खामगाव : भरधाव दुचाकी ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १५ नोव्हेंबर रोजी रात्री खामगाव-नांदुरा मार्गावरील पारखेड फाट्याजवळ घडली.
या अपघातात मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील रहिवासी दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले आणि परेश सुरेश घुले या तिघांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही मित्र दुचाकीने मलकापूरहून नांदुराच्या दिशेने जात होते. दरम्यान, पारखेड फाट्याजवळ दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोर जात असलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुक्मिणी फाउंडेशनचे संजय खंडेराव यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


