आयपीएलच्या 7 पर्वामधील सुरुवातीचे काही सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या सत्रातील सामने भारतातच होणार आहेत. बीसीसीआइने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. 13 मे नंतरचे सामने भारतातच होणार आहेत, असेही या पत्रकात लिहिण्यात आले आहे.
16 एप्रिल ते 1 जून या काळात ही स्पर्धा होणार आहे. एक मेपासून भारतात सामने खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बीसीसीआयने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली आहे. त्याला मंजुरी दिली, तर 30 एप्रिलनंतरचे सामने भारतात खेळवण्यात येतील. अन्यथा 13 मेपर्यंतचे सामने संयुक्त अरब अमिरात किंवा बांगलादेशमध्ये खेळवले जातील, असे या पत्रकात नमूद केले आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 16 ते 30 एप्रिलदरम्यान होणारे सामने संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये हे सामने खेळवले जातील. या काळात तिथे एकूण 16 सामने होतील. एमिरट्स क्रिकेट मंडळाने सामन्यांना परवानगी दिल्यामुळे बीसीसीआयने त्यांचे आणि संयुक्त अरब अमिरात सरकारचे आभार मानले आहेत.