राक्षस कवट्याच्या आसनावर बसलेला दिसतो. त्याच्या बाजूला एक काळे कुत्रे बांधलेले असते. त्या प्रेतराजच्या चारही बाजूला त्याचे अधीन भूत, प्रेत, आत्मे गोलाकार फिरत असतात. तो त्याच्या सहाय्यक प्रेतांना बोलतो की त्या जीवात्म्याला घेऊन या. सोन्याला प्रेत… प्रेतराज समोर हजर करतात. तिथे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे भूत, चुडेल, असे अनेक विचित्र दृष्ट आत्मे बघायला मिळतात. सर्व त्याला त्रास देतात. कुणी अपघातात, कुणी इच्छा अपूर्ण असताना मेलेले लोक आणि त्यांचे अतृप्त आत्मे भटकतांना दिसतात. सोन्या बोलतो मी तर टेकडीवर उभा होतो पण माझा पाय सटकला व मी खाली पडलो पण मी इथे कसा आलो. प्रेतराज बोलला तू आला नाहीस तुला आम्ही आणल इथे, तुझ्यावर तर आमची दृष्टी खूप वर्षा आधीच होती. जेव्हा तुला आश्रमात आणले तेव्हा तुझ्या गुरूंनी तुला रुद्राक्ष दिला होता तो तू गळ्यात धारण केला नाहीस. कलावा हातात बांधायला तुला आवडत नाही. तेव्हाच आम्हाला समजल होत की तूच आमच्या इच्छा पूर्ण करू शकतोस. तू ज्या सरोवरात अंघोळ केली ते आमच अदृश्य सरोवर आहे ते जीवात्म्यांना दिसत नाही. तू जे काही फळ तोडून खाल्ली ती सुद्धा आमची आहेत. ती फळे नसून मासाची गोळे होती. तू सर्व नियम भंग करून भूतलावर जीवन व्यतीत करतो म्हणून तू आमच्या तडाख्यात सापडलास तू सध्या प्रेतलोकामध्ये आहेस.
आम्हाला जशी प्रवृत्ती पाहिजेत तू त्या प्रवृत्तीचा आहेस तुझी मानसिकता आमच्या सारखीच आहे. तुला सुद्धा दुसऱ्यांवर हुकुम गाजवायला आवडतो. दुसऱ्यांना विनाकारण त्रास द्यायला आवडतो. तू नित्य कुकर्म करतो. तुझ्या मित्रांना त्रास देतो. गुरूंचे ऐकत नाहीस. नेहमी असत्य बोलतोस. धर्म नियमानुसार तिथी, पवित्रता पाळत नाहीस. उद्धट सारखा बोलतोस. कुणाचाही अपमान करणे म्हणजे तुला विशेष वाटत नाही हि तुझी रुची आहे. नेहमी कामवासनेत तुझे मन अटकलेले असते. तुला मास-मदिरा सेवन करायला आवडते. या सर्व गोष्टी आमच्या सर्व प्रेतलोकांतील आहेत. हीच तर आमची प्रवृत्ती आहे. म्हणून आम्ही तुला आता पकडले आता तुला आम्ही सोडणार नाही. आता आम्ही तुझा आत्मा इकडे बंदिस्त करणार आणि तुझ्या शरीराच्या माध्यमातून आमच्या सर्व अतृप्त इच्छा पूर्ण करणार आणि सर्व त्याला पछाडतात. त्याला अतिशय वेदना होतात. त्याला त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन दाखवतात. त्याला उचलून पटकतात, त्यावर काळ्या मांजरी सोडतात, त्याच्यावर वाटवाघुळ हल्ला करतात. त्याला असह्य वेदना होतात. त्याला एका शिळेला बांधून ठेवण्यात येते.
