राज्य शासनाने राज्यात प्लास्टिक बंदी चा मोठा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी पण होतांना दिसून येत आहे. प्लास्टिक बंदी नंतर सोलापूर, पुणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई झाली तर मुंबई मध्ये सुद्धा अनेक जण प्लास्टिक बंदी झाल्यानंतर कारवाईचे बळी पडले. संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी सुरु झालेली असून बुलडाणा शहरात सुद्धा याची सुरुवात झालेली दिसून आली.
प्लास्टिक बंदी झाल्यांनतर अनेक दुकान किंवा भाजी विक्रेत्यांचा खोळंबा झालेला दिसून आला. त्यापॆक्षा जास्त ग्राहकांची गैरसोय झालेली दिसून आली. नेहमीप्रमाणे फक्त नावापुरती बंदी असून छुप्या पद्धतीने का होईना प्लास्टिक बॅग मिळेल या आशेवर अनेक जण तर काही जण माहिती नसल्याने व नेहमीच्या सवयीनुसार बाजारात, दुकानात गेले परंतु घेऊन जायला कुठलंच साधन नसल्याने खाली हाताने परत जावे लागले तर काही ग्राहकांना इतर सोय करावी लागली. सुट्ट्या दुधाची विक्री करणाऱ्या अनेक दुकानांवर प्लास्टिक कॅरीबॅग मिळत नसल्याने ग्राहक पुन्हा घरी जावून भांडे घेऊन येत होते तर अनेक जण वेळेअभावी कंपनीचे पिशवीबंद दूध घेऊन जाणे पसंद करीत होते. प्लास्टिक चा वापर करतांना दिसून आल्यास दंडही तेवढाच प्रचंड प्रमाणात आकारण्यात येत असल्याने कुणीही हा धोका पत्करायला तयार नाही. शहरातील अनेक मटण विक्रेत्यांची आणि ग्राहकांची यावेळी मोठी गोची विशेष करून होतांना दिसून येत होती. अनेक जण दुकानावर जावून हात हलवत परत येत होते आणि घरून स्टीलचा डबा आणि पिशवी घेऊन येतानाचे दृश्य प्रत्येक ठिकाणीच पाहायला मिळत होते.
प्लास्टिक बंदीनंतर सोशल मीडियावर अनेक जोक्स चा पाऊस पडत आहेत आणि जनजागृती सुद्धा आपसूकच होतांना दिसून येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर सक्रिय असलेल्या पर्यावरणप्रेमींनी मात्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्लास्टिक बंदी पहिल्यांदा झालेली नाही या आधी सिक्कीम राज्यात 1998 साली प्लास्टिकबंदी करण्यात आली. त्या नंतर सिक्कीम सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत सरकारी कार्यक्रम आणि कार्यालयांमध्ये पाण्याच्या बाटल्यांवरही बंदी घातली. प्लास्टिक बंदी नंतर सिक्कीम मधील जनतेस अनेक अडचणी आल्या परंतू त्यासुद्धा निकाली निघाल्यात आणि सिक्कीम प्लास्टिक बंदी करणार पहिलं राज्य ठरलं. आता महाराष्ट्र सुद्धा त्या पाठोपाठ अग्रेसर आहे.