अखेर अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे. मोताळाहून नांदुरा येथे जाण्यास प्रवाशांना अनेक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागायचा. तासनतास प्रवाशांना बसची वाट बघत ताटकळत राहावं लागायचं आणि त्याचा फायदा काळी पिवळी आणि अवैध प्रवाशी वाहतूक करणारे घेत असत. प्रवाशांच्या जीवाशी खेळत वाहतूक होत होती. परंतु आता या मार्गावर जळगाव जामोद आगाराने प्रत्येक अर्ध्या तासाला नांदुरा बस स्थानकाहून शटल बस सेवा सुरु करून प्रवाशांना आधार दिला आहे तर अवैध प्रवाशी वाहूतक करणाऱ्यांना धक्का !
नांदुरा ते मोताळा या मार्गावर दिवसभरातून अत्यंत कमी बससेवा चालतात. त्यामुळे अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांचे फावते. ही गोष्ट लक्षात घेवून अखेर जळगाव जामोद आगाराने या मार्गावर शटल बस सेवा सुरु केली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यान प्रत्येक अर्ध्या तासाला नांदुरा बस स्थानकाहून बससेवा सुरु झाली आहे. तरी या मार्गावरील प्रवाशांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रा.प.म. जळगाव जामोद च्या वतीने करण्यात आले आहे. एमएच २८.इन तर्फे जळगाव जामोद आगार यांचे मनस्वी आभार तसेच हार्दिक शुभेच्छा.