तिथे त्याला एक चांगला प्रेतात्मा भेटतो…. तो बोलतो पोरा इतक्या दिवस आश्रमात राहलास तुला मंत्र येत असतीलच त्यांचा उच्चार कर म्हणजे तू इथून सुटू शकतोस. मी दुसऱ्या लोकातील आहे मरणाच्यावेळी माझ्यात चांगले भाव होते म्हणून मी चांगला भूत बनलो. तू एक काम कर सध्या कृष्णपक्ष सुरु आहे सध्या या प्रेतांची शक्ती वाढलेली असते. अजून काही दिवस यांचा त्रास सहन कर. दोन दिवसांनी अमावस्या आहे त्या दिवशीच हे प्रेत तुझा देह धारण करतील. त्या दिवशी तर यांची शक्ती फारच वाढलेली असते. त्या दिवशी तुला हे जास्त त्रास देतील तुला जर गुरूची शिक्षा लक्षात असेल तर तस कर म्हणजे तुला वेदना कमी होतील. अमावस्ये नंतर शुक्ल पक्ष सुरु होतो त्यादिवशी जर तू इथे मंत्र उच्चारण करत बसला तर तू तुझ्या शरीरात जाऊन तुझ्या आप्तांजवळ जावू शकतोस आणि तो चांगला भूत निघून गेला.
पण सोन्याला काहीच आठवत नाही कारण त्याने कधीच त्यात रस घेतलेला नसतो त्याला फक्त उनाडक्या करणे आवडायचे. तो मनाशीच पुटपुटला मी तर कधीच काही शिकून घेतले नाही गुरुजी सांगायचे तेव्हा मी दुसऱ्यांच्या खोड्या करायचो आता मी कुठून मंत्र उच्चारू ? मला तर एक पण मंत्र येत नाही.  मी कधी कुठल्या देवाची पूजा केली नाही. आणि विचार करू लागला आठवू लागला त्याला गुरुजींनी काय काय शिकवलेलं आहे. आपण जीवनात कधीच गंभीर नव्हतो म्हणून आपल्याला काही येत नाही. आणि सोन्याला त्रास द्यायला प्रेत तिथे आली व त्यांनी सोन्यावर चमकणारी कुत्री छुवाडली…सोन्या कावरा-बावरा होऊन पळू लागला… काळ्या मांजरी त्याच्या गळ्याला चावा घेत होत्या…आणि तीतक्यात सोन्याला समोर एक प्रचंड काळ्या धुरांनी व्यापलेला, धग धगत्या आगीसारखा लालबुंद डोळे असलेला एक पिशाच्च समोरून येतांना दिसला आता तो सोन्यावर तुटून पडणारच तर… मध्ये कुणीतरी आडव आल आणि त्याने सोन्याला बाजूला सारल कोण असावे ते आपल्याला वाचवायला आल असेल असे सोन्या विचार करू लागला. पण सोन्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती कि ते रक्षण करायला आले कि त्याला नष्ट करायला… महाभयंकर दानव सोन्याच्या प्रतीक्षेत होता.
क्रमश:

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही. यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

तिच्या मिलनाची आतुरता…….

