खामगाव : भरधाव दुचाकी ट्रकला पाठीमागून धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १५ नोव्हेंबर रोजी रात्री खामगाव-नांदुरा मार्गावरील पारखेड फाट्याजवळ घडली. या अपघातात मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील रहिवासी दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले आणि परेश सुरेश घुले या तिघांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेमुळे मुक्ताईनगर तालुक्यावर आणि मृतकांच्या गावांवर शोककळा पसरली आहे. दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले आणि परेश सुरेश घुले, अशी अपघातात मृत पावलेल्या तिन्ही तरुणांची नावे आहेत.
शेगाव दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही मित्र दुचाकीवरून शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन ते आपल्या गावाकडे परतत असताना, मलकापूर-नांदुरा मार्गावरील पारखेड फाट्या जवळील जिओ पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वीच देवदर्शन करून आनंदाने निघालेल्या मित्रांवर अवघ्या काही क्षणात काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अज्ञात वाहनाचा शोध सुरू
या भीषण अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन आणि त्याचा चालक अद्याप निष्पन्न झालेला नाही. अज्ञात वाहनचालकाची ओळख पटविण्याचे आणि अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. एकाच गावातील आणि तरुण वयातील तिघा मित्रांच्या अचानक जाण्याने संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही मित्र दुचाकीने मलकापूरहून नांदुराच्या दिशेने जात होते. दरम्यान, पारखेड फाट्याजवळ दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोर जात असलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुक्मिणी फाउंडेशनचे संजय खंडेराव यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह रुग्णवाहिकेतून सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.


