मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरूच आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ांतील काही भागांना शनिवारी सलग सहाव्या दिवशी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्य़ाला, तर मराठवाडय़ातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागला.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्याला, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगावलाही शनिवारी गारपिटीने तडाखा दिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ठिकठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारांमुळे किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा चिखल झाला. मराठवाडय़ातील परळीमध्ये अवकाळी पावसाने शनिवारी दोघांचा बळी घेतला, तर तालुक्यात २२ जण जखमी झाले.