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीवचा – दुसरा भाग

तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती ….. आता पुढे

तो तिच्याकडे सरकला पण त्याने कधी कल्पना सुद्धा केलेली नसावी कि असे काही होऊ शकते म्हणून. जसा तो तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरसावला तसाच त्याच्या घराजवळ राहणाऱ्या आजीबाईने त्याला थांबवलं….. “आजी बाई बोलल्या पोरा कुठं रे चालला… दिसत नाई व्ह्यय पुढं नाला हाय त्यो” जा बाबा जा थकून आला असशीन तू काई खाल्लंय कि नाई सकाय पासन. आणि आजीबाई निघून गेल्या. हा सुद्धा घरात आला फ्रेश झाला आणि विचार करू लागला कि ती आली होती कि हा आपला भास आहे, तेवढ्यात त्याला घरात रोजप्रमाणे मांजरींचे रडणे एकू आले. एका मांजरीने त्याच्यावर झेप घेतली तो दचकला. तेवढ्यात आजीबाई आल्या पोरा हा घे च्या…… पी. काई खाल्ल की नाइ आणि तवा कुठ रे चालला होतास ? पुढ नाला वायतो हे बी दिसलं नाय व्हय तुला……….. पडला असता त्यात अन काई झाल असत मंग……. काई इचार-बिचार त कराचा की चाल्ल आपलं कुठ बी…….. तो आजीला सांगू लागला की आजी मला इथे या काही दिवसात काही सुचत नाही काय होतंय माझ्या सोबत तर. मला वाटते की गावाकडे जाऊन याव. आजी बोलली मंग जा की लेकरा…… तुझे आई-बाप पण याद करत असतीन बग तुझी, जा कर तयारी. तो पण मनाशी बोलला येऊ २ दिवस राहून थोडं फ्रेश वाटेल व जे घडतेय यावर पण काही उपाय निघेल म्हणून तो गावी जाण्यासाठी तयारी करू लागला त्याने बॅग भरली आणि आजी ला सांगितले कि मी दोन दिवस गावी जाऊन येतो. तो गावी जाण्यासाठी निघाला….. बस ने गावाकडे निघाला बस मध्ये त्याला त्याच्याच गावचे एक बाबाजी भेटले त्यांनी स्वतःहून त्याला येणाऱ्या संकटाचे पूर्वसंकेत दिले त्याच्या गप्पा रात्रभर रंगल्या त्याला सुद्धा थोडा धीर आला तो त्याच्या घरी गेला… गेल्या बरोबर त्याच्या आईच्या गळ्यात पडला व रडू लागला त्याने त्याच्या घरी तिकडे घडत असलेला सर्व वृत्तांत सांगितला तसे त्याच्या आईने तर त्याला तिकडे परत जाण्यास मनाई केली कारण शेवटी ती आई तिची ममता आड आली…… पण त्याच्या वडिलांनी मुलाच्या जीवनाचा विचार केला कि हातची नोकरी सोडून कस चालेल. इथे गावात परत उनाडक्या केल्या पेक्षा बरा आहे तिकडे दोन पैसे तरी कमावतोय. शेवटी ते वडील त्यांना सर्व जबाबदारी बघावी लागते…… त्यांनी सांगितले कि घाबरायचे कारण नाही गावातील बाबाजी यावर काही तोडगा नक्कीच काढतील मग तो दोन दिवस त्याच्या मित्रांना भेटला आणि त्यांना तिच्या बद्दल विचारू लागला त्यांनी ते आधी जिथे भेटायचे त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी केली. शेवटी तो दिवस आलाच सकाळ झाली तशी जाण्याची तयारी करू लागला. तशी त्याची आई बोलली बाळा उद्याची तर अमावस्या आहे तू ती झाल्यावर जा पण तो बोलला की सुट्टी संपली मला कामावर जावच लागेल. त्याची आई म्हणे ठीक आहे आम्ही पण येतो मग तिकडे. तेव्हा त्या बाबाजींनी सांगितले कि गड्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेव. घरात सकाळ संध्याकाळ तरी देवपूजा करत जा. आणि तुला ताईत दिला तो गळ्यात ठेवत जा. बेटाईम कुठे हि फिरत नको जाऊ. निर्जन जागी जाण्याचे शक्यतो टाळावे, आणि इकडे जसा उनाडक्या करायचा,घरच्यांचं एकत नव्हतास पोरांसोबत कुठेही केव्हाही