आपली सर्वांची आवडती एसटी आता कात बदलणार आहे. तसे संकेत महामंडळाकडून मिळाले आहेत. यात प्रामुख्याने गाडीच्या छतावर असलेला सामानाचा ‘डोलारा’ काढल्या जाणार आहे. एसटी च्या छतावर असलेले हे लगेज कॅरिअर काढून टाकणार आहेत.
याशिवाय सध्या गाड्यांची बांधणी करतांना वापरण्यात येणारे अॅल्युमिनियम ऐवजी ‘माइल्ड स्टील’चा वापर होणार आहे. चालकासाठी पंख्याची व्यवस्था. बसमध्ये पुढे आणि मागे असे दोन आपत्कालीन दरवाजे. गाडीत दोन अग्निशामक यंत्रे. बसमध्ये पाचऐवजी आठ ठिकाणी एलईडी दिवे. खिडक्यांचा आकारही मोठा होणार आहेत शिवाय सोबत मनोरंजनासाठी संगीत यंत्रणा बसवण्यात येणार असून गाडीला मागे आणि पुढे असे दोन्हीकडे फलक लागणार आहे. ही निश्चित चांगली बाब आहे. या सोबतच गाडीच्या टपावर असलेले लगेज कॅरिअर काढून टाकण्यात येणार असून ते इतरत्र हलविण्यात येणार आहे. वोल्वो अथवा इतर लक्जरी गाड्यांना ज्या प्रकारे दोन चाकामध्ये समान ठेवण्याची जागा असते त्या सारखी जागा यापुढे एसटी मध्ये दिसून येईल. मात्र यामुळे जागा कमी होणार असल्याने १२ ते १५ कोटी रुपये वार्षिक उत्पन्नालाही महामंडळाला तोटा होणार आहे.