शाळेला सुटी लागली की गावाकडं जायचो. तिथे अमोल,सुरज,विक्या आणि मी अशी आमची चांडाळ चौकडी होती .दिवस उजाडला की, सगळे आमच्या अंगणात हजर व्हायचे. गावी गेल की, दरवेळी मला सगळे भूताखेताच्या गोष्टी सांगायचे. मला जाम इंटरेस्ट होता यात. “एके दिवशी मी सगळ्यांना जमवल आणि मला भुत बघायचं आहे असं सांगितलं. यावर सगळ्यांनी माझ्याकडे करंट लागल्यासारख बघितलं, “वैभ्या खुळा झालायस का लेका,म्हणे भुत बगायचं आहे,” अमोल म्हणाला.
“अरे खरच मला बघायचं आहे काय आहे ते” यावर विक्या म्हणाला, “शाळेजवळच्या पिंपळाखाली अमावस्येच्या राती बारानंतर भुत येतंय असं सगळी म्हणत्यात जा आणि बग जा” यावर सुरज्यान त्याला एक बुक्की घातल. ,“लेका का मारतोस का काय त्याला?” “
ठरलं तर येत्या अमावसेला मी त्या पिंपळाखाली भुत बघायला जाणार” मी म्हणालो. नाही होय करत अखेर सगळे जण त्या पिंपळाखाली जायला तयार झालो. चार दिवसानंतर अमावस्या होती. घरातून सोडणार नाहीत म्हणून आम्ही चार दिवस रोज शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या गावदेवीच्या देवळात झोपायला जाऊ लागलो. देवळात आमच्या शिवाय गुरवाच कुटुंब झोपायला होत. गुरव रोज रात्री आम्हाला भूताखेतांच्या गोष्टी सांगायचा. शेजारच्या गावची पुजा करून परतताना त्याला रात्र झाली आणि चकव्याने त्याला कस चकवल,असे एक ना अनेक किस्से तो अगदी रंगवून सांगायचा. रात्रीची वेळ असल्याने आम्हालाही भीती वाटायची.एकमेकाला चिटकून आम्ही झोपी जायचो.
रोज किस्से ऐकल्यामुळे आता मला भूत या गोष्टीवर विश्वास बसायला लागला होता.दुसऱ्याच दिवशी अमावस्या होती.रात्री पिंपळाच्या झाडाखाली जायचे होते.जावं की नाही याबाबत आता माझे दुमत होत होते मोठ्या फुशारकीने सगळ्यांना मला भुत बगायचे आहे सांगितले होते. आता माघार घेतली तर सगळे माझ्यावर हसतील म्हणून मी शेवटी,काय होतंय बघू जायचेच भुत बघायला असे ठरवले. देवळाकडे गेलो,अजून विक्या,अमोल,सुरज्या आले नव्हते. येतील की नाही….मला टांग देतील का. बर होईल नाही आले तर आपण उद्या त्यांच्यावरच ढकलू, तुम्हीच आला नाही नाहीतर मी जाणार होतो पिंपळाखाली. पण एक एक करून सगळे हजर झाले.
साडेअकरा झाले तसे सगळ्यांच्या मनात धाकधूक सुरु झाली.देवळापासून काही अंतरावर शाळा होती.शाळेच्या जवळच ते पिंपळाच झाड होत. झाडाकडे जाणाऱ्या वाटेवर सगळीकडे अंधार पसरला होता. कुठेही नावाला सुद्धा प्रकाश नव्हता. नुसती अंधुकशी पायवाट दिसत होती. त्यात रातकिडे किरकीर करत होते. मधेच एखादे कुत्रे भुंकत होत. भयाण असं ते वातवरण होत.आम्ही पिंपळाकडे चालू लागलो. येताना खिश्यातून छोटा टॅार्च आणला होता त्याच्या उजेडात आम्ही चालत होतो. मधेच एखादे कुत्रे केकाटायचे. आम्ही दचकत होतो.सगळे एकामागे एक चालत होतो.एकमेकांचे श्वासोच्छवास स्पष्ट ऐकू येतील एवढी शांतता होती, झाड जवळ येईल तस माझे मन घाबरू लागले. झाडाचा पार जवळ आला तस मी आणि अमोल पारावर चढलो मागे बघतोय तर सुरज आणि विक्या गायब!अमोल घाबरला, “आरं, ती दोघ कुठ गेली? कुठ गायब झाली एकाएकी,वैभ्या लेका पळ”.