रानमाळात फिरणे,नदी-नाल्यात पोहायला जाणे असे धंदे बंद करायचेत आता. दोन दिवसाने तुझे लग्न करावे लागेल लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार करत जा. त्याचे बाबा बोलले तुला आताच्याच गाडीने जायचं तू जा पण आम्ही व बाबाजी दुपारच्या गाडीनं येतो घरची सर्व काम निपटून. मग बघू तिकडे आल्यावर काय करता येईल ते. तो हो बोलला (पण हा कसला देवपूजा आणि बाकीचे सांगितलेले करतो हा पक्का नास्तिक माणूस,या सर्व गोष्टीला न मानणारा, लोक आपल्याला काय म्हणतील या विचाराने ग्रासलेला) आणि निघाला गाडीत बसला आणि पोहचला तिकडे दुपारी. दरवाजा उघडला घर आवरले थोडा आराम केला आणि उठल्यावर बघतो ते काय त्याला एक चिट्ठी दिसली
त्याने ती उचलली आणि वाचू लागला त्यात लिहिलं होत कि मला तुला भेटायचे आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. मी तुझी या ठिकाणी वाट बघेल. त्याने तिला भेटायला जाण्याचा निश्चय तर फार पूर्वीच केलेला होता. मनोमन एवढा खुश झाला की उघड्या डोळ्याने तिच्या मिलनाचे स्वप्न रंगवू लागला. त्याने विचार केला कि दोन तासात तिला भेटून येऊ तो पर्यंत आई-बाबा काही येत नाहीत. आलेच तर आजी जवळ चिट्ठी देऊन ठेऊ आणि आजीला सांगून पण ठेवले की आई-बाबा आले तर त्यांना तुझ्या जवळ बसवून ठेव मी येतोच बाहेर जाऊन व तिथे तिला भेटायला जाण्याची तयारी केली. घराच्या परसबागेतून गुलाबाचे फुल सोबत घेतले. थंडीचे दिवस असल्याने उबदार व पावसा पासून रक्षण करणारे कपडे घातले,गवतातून जाव लागेल म्हणून चांगले बूट घातले, मोठा टॉर्च सोबत घेतला,सिगारेट चे पाकीट आणि सोबत लायटर तर होतेच पठ्ठयाकडे. सिगारेट साठी पण होते आणि काही काम पडले तर उपयोग पण होते.
वेळ संध्याकाळची होती त्याला फक्त तिचाच ध्यास कि एकदा तिला कधी भेटतो असं झालेलं तो निघाला पावसाळ्याचे दिवस त्यात सर्वत्र पाऊस पडून गेलेला आणि आजू बाजूने ठीक ठिकाणी डबके साचलेले त्यामधील बेडकांचा डराव….डराव आवाज, काजव्यांचे चमकणे, लाइटावरील किड्यांचा तो नकोसा वास,वातावरणातील गारवा,झाडाखालून जातांना अंगावर पडणारे पाण्याचे थेंब हे सर्व त्याला तिला भेटण्याचा उत्साह वाढवत होते, पण त्याला माहित नव्हते कि हे सर्व त्याच्यावर येणाऱ्या संकटा पूर्वीची शांतता आहे. हातात टॉर्च आणि गुडघ्या पर्यंत वाढलेल्या गवतातून वाट शोधत तो निघाला, गवतातून सळसळणारा आवाज जीवाचा थरकाप उडवत होता. तरी देखील नदी-नाले ओलांडत त्याचे पावलं सरसावत होती. नियोजित जागी पोहचला तेव्हा रात्र झाली होती पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरलेले. तिथे दूर दूरवर कुणीच नव्हते तो त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबला बघतो तर आजूबाजूला कुणी चिट-पाखरू सुद्धा दिसत नाही मनातच पुटपुटला हिला पण काय हीच जागा मिळाली भेटायला. मस्त बागेत भेटलो असतो. तेवढ्यात त्याच्या पाठीला कडक स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले. त्याला एखाद्या वजनदार माणसाचा मोठा पहाडी आवाज त्याला आला, थोडा तो घाबरला. त्याचे मागे वळून पहायचे धाडस होईना पण त्याने हिम्मत करून मागे वळून बघितले. तर एक कुणी स्मशानात काम करणारा भला मोठा धिप्पाड माणूस तिथे उभा दिसला. तो बोलला कि ए……….. पोरा…….. इतक्या रातच्यान….या म्हसनात काय करून रायला ?
