• Home  
  • लोणार सरोवराचा जागतिक स्तरावर गौरव! ‘जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या’ प्रतिष्ठित यादीत समावेश
- ब्रेकिंग न्युज

लोणार सरोवराचा जागतिक स्तरावर गौरव! ‘जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या’ प्रतिष्ठित यादीत समावेश

बुलढाणा (MH28.in Buldana News):महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा गौरव करण्यात आला असून, सरोवराचा ‘थर्ड 100 वर्ल्ड जिओलॉजिकल हेरिटेज साइट्स’ (Third 100 World Geological Heritage Sites) या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, […]

Lonar Lake World Geological Heritage Site

बुलढाणा (MH28.in Buldana News):महाराष्ट्रासह संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा गौरव करण्यात आला असून, सरोवराचा ‘थर्ड 100 वर्ल्ड जिओलॉजिकल हेरिटेज साइट्स’ (Third 100 World Geological Heritage Sites) या प्रतिष्ठित यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय खाण मंत्रालयाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, या जागतिक सन्मानाने गौरविण्यात आलेले लोणार सरोवर हे भारतातील दुसरे स्थळ ठरले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये मेघालयातील मावमलुह गुहेचा (Mawmluh Cave) पहिल्या यादीत समावेश करण्यात आला होता.

इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेस (IUGS) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेने लोणार सरोवराची या मानाच्या स्थळासाठी निवड केली आहे. जानेवारी २०२६ मध्ये कोलंबिया देशातील बोगोटा येथे पार पडलेल्या IUGS च्या ८२ व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत लोणार सरोवराच्या नामांकनाला प्राथमिक मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर पोर्तुगालमधील अल्गार्वे येथे आयोजित ‘IUGS Geoheritage Event 2026′ या सोहळ्यात या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.

लोणार सरोवर

सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी एका अतीवेगवान उल्कापिंडाच्या बेसॉल्ट खडकावरील आघातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली होती. बेसॉल्ट खडकांच्या प्रदेशात उल्कापातामुळे निर्माण झालेले आणि खाऱ्या व अल्कधर्मी (Saline and Alkaline) पाण्याचे स्वरूप लाभलेले हे जगातील एकमेव मोठे विवर सरोवर आहे. याआधीच या ऐतिहासिक सरोवराला ‘रामसर स्थळ’ (Ramsar Site) आणि ‘राष्ट्रीय भूवैज्ञानिक वारसा स्मारक’ (National Geological Heritage Monument) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या जागतिक मान्यतेमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा बूस्ट मिळणार असून हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था, स्थानिक मार्गदर्शक आणि इतर पूरक व्यवसायांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे, लोणार सरोवरातील माती आणि खडकांमधील खनिजांचे रासायनिक स्वरूप थेट चंद्रावरील नमुन्यांशी साधर्म्य दर्शवते. त्यामुळे या जागतिक मान्यतेमुळे NASA आणि ISRO सारख्या जागतिक संशोधन संस्थांच्या माध्यमातून ग्रहविज्ञान (Planetary Science) व अवकाश संशोधनाला एक नवी दिशा मिळण्याची अपेक्षा वैज्ञानिक वर्तुळात व्यक्त होत आहे.

lonar sarovar

या ऐतिहासिक सन्मानामुळे भविष्यात लोणार सरोवराच्या UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीतील समावेशासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या गौरवामुळे आता महाराष्ट्राची व भारताची ओळख आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक नकाशावर अधिक ठळक झाली आहे.

MH28.IN @2018. All Rights Reserved.   /    Developed by advendesign