काका आणि लाकूड तोडणारे भूत

लोडशेडिंग असल्याने आधी सर्वच त्रस्त होते. पण सर्वात जास्त त्रास शेतकरी लोकांना व्हायचा आणि अजूनही काही ठिकाणी तीच परिस्थिती आहे. दिवसातून १२ तास लोडशेडिंग असल्याने लाईट येईल तेव्हा शेतात जाऊन पिकास पाणी द्यावे लागायचे. मग त्यासाठी कुठला वार अन कुठलं काय ? कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री शेतात जाऊन हे काम करावे लागते.. अख्खी रात्र जागून काढावी लागते. अशाच एका अमावस्येच्या रात्री पिंपळगाव येथील हरिभाऊ (काका) आपल्या शेतात पिकास पाणी पाजण्यास गेले.

काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरींना समान पाणी सोडले. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता. शेत गावाबाहेर आणि जंगली भाग असल्याने फक्त अंधार आणि रातकिड्यांची साथ ती काय होती बाकी कुणी नाही. आपल्या खिशातून बिडी काढली आणि हरिभाऊने शिलगावली आणि ओढत बसले. ती ओढून झाल्यावर थोडं आंग टाकू म्हणून ते मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते झोपले. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो सदाशिव! काकांना आवाज देऊन तो उठवीत होता.

काका उठल्यावर तो म्हणाला, ‘हऱ्या, झोपलायस काही काम नाही का?’ काका म्हणाले, ‘अरे सर्व सरींना पाणी सोडलेय. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ. पण तु इथे काय करतोयस?’ अरे तुझ्याकडेच आलोय, सदा बोलला. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते. दिवसा डोँगरात फॉरेस्टवाला (वनरक्षक) असतो. म्हणून म्हटलं रातच्याला जाऊ. चल आता घेऊन येऊया. तुलाही आता तसे काही काम नाही आता. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, ‘चल ठीक आहे, जाऊया’.

काकांनी जवळची बॅटरी घेतली आणि दोघेही गप्पा करीत डोंगराकडे निघाले. ते कधी डोंगरात पोहोचले. काकांनाही समजले नाही. काका त्याला बोलले, ‘बरं चल तोड आता तुला हवे ते लाकुड’. तो म्हणाला, ‘जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत’. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला.

काका दत्तमार्गी होते. नेहमी देवपूजा, नामस्मरण करायचे. आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किंवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते. त्यांना दरदरून घाम फुटला होता. अचानक ते जागेवर थांबले आणि त्याला म्हणाले, ‘कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?’. आता तो मित्रही थांबला. पण आता त्याचा आवाज बदलला होता. आता तो काकांचा मित्र नव्हता. त्याला काकांना त्याच्या हद्दीत न्यायचे होते. पण काका शुद्धीवर आले होते. तो काकांना म्हणाला, ‘वाचलास तू’! आणि क्षणार्धात गायब झाला. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन थेट शेतात पोहोचले. मूर्च्छा येऊन हरिभाऊ तिथेच पडले ते थेट सकाळी हॉस्पिटलमध्ये भानावर आले.

सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडीतून घरी आणावे लागले. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मात्र हरिभाऊ कधीच रात्री शेतात गेले नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.