भ्याव वाटत नाई काय तुले…… एकट्या-दुकट्या न आस रातच्या बेरात्च्या फिरू नाइ……….. हे जागा कशी कोणी चीट-पाखरू बी दिस्ते काय तुले अठी, जागा पाय्न नाई……………टेम पाय्न नाइ…………दिस बी पावसायाचे अन चाल्ला मारे फिरयाले………… अरे लेका माय-बाप, घरची लोक वाट पायत असतीन न तुई…………..अठी बाजून नाला वाय्ते हातभर गवत वाढेल हाये………..इषारी जीव-जंतू असत्यात इचू-काटा काई निंगला त मंग कस करशीन……………..अठून जंगल चालू व्हते……………गाव संपल……….. अन आजची त्यातल्या त्यात अमावश्या आहे लेका……… अमावश्याच्या दिशी अस कोणी फिरते काय बाबू……..तुले काई कयते की नाइ……अठी जंगली कुत्रे, रानमाजरी असत्यात वटवाघुळ रायतात, त्या घुबळा पाय कश्या बोंबलुन राय्ल्या…… लगन-बिगन व्हयल आहे की संटया हायेस लेका…… अमावसेचा अंधार चांगला नसते, या दीशी कोणीच अस कुपा-काट्यात हिंडत नसते बॉ………………तू त काई अलगच धुंदीत दिसू रायला मले…… मी अठीच जरा दूरवर म्हसंखाईत काम करतो म्या बी म्हणून त चाल्लो लोकर घराकड……..चालतु काय………ओ…………..पोऱ्या चाल मी चाल्लो घराकड……………अबे लेका इतक्या टेम चा मी बोलू रायलो तू जरसाक बी घन घनत नाइ बे………………….तू बी चाल माया संग………एकाले दोन सोब्ती बरे रायतात. एवढ समजवल्या वर पण हा कशाचा ऐकतो. बोलला जा काका तुम्ही कशाला फालतू डोक लावता मी काय लहान आहे, काही झाल तर माझ मी बघून घेईल. तशी त्याची टरकलेलीच होती. पण याने बनावट हिंमतीचे प्रदर्शन केले. याने इथे पण स्वताच्या स्वभावाला महत्व दिले कुणाचे एकून न घेण्याचा स्वभाव आड आला. याने त्यांच्या कडे लक्ष दिले नाही व आपला तिथेच बसला तिची वाट बघत.
वेळ झाली असावी अकरा ची बरीच रात्र झालेली हा तिच्या विचारात बुडालेला अधून मधून वटवाघुळांचा किलकिलाट जो मनाला कधीच भावात नाही, किर्रर्र.करणारे कीटक, त्यात पंख फुटलेल्या मुंग्या अंगावर पडायच्या यामुळे तो परेशान झाला, वरून थंडी व कधीही पाऊस पडेल अशी स्थिती, सिगारेट वर सिगारेट फुकन सुरूच. त्याचा पूर्ण मूड ऑफ झाला होता, त्याला भूक पण जोराची लागली होती, त्याने घराकडे निघायचे असे ठरवले तितक्यात कुणीतरी समोरून धावत आणि कर्कश…अजिब आवाजात हूंह्ण ही ही हीही हीहिं ह्रो व्ह्या हूंह्ण हीहिं ही ही ही हीहिं ही ह्रो असे विचित्र स्वर त्याला कानी पडत होते…त्याला कोणी धावत आहे असे जाणवले. तसा तो थबकला त्याची तर पूर्ण “टांगा पलटी घोडे फरार” अशी अवस्था झाली होती……….कुठे पळाव…………काय कराव काही सुचेनास झाल……….कोण असाव ओरडणार ? का ओरडत असाव ? आपल्या मागे का लागल ते ? पूर्ण घाबरला….पळता पळता….ओल्या गवतावरून किती वेळा घसरून पडला. बघतो तर आवाज येन बंद झाला होता. त्याच्या हातातील टॉर्च पण कुठेतरी पडला. इकडे तिकडे बघत होता त्याच्या लक्षात आल की आपण तर खूपच दूर आलो तिने दिलेली जागा कुठे आहे ती पण दिसत नाही. आणि तेवढ्यात राज्या….ओ…..राज्या…… असा आवाज आला. आवाज हा ओळखीचा वाटतो असे त्याला वाटले पण ओरडण्याचा व भेदरलेला आवाज कुणाचा असावा ? त्याने आवाजाच्या दिशेने जायला पावलं उचलले……..थोडा समोर गेला तेव्हा त्याला ती दिसली एका पडक्या वाड्याजवळ उभी….. तिथे त्याला झाडे रंगीबेरंगी प्रकाशाने उजळलेली दिसली तो विचारात पडला की त्या काकाने तर सांगितले होते की आज अमावस्या आहे मग इथे एवढा प्रकाश कसा काय ?