त्याने पारावरून उडी मारली आणि तो पळाला. मी सुद्धा त्याच्या मागून उडी मारण्यासाठी पुढे झुकलो तर माझ्या शर्टला मागून कुणीतरी जोरात ओढून धरले. माझे अवसान गळले.भीतीने घाबरगुंडी उडली. माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती.परत एकदा पुढे झुकलो तर परत तेच मागून ओढून धरले. मी पुरता घाबरलो. मोठ्याने रामरक्षा म्हणू लागलो. थंड वारा असून मला घामाच्या धारा सुटल्या. कुठून बुद्धी सुचली आणि मी भुत बघायला आलो असं वाटलं. आता आपलं काही खरं नाही. मी मनातल्या मनात त्या भूताची माफी मागितली आणि मला जिवंत घरी जाऊदे म्हणून विनवणी करू लागलो. एवढ्यात मागे काहीतरी टपकन पडल्याचा आवाज आला. मी घाबरून जोरात पारावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. टर्र्कन आवाज आला आणि मी पारा खाली पडलो. मी मागे न बघत पळत सुटलो. घशाला प्रचंड कोरड पडली होती. कसाबसा देवळापर्यंत पळत आलो तिथे अमोल सुरज विक्या कुणी नव्हते. देवळाचा दरवाजा बंद होता तसाच घरी पळत सुटलो आणि एकदाचा धडपडत घरी पोहचलो. धडाधडा दार वाजवले. गड्याने दार उघडले त्याला ढकलून मी आजीच्या अंथरुणात घुसलो.सकाळी उठलो तेव्हा मला थंडी वाजून ताप आलेला.
रात्रीचा सगळा प्रकार आज्जीच्या कानावर घातला. सुरज,अमोल,विक्या सगळे मला बघायला सकाळी घरी आले. त्यांना पाहिल्या बरोबर मी कचकचीत चार शिव्या दिल्या. अमोल म्हणाला, “अरे मी तुला पळ म्हणून सांगितल की, तू आलाच नाहीस. विक्या आणि सुरज्या आधीच मागे फिरले होते. आम्ही देवळाजवळ तुझी वाट पाहिली. तू काय आला नाहीस म्हणून घाबरलो आणि घरी गेलो”. मी माझ्यासोबत काय झाल ते सांगितल.
एवढ्यात गुरव एका फडक्यात गुंडाळलेले घड्याळ घेऊन आला.तो म्हणाला पिंपळाजवळ पडले होते.सकाळी पुजेला गेलेलो तेव्हा सापडलं. तुझ्या हातात बघितल होत, “घड्याळ तर माझेच आहे आणि हा माझ्या शर्टचा तुकडा आहे,” मी म्हणालो. आम्ही सगळे पिंपळा जवळ पोहचलो.तिथले दृश्य पाहून मला सगळा प्रकार लक्षात आला आणि मी हसू लागलो. त्या झाडाला कुणीतरी खिळा मारला होता.त्या खिळ्याला रात्री माझा शर्ट अडकून फाटला होता. त्या झाडाची वाळलेली फांदी पडल्याने टपकन असा आवाज आला होता. सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्याने बाकीचे पण हसू लागले.
“भूतबित काही नसत रे आपल्या मनाची भीती आपल्याला अधिक घाबरवते” मी त्यांना समजावत होतो. पण काल रात्री माझी किती टरकलेली ते मलाच माहिती.
– निशा सावरतकर