चिखली (MH28.in Buldana News): प्रेमसंबंधासाठी पहिल्या पतीला सोडले आणि प्रियकरासोबत नवा संसार थाटला; मात्र वर्षभरानंतर पुन्हा जुन्या पतीशी सूत जुळताच प्रेयसीने आपल्याच प्रियकराचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिखली हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. काल, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी चिखली तालुक्यातील कव्हळा ते महिमळ या कच्च्या रस्त्यावर हा रक्तरंजित थरार घडला.
गोपाल ऊर्फ संजय मंजुळ पवार (रा. टाकरखेड हेलगा, ता. चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आमडापूर पोलिसांनी संशयित आरोपी कोमल भोसले (रा. वर्दडा) आणि तिचा पहिला पती अजय ऊर्फ गोट्या विजय पवार या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमका काय आहे हा प्रेमत्रिकोण?
पोलीस तक्रारीनुसार, कोमल भोसले आणि अजय पवार हे पूर्वी पती-पत्नी होते. त्यांचा संसार सुरू असताना कोमलचे टाकरखेड हेलगा येथील गोपाल पवार याच्याशी प्रेमसंबंध जुळले. प्रेमापोटी कोमलने अजयला सोडण्याचा निर्णय घेतला आणि समाजाच्या प्रथेनुसार दोघांनी फारकत घेतली. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून कोमल आणि गोपाल पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते.
पुन्हा जुन्या पतीशी जुळले सूत अन् रचला खुनाचा कट
गोपालसोबत संसार सुरू असताना कोमलची पुन्हा तिचा आधीचा पती अजय याच्याशी जवळीक वाढली. दोघांमध्ये पुन्हा प्रेमसंबंध सुरू झाल्याने कोमल आणि अजयने मिळून गोपालला कायमचे संपवण्याचा कट रचला.

दुचाकीवरून फिरायला नेले अन् वाटेतच घात केला
रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गोपाल आणि कोमल दुचाकीवरून पांढरदेव येथे जाण्यासाठी निघाले होते. पूर्वनियोजित कटानुसार कोमलने अजयला कव्हळा ते महिमळ रस्त्यावर बोलावून घेतले होते. या निर्जन रस्त्यावर दोघांनी मिळून गोपालवर चाकूने सपासप वार केले. छाती, पोट आणि गळ्यावर गंभीर वार झाल्याने गोपाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
खामगाव-नांदुरा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू
खून केल्यानंतर स्वतःच मृताच्या भावाला केला फोन
या चिखली हत्याकांड घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास स्वतः कोमलने गोपालचा चुलत भाऊ मनोज पवार याला फोन केला. आपण आणि अजयने मिळून गोपालला चाकूने मारले असून त्याचा मृतदेह महिमळ रस्त्यावर पडला असल्याची माहिती तिने दिली. नातेवाइकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता गोपाल मृतावस्थेत आढळून आला.
आमडापूर पोलिसांची तत्पर कारवाई; दोघांना अटक
हत्येनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मनोज पवार यांनी आमडापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि सायंकाळपर्यंत कोमल व अजय या दोघांनाही अटक केली. या घटनेचा पुढील तपास आमडापूर पोलीस करत आहेत.