आणि झाड सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे वाटते म्हणून हे दृश्य अनुभवायला मिळत असेल असा तो मनाशीच पुटपुटला…..आज तर ती आणि मी दोघच आहोत आज कुणीच नाही थांबवू शकत आमच्या मिलनाला……पण भयावह रात्र त्याची प्रतीक्षा करत होती याची त्याला कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात…..

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीव

Horror story in buldana

राज्या हा गावचा मुलगा. घरची परिस्थिती उत्तम. घरच्या सर्वांचा हा लाडका नेहमी हसत खेळत राहणारा, रोज मित्रांसोबत पारावर गप्पा टप्पा करणारा अतिशय बोलक्या स्वभावाचा. नेहमी स्वप्नातील परीला वास्तव्यात शोधण्याच्या प्रयत्नात, मित्रांसोबत उनाडक्या करणे मनाला भावेल तसे वागणे कधी कुणाचे ऐकायचे नाही आपले तेच खरे. बाकी कुणी काहीही बोलो आपण आपल्या मनाप्रमाणेच वागणार असे त्याने त्याचे ठरवलेले. कुठेहि भांडणे होवोत त्यात याचा पहिला नंबर, अभ्यासा कडे फारशे लक्ष नाही. शाळेत असतांनाच प्रेमात पडला. कॉलेजात असताना तिला मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ती मिळाली आणि काही दिवस तो खूप खुश होता पण काही दिवसानेच त्याच्या प्रेमाला कुणाची नजर लागली कुणास ठावूक ? एक दिवस रोज प्रमाणेच पारावर आला आणि रडू लागला, म्हणे तिला तिच्या घरच्यांनी बाहेरगावी पाठवले. त्या दिवसा पासून बोलका राज्या अशांत झाला अबोला झाला. आणी बाहेर गावी गेला काही दिवसासाठी तिकडून परतला कुणाला काही कळायच्या आतच त्याने सर्वांना सांगितले की मी पण मोठा होणार चांगला पैसा कमवणार स्वतःचे स्वप्न आणि तिला मिळवण्यासाठी कसे-बसे शिक्षण पूर्ण केलेले होतेच. घर सोडले, मी बाहेरगावी एका मिल मध्ये नोकरी शोधली.
त्याने त्याच्या उनाडक्या करणाऱ्या मित्रांना सांगितले की, मला बाहेर गावी नोकरी मिळाली मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय आहे. मला सकाळच्या गाडीने निघावं लागेल. ठरल्या प्रमाणे तो त्याच्या प्रवासाला निघाला तिथे पोहोचला तर यक्ष प्रश्न पडला इथे राहायचे तर कुठे ?
त्याने राहण्यासाठी घर शोधणे सुरु केले फार प्रयत्नांती त्याला घर मिळाले. घर अशा ठिकाणी मिळाले की घराबाजूला एक नाला वाहायचा घरा जवळ स्मशान शांतता पसरलेली होती अर्थात तुरळक वस्ती त्याने पूर्ण घर बघितले त्याला ते आवडले कारण ते त्याचे भाडे त्याला परवडणारे होते. त्याने ते घर भाडयाने घेतले आणि तिथे तो एकटाच राहू लागला. त्याचा त्या घरातील पहिला दिवस. संपूर्ण दिवसभर साफ सफाई करण्यात गेला. रात्री घरातील कामे आटपून तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला परंतु नवीन जागा असल्याने त्याला शांत झोप येईना. हे रोज असं चालायचं. कसातरी तिथे तो रूळला. तसा त्याला शेजार पण चांगला मिळाला होता शेजारीच आजीबाई आणि त्यांचा मुलगा राहायचा. आजीबाई मन मिळाऊ होत्या त्यांनी त्याला पहिल्याच दिवशी मदत केली होती, अधून मधून त्याच्याकडे यायच्या त्याच्याशी बोलायच्या त्यामुळे त्याला आपलं कुणी आहे असे वाटायचे. तो त्याचा निवांत वेळ आजीबाईच्या गोष्टी ऐकण्यात घालवायचा.
त्या दिवशी घरी यायला जरा उशीरच झाला. शांत वातावरण आणि अंधाराचे साम्राज्य त्यातच कुत्र्यांचे भुंकणे अजूनच काळजात धस्स करायचे. सोबतीला घरा जवळून वाहणाऱ्या नाल्याचा घाणेरडा वास घरात डोकावू पाहत होता. एकंदरीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होत. आज अमावस्या आहे हे नंतर कळून आलं आणि त्याची अजून टरकली.
घर आवरुन तो जेवायला बसला तर पुन्हा कुत्र्यांचे रडणे सुरु. तो जेवण सोडून कुत्र्याला हाकलायला निघाला तर समोर एकही कुत्रा नाही. अचंबित होऊन तो घरात आला आणि पुन्हा जेवायला बसला. थोडक्यात जेवण उरकून हातावर तंबाखू मळत असतानाच घराच्या छतावर ठक…ठक असा ठोकण्याचा आवाज आला पण त्याने दुर्लक्ष केले. झोपण्यापूर्वी त्याच्या मनात आले कि आपण हे आजीबाईंना सांगावं का ? पण त्या आपल्याला काय म्हणतील या विचाराने तो शांत बसला.
झोपण्यासाठी अंथरुणात शिरला तेव्हा त्याच्या मनात न राहवून येत होते कि आज रोज पेक्षा काहीतरी वेगळं घडतंय, रात्रीचे २ वाजले त्याला झोप येत नव्हती घरात काही वेगळाच भास त्याला होत होता त्याला जवळ कुणी असण्याची जाणीव होत होती, जशी जशी रात्र वाढत होती तसा तसा तो भिंतीचा व घराच्या छताचा आवाज वाढत होता जणू कोणी घर ठोठावतेय…त्यात त्याच्या हृदयाचे पण ठोके वाढत होते त्या असह्य जाणिवेतच हा झोपी गेला. सकाळी नेहमी प्रमाणे उठून घरात झाडू मारत असतांना त्याला एक लांबच लांब… काळा… केस दिसला त्याने तो केस उचलून बघितला तर तो घाबरला कि आपण इथे एकटे राहत असतांना हा एवढा मोठा केस इथे आला कुठून ? इथ तर आजूबाजूला कुणी मुलगी राहत नाही मग घरात केस कसा काय? यावेळी त्याने पक्का विचार केला कि आपण आजीबाईंना विचारू त्या आपल्याला काहीही म्हणो…. तसाच तो आजीकडे गेला व त्याने घडत असलेले सर्व सांगितले… त्यावर आजीबाई बोलल्यात … पोरा असं काई बी नसत… तुला भास झाला असावा…. आपुन कि नाई दिसभर जे काई मनात इचार करतो तेच आपल्याले सप्नात दिसते. म्हणून तर म्हणत्यात ना “जे मनी वसे ते कल्पी दिसे” आजीबाई ने त्याची समजूत काढली व त्याला मस्त चुलीवरचा च्या दिला प्याला. मस्त बशीतून च्या पिला अन मनातच विचार करत घरी आला तयारी केली अन कामाला गेला.
हे रोजच व्हायला लागलं. त्याचे दिवस रात्र या विचारताच निघून जायचे आणि रोज त्या घरात काहींना काही विचारांच्या पलीकडे घडायचे, कधी त्याला झोपल्यावर आपल्या बाजूला कुणाचे अस्तित्व जाणवायचे तर कधी मांजरींचे रडण्याचे आवाज ऐकू यायचे असेच दिवस जात होते तशी तशी त्याची चिंता वाढत होती. एकदा सकाळी तो कामावर जायची तयारी करत असताना दरवाज्यावर थाप पडली….. पाहतो तर काय एक सुंदर मुलगी त्याच्या दृष्टीस पडली…तिचे ते लांब रेशमी केस…त्या केसांच्या लटा चेहऱ्यावर येत होत्या एक सुंदर असे प्रतिबिंब. तिची छाप त्याच्या मनावर कोरल्या गेली, जणू त्याला त्याची तीच परी भेटावी…!
असा त्याला आनंद झाला होता. त्याचे मन सारखं तेच तेच खुणवत होत कि हि आपलीच आहे इथे अचानक कशी आली, शोधत आली असावी आपल्याला. पण दरवाज्या जवळ जाताच ते प्रतिबिंब काहीसे अस्पष्ट होतांना त्याला जाणवले व एकाएकी नाहीसे झाले त्याला वाटले भास झाला असावा. स्वताशीच बडबडत आपण जास्तच मूर्खपणा करायला लागलो. तो कामावर निघाला एका पानपट्टी वर थांबला चहा पीत-पीत सिगारेट ओढत असतांना त्याला तीच परत एका झाडा खाली उभी दिसली पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस सुरु आहे म्हणून उभी राहिली असावी असे त्याच्या मनात वाटले. तसे त्याने तिच्या कडे जाण्यासाठी पावलं उचलले तेवढ्यात तिथून एक गाडी गेली आणि बघतो तर काय ती दिसे-नाशी झाली. पण मनात सारखे अंतर्द्वंद्व सुरु होते की का कुणास ठाऊक आपल्याला हे का दिसते ? कोण असावी ती मुलगी ? आपली तीच असती तर असे का वागली असती घरच्यांची भीती वाटत असेल कदाचित. पण आपल्याला पाहून का दूर झाली. असे कित्येक प्रश्न त्याच्या मनात सुरु होते. परत तो त्याच्या मार्गी लागला कामावर पोहचला काम सुरु झाले पण कामात लक्ष लागत नव्हते दिवसभर सारखे ते प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात तरळायचे. तिच्या त्या आठवणीत तो जगत होता. त्याला ती जाणीव अस्वस्थ करायची. संध्याकाळी सुट्टी झाली तेव्हा रिम झिम पाऊस सुरु होता तरी तो निघाला वाटेत असतांनाच पाऊस थांबला. पंख फुटलेल्या मुंग्या सर्वत्र उडत होत्या, त्याला कुणीतरी मागे असल्याचा भास झाला पण त्याने दुर्लक्ष केले घरी पोहचला.
वेळ रात्रीची होती गेट जवळ जाताच त्याला वाटले कुणी तरी बाजूला आहे त्याने न राहवून बाजूला बघितले तर चिंब पावसाने न्हाहून निघालेली नवतरुणी त्याच्या दृष्टीस पडली…. त्याला खूप आनंद झाला की तू आलीस मला भेटायला असा तो पुटपुटला…..तिचे ते लांब केस पाण्याने ओले झालेले आणि आंब्याच्या मोहोरा सारखी मोहरून निघालेली ती तरुणी तिचे लावण्य जणू मोहवून टाकत होते, तिचे आरक्त डोळे त्याला जणू काही सांगत होते…तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि तो अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात ….