प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेस सुरुवात

sailani baba darga

बुलडाणा येथून जवळच प्रसिद्ध सैलानी तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून अनेक भक्त सैलानी येथे येत असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सैलानी येथे भव्य दिव्य यात्रा भरत असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून. अनेक भक्त सैलानी येथे जात आहेत. बुलडाण्यातील एकमेव सर्व धर्मीय असे धार्मिक स्थान म्हणजे हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा होय. या दर्गेचे वैशिष्टे म्हणजे येथे फक्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील व विदेशातील देखील भक्त गण येथे दर्शनाला येतात.

बाबा सैलानीचे भक्त गण दरवर्षी ज्या क्षणाची प्रतीक्षा करता तो क्षण, तो दिवस म्हणजे होळीचा दिवस होय. आज होळी आहे या होळीच्या दिवसा पासूनच हाजी अब्दुल रहेमान सरकार सैलानी बाबा यांची दर्गा ला भव्य-दिव्य अशी यात्रा भरते या यात्रेचे खास वैशिष्ट म्हणजे नारळांची होळी पौर्णिमेच्‍या मुहूर्तावर पेटविण्यात येत असते. या प्रसंगी लाखो भाविक विविध व्याधीतून मुक्ती मिळविण्यासाठी बिबे, सुया, लिंबू टोचलेली नारळ येथे उतरवितात. याच नारळांची आगळीवेगळी होळी येथे पेटविली जाते. या होळी मध्ये जवळपास ४ ते ५ ट्रक नारळांची होळी ही पेटवली जाते. (यास जश्न-ए-उर्स शरीफ समारोह या नावाने देखील संबोधल्या जाते.) ही होळी प्रसिद्ध आहे. सैलानी बाबांच्या यात्रेमध्ये देशभरातून सुमारे ५ लाख भावीक दर्शनाला येतात. यावेळी सैलानी यात्रेस सुरुवात झाली असून अनेक यात्रेकरू सैलानी कडे मार्गस्थ होताना दिसून येत आहेत. बुलडाणा येथून सैलानी जाण्यास एस टी महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केलेली आहे.

दानवीय असुरी शक्ती झाली नतमस्तक

वेशीवरच भूत अंतिम भाग
गुरुभक्तीची महिमा परत गुरुभक्तांची रक्षणकर्ती झाली. तरी तिथे दानवीय शक्ती वावरत होती आणि सर्व लोक त्या अमानवीय शक्ती चा अंत बघण्यासाठी आतुरलेली होती. आता पुढे.

तसे विराट बोलला कोण हाये बे तो धिप्पाड पोऱ्या अन तुले कसा काय वयखते ? किशोर म्हणे अबे मले काय माहित कोण हाये तर मले त आज या भूतायन मांगचा जनम भी सांगितला की मले दोन भाऊ होते अन मोठा भाऊ राज्या होता अन लहाना भाऊ बिघडेल होता पण मले थोडी आठवते मांगचा जनम अशीन भी.. नशीन भी. नाहीतन हे भूत खोट बोलत असतीन आपल्याले फिरवत असतीन यायची प्रवृत्तीच आहे ती. तिकडे भूत आणि त्यांचे राक्षस कोणी आकाशी पाळण्यात तर कोणी कुठ जाऊन बसले. आणि युद्धाची तयरी करू लागले. महादू बुआ बोलले काय होवून रायले हे सायाचे काहीच समजून नाई रायल मले…. माय त डोक्स बंद बधीर झाल लेक हो. मांगच्या जन्मी काय पाप केलत की हा दिवस पाह्याले भेटला…!!
सुन्या बोलला आपल्या सगळ्यांची पळता भुई थोडी झालेली आहे……टांगा पलटी अन घोडे फरार अशी अवस्था त्यात आपुन सगळ्यांन जगण्याची आशा सोडलेली. सर्वांना कळून चुकले आज की आज आपली विकेट पडणार कुणाची आधी त कुणाची नंतर… पण नक्कीच पडणार रे भो.. जीव जाते आज आपला.
जाक्र्या म्हणे मले फकत अठीसाक तो पोऱ्या लय पटला…. वीराट्या बोलला कोनसा बे तोच धिप्पाड पोऱ्या…..किशऱ्याले कसा म्हणे मेरे यार….. मेरे भाई…. मेरे दोस्त अन गपागप बाटलीत भूत कोंबे.
तेवढ्यात सगळ्याचं हसण बंद झाल जनाबुढाच्या डोकश्यात भरभक्कम काही तरी त्या आग्या न फेकून हाणल अन बुडा पडला खाली. तसे सर्व ओरडायला लागले. बुडा रगत ओकू लागला. त्याले वाचवणार तितक्यात जाक्र्याच्या कानाखाली कोणी मारली अन जाक्र्या बेशुद्ध पडला. सगळे सैरा वैरा पळू लागले. आणि महादू बुआ पळत असताना एका भुताने बुआ चा पाय पकडला अन फेकल बुआले बुआ पडला कुपात जाऊन. साऱ्या अंगात काटे घुसले. सोपान्याच्या पायाचे लचके कोल्हे तोडत होती… महाभयंकर तो आवाज आणि सगळे जीव वाचवण्याच्या प्रयत्नात. रात्रीचे अडीच वाजले असावेत असे मन्या बोलला. आज आपण वाचणार की नाही हे तर माहित नाही पण इकडे तिकडे पळाल्या पेक्षा यांच्याशी दोन-दोन हात करूनच मरू. किशऱ्या म्हणे बरोबर आहे मन्याचे हि वेळ इकडे तिकडे पळायची नाही हि वेळ आहे एकत्र येण्याची आणि गुरुमंत्राचा जप करण्याची किशऱ्याने सर्वांना एकत्रित केले आणि सर्व एकाजागी बसून नामजप करत होते तेव्हा त्यांना कळल की असे केले की आपल्याला कुणी मारत नाही. आणि ते तेच करू लागले. आणि होत असलेल्या वेदना सहन करू लागले.
आणि त्यांची प्रतीक्षा संपली तिथे दत्ताआबा पोहचले.
त्यांनी सर्वात आधी गावकऱ्याना सांगितले की मी जसे सांगतो तसे करा. इथे मोठमोठी राक्षस, असुर, दैत्य, दानव उपस्थित आहेत. त्यामुळे थोडीशी चूक सर्वांचा अंत करु शकते. आबांनी सर्वांच्या बाजूला एक रिंगण आखले व सर्वांना सांगितले की या रिंगणाच्या बाहेर कोणी निघणार नाही. आणि सर्व लोक त्यात बसलीत आणि दत्ताआबा रिंगणाच्या बाहेर उभे राहून त्या धिप्पाड पोराला व दाढी वाल्या बुआ ला काहीतरी सांगत होते हे तीघ तिथे उभे राहून यांनी त्या राक्षसराजला चुनोती दिली आणि आबा ने शंख वाजवला तसे राक्षसांनी सुद्धा किंचाळायला सुरुवात केली आणि यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले ते एकमेकांवर वार करू लागलेत राक्षस चमकणारे गोळे फेकत होता तसे आबा त्यावर भस्म फेकत होते. असे हे खूप वेळ चालले… तिकडे धिप्पाड पोरगा भूत बाटलीत कोंबे…दाढी वाला बुआ त्या चूडेल, डाकिन. आग्या, वेताळ यांच्यावर धावून जाये. किशऱ्याला व बाकी रिंगणात बसलेल्याना काम दिल होत की गोवऱ्या जाळायच्या व सर्वत्र धूर करायचा. त्यात थोडे जडीबुटीची पावडर टाकायची. सर्व धूर करण्यात व बघण्यात मग्न होते सर्वांना छोटे छोटे कापडांचे तुकडे दिले होते ते सर्वांनी मनगटावर बांधले व सर्वांनी जोरजोरात ईश्वराचा नामघोष सुरु केला सर्व भूत प्रजाती हतबल झाल्या…. सर्व दत्ताआबाला विनवणी करू लागल्या की आम्ही परत अशे शक्तीचे प्रदर्शन करणार नाही. खोट-नाट बोलून लोकांना फसवणार नाही आणि आजच्या सारखे कुणाला कधीच त्रास देणार नाही. आम्ही शरण येतो आम्हाला क्षमा करा. तुमची शक्ती आमच्या पेक्षा महान आहे आम्हाला जाऊ द्या आम्ही परत गावावर आमची छाया पडू देणार नाही. आम्ही जंगलातच भटकत जाऊ. आम्ही जेवढ्या लोकांना त्रास दिला पछाडल त्यांना सोडून देतो. पण आम्हाला आमची हि सजा पूर्ण करू द्या. नाहीतर विधाता रागवेल. शेवटी आबा बोलले की या वेशीवरच्या भूतामुळे आमचा सर्वांचा लाडका दिप्या गेला त्यामुळे मी या भुताला क्षमा नाही करू शकत आणि आबाने वेशीवरच्या भुताला नष्ट केल. किशाऱ्या व सर्व दिप्या गेल्यामुळे शोक करू लागलीत व सर्व स्वताला दोष देऊ लागली…आबा बोलले पोर हो तुमच्या क्षणिक सुखाच्या नादात तुमच्या व्यसना पाईच आज दिप्या गेला. पण दिप्या काही काळानंतर परत येईल जनम घेऊन. राक्षसराज ला सुद्धा पश्चाताप होत होता. आबा बोलले की राक्षसराज तुम्हाला खरोखर तुमची चूक मान्य झालेली दिसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा अधर्माने कितीही पायमूळ पसरली तरी धर्माला ती परास्त करू शकत नाही. असत्य कितीही हुशारीने बोला ते सत्य लपवू शकत नाही. आबा लोकांना उद्देशून बोलले की लोकहो क्षणिक सुख शेवटी क्षणिकच असते. ते परम शांती कधीच देऊ शकत नाही.
किशोर बोलू लागला त्याने आबाचे पाय पकडले व क्षमा मागू लागला आणि बोलला मी आज तुम्हाला व सर्वांना साक्षी मानून शपथ घेतो की आजच्या नंतर कोणत्याच गलत गोष्टीत मन ठेवणार नाई. अन आबा जे सांगतात तेच करत जाईन. व किशोर ने शपथ घेतली. आबाला त्यांची नम्रता पाहून चांगले वाटले व आबाने किशोरला सांगितले की बाळ किशोर रडू नकोस शोक आवर स्वताचा एक दिवस हा दिप्या परत येईल दुसऱ्या कुठे तरी जनम घेऊन…आणि तुला तो परत मिळेल. तेव्हा त्याचा खूप लाड कर…आणि आज जे घडले असे कधी कुणासोबत घडणार नाही यावर कार्य कर…यालाच ध्येय समज आणि रक्षणकर्ता हो..! परत एकच सांगू इच्छितो हा तमाशा एक क्षणिक सुख आहे… आणि तुम्ही शहाणे असते तर तुम्ही त्याची पायरी चढले नसते. व्यसन हे कोणतेही असो ते शेवटी घातच करते म्हणून आजच याच ठिकाणी किशोर ने घेतली तशी शपथ घ्या की कुठल्याही क्षणिक सुखाच्या नादाला लागणार नाही आणि कुणाच्याही सांगण्यावरून कोणतच व्यसन करणार नाही. एवढी मोठी राक्षसांची, भूतांची प्रजाती त्यांच्या फालतूच्या अहंकारा पायी नष्ट होणार होती. ईश्वराला शरण जा….त्याची महिमा खूप मोठी आहे. त्याच्या कृपाप्रसादामुळेच मी आज तुम्हा सर्वांचा जीव वाचवू शकलो आणि शेवटी अमानवीय शक्ती दैवी शक्तीच्या पुढे हरली आणि नतमस्तक झाली.

ही काल्पनिक कथा असून त्याचा वास्तविकतेशी काही एक संबंध नाही.यातील नावे, ठिकाण, सर्व काल्पनिक आहे. फक्त मनोरंजनासाठी बनवली असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

पदवीधर मतदारांना नावे शोधण्यासाठी वेबसाईट विकसीत

buldana website for padaveedhar

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील बुलडाणा जिल्ह्यातील मतदारांची नावे कोणत्या मतदान केंद्रावर संलग्न आहेत, हे शोधण्यासाठी आज्ञावली विकसित केलेली आहे. ही आज्ञावली www.buldhana.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इच्छूक मतदारांनी या आज्ञावलीचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी बुलडाणा तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक जिल्हा बुलडाणा यांनी कळविले आहे.

source : ‘महान्यूज’

तिच्या मिलनाची आतुरता…….

तिच्या सोबतची ती रात्र…… एक असह्य जाणीवचा – दुसरा भाग

तिच्या मधुर हास्याला प्रतिसाद देत याने सुद्धा स्मित हास्य दिले….आणि अलगद तिच्याकडे सरकला……… पण पुढच्या येणाऱ्या वादळाची त्याला थोडी सुद्धा कल्पना नव्हती ….. आता पुढे

तो तिच्याकडे सरकला पण त्याने कधी कल्पना सुद्धा केलेली नसावी कि असे काही होऊ शकते म्हणून. जसा तो तिच्या जवळ जाण्यासाठी पुढे सरसावला तसाच त्याच्या घराजवळ राहणाऱ्या आजीबाईने त्याला थांबवलं….. “आजी बाई बोलल्या पोरा कुठं रे चालला… दिसत नाई व्ह्यय पुढं नाला हाय त्यो” जा बाबा जा थकून आला असशीन तू काई खाल्लंय कि नाई सकाय पासन. आणि आजीबाई निघून गेल्या. हा सुद्धा घरात आला फ्रेश झाला आणि विचार करू लागला कि ती आली होती कि हा आपला भास आहे, तेवढ्यात त्याला घरात रोजप्रमाणे मांजरींचे रडणे एकू आले. एका मांजरीने त्याच्यावर झेप घेतली तो दचकला. तेवढ्यात आजीबाई आल्या पोरा हा घे च्या…… पी. काई खाल्ल की नाइ आणि तवा कुठ रे चालला होतास ? पुढ नाला वायतो हे बी दिसलं नाय व्हय तुला……….. पडला असता त्यात अन काई झाल असत मंग……. काई इचार-बिचार त कराचा की चाल्ल आपलं कुठ बी…….. तो आजीला सांगू लागला की आजी मला इथे या काही दिवसात काही सुचत नाही काय होतंय माझ्या सोबत तर. मला वाटते की गावाकडे जाऊन याव. आजी बोलली मंग जा की लेकरा…… तुझे आई-बाप पण याद करत असतीन बग तुझी, जा कर तयारी. तो पण मनाशी बोलला येऊ २ दिवस राहून थोडं फ्रेश वाटेल व जे घडतेय यावर पण काही उपाय निघेल म्हणून तो गावी जाण्यासाठी तयारी करू लागला त्याने बॅग भरली आणि आजी ला सांगितले कि मी दोन दिवस गावी जाऊन येतो. तो गावी जाण्यासाठी निघाला….. बस ने गावाकडे निघाला बस मध्ये त्याला त्याच्याच गावचे एक बाबाजी भेटले त्यांनी स्वतःहून त्याला येणाऱ्या संकटाचे पूर्वसंकेत दिले त्याच्या गप्पा रात्रभर रंगल्या त्याला सुद्धा थोडा धीर आला तो त्याच्या घरी गेला… गेल्या बरोबर त्याच्या आईच्या गळ्यात पडला व रडू लागला त्याने त्याच्या घरी तिकडे घडत असलेला सर्व वृत्तांत सांगितला तसे त्याच्या आईने तर त्याला तिकडे परत जाण्यास मनाई केली कारण शेवटी ती आई तिची ममता आड आली…… पण त्याच्या वडिलांनी मुलाच्या जीवनाचा विचार केला कि हातची नोकरी सोडून कस चालेल. इथे गावात परत उनाडक्या केल्या पेक्षा बरा आहे तिकडे दोन पैसे तरी कमावतोय. शेवटी ते वडील त्यांना सर्व जबाबदारी बघावी लागते…… त्यांनी सांगितले कि घाबरायचे कारण नाही गावातील बाबाजी यावर काही तोडगा नक्कीच काढतील मग तो दोन दिवस त्याच्या मित्रांना भेटला आणि त्यांना तिच्या बद्दल विचारू लागला त्यांनी ते आधी जिथे भेटायचे त्या सर्व ठिकाणी जाऊन चौकशी केली. शेवटी तो दिवस आलाच सकाळ झाली तशी जाण्याची तयारी करू लागला. तशी त्याची आई बोलली बाळा उद्याची तर अमावस्या आहे तू ती झाल्यावर जा पण तो बोलला की सुट्टी संपली मला कामावर जावच लागेल. त्याची आई म्हणे ठीक आहे आम्ही पण येतो मग तिकडे. तेव्हा त्या बाबाजींनी सांगितले कि गड्या काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेव. घरात सकाळ संध्याकाळ तरी देवपूजा करत जा. आणि तुला ताईत दिला तो गळ्यात ठेवत जा. बेटाईम कुठे हि फिरत नको जाऊ. निर्जन जागी जाण्याचे शक्यतो टाळावे, आणि इकडे जसा उनाडक्या करायचा,घरच्यांचं एकत नव्हतास पोरांसोबत कुठेही केव्हाही रानमाळात फिरणे,नदी-नाल्यात पोहायला जाणे असे धंदे बंद करायचेत आता. दोन दिवसाने तुझे लग्न करावे लागेल लोक काय म्हणतील याचा थोडा तरी विचार करत जा. त्याचे बाबा बोलले तुला आताच्याच गाडीने जायचं तू जा पण आम्ही व बाबाजी दुपारच्या गाडीनं येतो घरची सर्व काम निपटून. मग बघू तिकडे आल्यावर काय करता येईल ते. तो हो बोलला (पण हा कसला देवपूजा आणि बाकीचे सांगितलेले करतो हा पक्का नास्तिक माणूस,या सर्व गोष्टीला न मानणारा, लोक आपल्याला काय म्हणतील या विचाराने ग्रासलेला) आणि निघाला गाडीत बसला आणि पोहचला तिकडे दुपारी. दरवाजा उघडला घर आवरले थोडा आराम केला आणि उठल्यावर बघतो ते काय त्याला एक चिट्ठी दिसली
त्याने ती उचलली आणि वाचू लागला त्यात लिहिलं होत कि मला तुला भेटायचे आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते, मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. मी तुझी या ठिकाणी वाट बघेल. त्याने तिला भेटायला जाण्याचा निश्चय तर फार पूर्वीच केलेला होता. मनोमन एवढा खुश झाला की उघड्या डोळ्याने तिच्या मिलनाचे स्वप्न रंगवू लागला. त्याने विचार केला कि दोन तासात तिला भेटून येऊ तो पर्यंत आई-बाबा काही येत नाहीत. आलेच तर आजी जवळ चिट्ठी देऊन ठेऊ आणि आजीला सांगून पण ठेवले की आई-बाबा आले तर त्यांना तुझ्या जवळ बसवून ठेव मी येतोच बाहेर जाऊन व तिथे तिला भेटायला जाण्याची तयारी केली. घराच्या परसबागेतून गुलाबाचे फुल सोबत घेतले. थंडीचे दिवस असल्याने उबदार व पावसा पासून रक्षण करणारे कपडे घातले,गवतातून जाव लागेल म्हणून चांगले बूट घातले, मोठा टॉर्च सोबत घेतला,सिगारेट चे पाकीट आणि सोबत लायटर तर होतेच पठ्ठयाकडे. सिगारेट साठी पण होते आणि काही काम पडले तर उपयोग पण होते.
वेळ संध्याकाळची होती त्याला फक्त तिचाच ध्यास कि एकदा तिला कधी भेटतो असं झालेलं तो निघाला पावसाळ्याचे दिवस त्यात सर्वत्र पाऊस पडून गेलेला आणि आजू बाजूने ठीक ठिकाणी डबके साचलेले त्यामधील बेडकांचा डराव….डराव आवाज, काजव्यांचे चमकणे, लाइटावरील किड्यांचा तो नकोसा वास,वातावरणातील गारवा,झाडाखालून जातांना अंगावर पडणारे पाण्याचे थेंब हे सर्व त्याला तिला भेटण्याचा उत्साह वाढवत होते, पण त्याला माहित नव्हते कि हे सर्व त्याच्यावर येणाऱ्या संकटा पूर्वीची शांतता आहे. हातात टॉर्च आणि गुडघ्या पर्यंत वाढलेल्या गवतातून वाट शोधत तो निघाला, गवतातून सळसळणारा आवाज जीवाचा थरकाप उडवत होता. तरी देखील नदी-नाले ओलांडत त्याचे पावलं सरसावत होती. नियोजित जागी पोहचला तेव्हा रात्र झाली होती पूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरलेले. तिथे दूर दूरवर कुणीच नव्हते तो त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबला बघतो तर आजूबाजूला कुणी चिट-पाखरू सुद्धा दिसत नाही मनातच पुटपुटला हिला पण काय हीच जागा मिळाली भेटायला. मस्त बागेत भेटलो असतो. तेवढ्यात त्याच्या पाठीला कडक स्पर्श झाल्याचे त्याला जाणवले. त्याला एखाद्या वजनदार माणसाचा मोठा पहाडी आवाज त्याला आला, थोडा तो घाबरला. त्याचे मागे वळून पहायचे धाडस होईना पण त्याने हिम्मत करून मागे वळून बघितले. तर एक कुणी स्मशानात काम करणारा भला मोठा धिप्पाड माणूस तिथे उभा दिसला. तो बोलला कि ए……….. पोरा…….. इतक्या रातच्यान….या म्हसनात काय करून रायला ?
भ्याव वाटत नाई काय तुले…… एकट्या-दुकट्या न आस रातच्या बेरात्च्या फिरू नाइ……….. हे जागा कशी कोणी चीट-पाखरू बी दिस्ते काय तुले अठी, जागा पाय्न नाई……………टेम पाय्न नाइ…………दिस बी पावसायाचे अन चाल्ला मारे फिरयाले………… अरे लेका माय-बाप, घरची लोक वाट पायत असतीन न तुई…………..अठी बाजून नाला वाय्ते हातभर गवत वाढेल हाये………..इषारी जीव-जंतू असत्यात इचू-काटा काई निंगला त मंग कस करशीन……………..अठून जंगल चालू व्हते……………गाव संपल……….. अन आजची त्यातल्या त्यात अमावश्या आहे लेका……… अमावश्याच्या दिशी अस कोणी फिरते काय बाबू……..तुले काई कयते की नाइ……अठी जंगली कुत्रे, रानमाजरी असत्यात वटवाघुळ रायतात, त्या घुबळा पाय कश्या बोंबलुन राय्ल्या…… लगन-बिगन व्हयल आहे की संटया हायेस लेका…… अमावसेचा अंधार चांगला नसते, या दीशी कोणीच अस कुपा-काट्यात हिंडत नसते बॉ………………तू त काई अलगच धुंदीत दिसू रायला मले…… मी अठीच जरा दूरवर म्हसंखाईत काम करतो म्या बी म्हणून त चाल्लो लोकर घराकड……..चालतु काय………ओ…………..पोऱ्या चाल मी चाल्लो घराकड……………अबे लेका इतक्या टेम चा मी बोलू रायलो तू जरसाक बी घन घनत नाइ बे………………….तू बी चाल माया संग………एकाले दोन सोब्ती बरे रायतात. एवढ समजवल्या वर पण हा कशाचा ऐकतो. बोलला जा काका तुम्ही कशाला फालतू डोक लावता मी काय लहान आहे, काही झाल तर माझ मी बघून घेईल. तशी त्याची टरकलेलीच होती. पण याने बनावट हिंमतीचे प्रदर्शन केले. याने इथे पण स्वताच्या स्वभावाला महत्व दिले कुणाचे एकून न घेण्याचा स्वभाव आड आला. याने त्यांच्या कडे लक्ष दिले नाही व आपला तिथेच बसला तिची वाट बघत.
वेळ झाली असावी अकरा ची बरीच रात्र झालेली हा तिच्या विचारात बुडालेला अधून मधून वटवाघुळांचा किलकिलाट जो मनाला कधीच भावात नाही, किर्रर्र.करणारे कीटक, त्यात पंख फुटलेल्या मुंग्या अंगावर पडायच्या यामुळे तो परेशान झाला, वरून थंडी व कधीही पाऊस पडेल अशी स्थिती, सिगारेट वर सिगारेट फुकन सुरूच. त्याचा पूर्ण मूड ऑफ झाला होता, त्याला भूक पण जोराची लागली होती, त्याने घराकडे निघायचे असे ठरवले तितक्यात कुणीतरी समोरून धावत आणि कर्कश…अजिब आवाजात हूंह्ण ही ही हीही हीहिं ह्रो व्ह्या हूंह्ण हीहिं ही ही ही हीहिं ही ह्रो असे विचित्र स्वर त्याला कानी पडत होते…त्याला कोणी धावत आहे असे जाणवले. तसा तो थबकला त्याची तर पूर्ण “टांगा पलटी घोडे फरार” अशी अवस्था झाली होती……….कुठे पळाव…………काय कराव काही सुचेनास झाल……….कोण असाव ओरडणार ? का ओरडत असाव ? आपल्या मागे का लागल ते ? पूर्ण घाबरला….पळता पळता….ओल्या गवतावरून किती वेळा घसरून पडला. बघतो तर आवाज येन बंद झाला होता. त्याच्या हातातील टॉर्च पण कुठेतरी पडला. इकडे तिकडे बघत होता त्याच्या लक्षात आल की आपण तर खूपच दूर आलो तिने दिलेली जागा कुठे आहे ती पण दिसत नाही. आणि तेवढ्यात राज्या….ओ…..राज्या…… असा आवाज आला. आवाज हा ओळखीचा वाटतो असे त्याला वाटले पण ओरडण्याचा व भेदरलेला आवाज कुणाचा असावा ? त्याने आवाजाच्या दिशेने जायला पावलं उचलले……..थोडा समोर गेला तेव्हा त्याला ती दिसली एका पडक्या वाड्याजवळ उभी….. तिथे त्याला झाडे रंगीबेरंगी प्रकाशाने उजळलेली दिसली तो विचारात पडला की त्या काकाने तर सांगितले होते की आज अमावस्या आहे मग इथे एवढा प्रकाश कसा काय ?
आणि झाड सुद्धा प्रकाशित होऊन डोलत आहेत, हि माझ्या आणि तिच्या मिलनाची उत्सुकता निसर्गाला पण आहे वाटते म्हणून हे दृश्य अनुभवायला मिळत असेल असा तो मनाशीच पुटपुटला…..आज तर ती आणि मी दोघच आहोत आज कुणीच नाही थांबवू शकत आमच्या मिलनाला……पण भयावह रात्र त्याची प्रतीक्षा करत होती याची त्याला कल्पना नव्हती.
क्रमश:
उर्वरित पुढील भागात…..

उद्या बुलडाण्यात संविधान जागर यात्रा

Buldana News

उद्या दि.२ डिसेंबर रोजी संध्या. ६. ३० वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे संविधान बांधिलकी महोत्सव अंतर्गत ‘संविधान जागर यात्रा’ येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंनिस, बुलडाणा आणि बुलडाणा जिल्हा सांस्कृतिक आघाडी तर्फे करण्यात आले आहे.

चिखली रोड बुलडाणा येथील सामाजिक न्यायभावनाच्या सभागृहात उद्या ही यात्रा येणार आहे. तरी संध्या. ६. ३० वाजता आपल्या मित्र परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मूकमोर्चा साठी बुलडाणा सज्ज

मराठा क्रांती मूकमोर्चा बुलडाणा येथे आज सोमवार २६ ला अखेर निघणार आहे. सोशल मीडिया, तोंडी, जाहिरात, बॅनर द्वारे सर्वत्र गेल्या महिनाभरापासून हाच विषय चर्चेत होता आणि अखेर तो दिवस आला. ह्या मोर्चासाठी जय्यत तयारी झालेली असून जिल्हाभरातून अनेक जण बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत. बोथा घाटातील अपघात वगळता अजूनतरी कुठेही अनुचित कार्य घडलेलं नाही. मोर्चासाठी तोबा गर्दी होणार हे सर्वश्रुत आहे आणि त्याची जाणीव इतर ठिकाणी झालेल्या मोर्चा मधून दिसून आलेली आहेच.

मराठा क्रांती मूकमोर्चासाठी जयस्तंभ चौकात पूर्ण तयारी झालेली असून पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. सतर्कता व मोर्चा शांततेत आणि कुठलेही अनुचित कार्य घडू नये या करीत पोलीस बंदोबस्त तैनात असून जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणाहूनही पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. सर्व कार्यालयीन कामकाज, शाळा- कॉलेज व दळणवळण यंत्रणा सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी भल्या पहाटेच बुलडाणा शहराबाहेर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत वातावरण बघून संपूर्ण शहर भगवेमय होणार यात तिळमात्र शंका उरली नाही आहे.

रेल्वे च्या शेवटच्या डब्यावर 'एक्स' अक्षर का असतं ?

Train in Buldhana

रेल्वेचा शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ अक्षर का असतं?

आपण रेल्वे ननेहमी बघतो. अनेकांना रेल्वेचा प्रवास खूप आवडतो. एकाला एक जोडलेले डबे, इंजिनच्या शिटीचा आवाज,गार्ड च्या हातातील कंदील अश्या अनेक गोष्टी आपल्याला कुतुहलाच्या होत्या आणि आहेत. तशीच एक गोष्ट म्हणजे रेल्वे ला असलेल्या शेवटच्या डब्यावर असलेल्या ‘एक्स’ अक्षराची. आपणास माहिती आहे का रेल्वेचा शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ अक्षर का असतं? तर चल जाणून घेवूया.

रेल्वे ला अनेक डबे जोडलेले असतात परंतु शेवटच्या डब्यावर ‘एक्स’ हे अक्षर असत. इतर डब्यावर असे कुठलेही सांकेतिक चिन्ह नसते. शिवाय या अक्षराच्या खाली उजव्या बाजूला ‘LV’ हे अक्षर असतात आणि मधोमध एक लाल लाईट चमकत असलेला आपण बघितलेला असेलच. याच काय महत्व आहे, आणि
का असतात हे चिन्ह याची आपण माहिती मिळवली नसेल तर ती जाणून घेवू.

‘एक्स’ या शब्दाचा अर्थ म्हणजे हा संकेत असतो की, हा रेल्वे चा शेवटचा डबा आहे. या ‘एक्स’ शब्दाचा उपयोग सकाळच्या वेळेस तर त्या खालील ‘लाल दिव्या’ चा उपयोग रात्री होतो. एखाद्या संकटकाळात अथवा अपघात किंवा इतर वेळेस डब्याच्या शेवटी हा ‘एक्स’ मार्क दिसून येत नाही अथवा शेवटचा डबा जोडलेला नसतो. असे असल्यास ताबडतोड रेल्वे विभागास याची माहिती दिली जाते आणि अपघात टाळण्यास मदत होते. या शिवाय डब्यावर आणखी अक्षरे असतात ती म्हणजे ‘LV’ चा अर्थ होतो ‘लास्ट व्हिकल’.

या नंतर जेव्हा पण
तुम्ही रेल्वे ने प्रवास कराल तेव्हा याकडे लक्ष असू द्या आणि अखेरचा डबा निश्चित बघा. ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा पोहोचावा जेणे करून त्यांना सुद्धा हे गुपित कळेल

बुलढाणा गौरव – नरेंद्र लांजेवार

Buldhana District

आपल्या लेखणीतून सतत काहीना काही लिहिणारे आपले लेखक, मार्गदर्शक आणि बुलडाणा जिल्ह्याचे गौरव ‘नरेंद्र लांजेवार’ जी यांचा आज वाढदिवस आहे त्याचे औचित्य साधून आपण आज त्यांच्या बाबतीत आपण आज जाणून घेणार आहोत.

नरेंद्र लांजेवार यांचा जन्म ११ मे १९६८ ला झाला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पत्रकारितेची पदवी पूर्ण केली. व्यवसायाने बुलडाणा येथील भारत विद्यालयात ग्रंथपाल असेलेल नरेंद्र लांजेवार यांनी अनेक ग्रंथलेखन केले आहेत. त्यामध्ये अभिव्यक्तीचे क्षितिजे, वाचू आनंदे मिळवू पपरमानंदे, बुलडाणा जिल्हा साहित्य दर्शन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या: चिंता आणि चिंतन,, कथांकुर अशी अनेक पुस्तके लेखन केली आहेत. याशिवाय २०० प्रासंगिक तथा वाङ्मयीन लेख लिहिले आहेत. दै.देशोन्नती., दै. लोकमत, दै. मराठवाडा, दै. तरुण भारत, दै. नवराष्ट्र, दै. सकाळ यासंह आत्मभान, महाराष्ट्र यांसारख्या साप्ताहिक मध्ये तसेच दिवाळी अंकात त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. नरेंद्र लांजेवार यांनी आकाशवाणी च्या जळगाव केंद्रावरून विविध कार्यक्रमांचे प्रसारण तथा ‘उगवतीचे रंग’, ‘बालवाडी’, ‘पुस्तक परिचय’, ‘पालक-बालक’, ‘साल आणि उकल’, ‘पाऊलखुणा’ इ,सदरांचे लेखन केले आहे.

नरेंद्र लांजेवार यांनी फक्त लेखनच नाही तर सर्वाना वाचनाची आवड लागावी. लहान मुलांना या डिजिटल युगात पुस्तक वाचण्यासाठी आणि आवड निर्माण होण्यासाठी बुलडाणा शहरात ५० पुस्तक्मैत्री बाल वाचनालयांची उभारण्याचे कार्य केले आहे. शिवाय नरेंद्र लांजेवार हे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे मुख्य संयोजक आहेत. आपल्या लेखणीने जिल्हावासियांवर ठसा उमटवणारे नरेंद्र लांजेवार यांना पत्रकारितेच्या तथा वाचन-लिखाणाच्या क्षेत्रातील विभागीय तथा राज्यस्तरावरील विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांना एम एच २८. इन तर्फे भरभरून शुभेच्छा. ते असेच आपल्या लेखणीतून आपणा सर्वाना ज्ञानरूपी अमृत पाजत राहो हीच सदिच्छा.

हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार

Buldhana

आपल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एक छोटस गाव म्हणजे भेंडवळ. एकण्यात आहे की येथील घट मांडणी ही प्राचीन परंपरा सुमारे ३००-४०० वर्षा पासून चालत आलेली आहे. या परंपरेची सुरुवात केली होती चंद्रभान महाराज यांनी आणि ही परंपरा पूर्ण विश्वासाने आजही जोपासली जाते. जी अक्षय तृतीयाच्या महापर्वावर वाघ परिवाराच्या वतीने साजरी केली जाते.

घट मांडणी दोन वेळा केली जाते :
ही घट मांडणी वर्षातून दोन वेळा केली जाते पहिली गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गावातील पारावर तर दुसरी अक्षय तृतीया या महा पर्वावर गावाजवळच्या पूर्वेकडील शेतात ही घट मांडणी केली जाते. असे असले तरी या दोन्ही मांडणी यामध्ये महत्वाच्या आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मांडणीतून मिळालेले संकेत आणि अक्षय तृतीया या महापार्वावर केलेल्या घट मांडणीतून मिळालेले संकेत या दोन्ही मांडणीतील संकेत जुळवून निष्कर्ष काढल्या जातो व भविष्य वर्तवले जाते.
ही मांडणी त्याकाळा पासून सुरु आहे जेव्हा हवामान खाते,पाऊस पाण्याची माहिती देणारे कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा पण जन सामान्यांपर्यंत ही माहिती पोहचवण्याचे कार्य केले आहे या भेंडवळ च्या मांडणीने. ही भेंडवळ ची घट मांडणी संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे या घट मांडणी कडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते. जो तो आपापल्या श्रद्धेनुसार या मांडणीवर विश्वास ठेवतो. हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा,विश्वासाचा भाग आहे.

अशा प्रकारे केली जाते घट मांडणी :
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी गावाजवळच्या पूर्वे कडील शेतात जे घट मांडणीसाठी निवडून ठेवलेले असते तिथे जातात. तिथे चंद्रभान महाराजांचा जयजयकार करतात. तिथे मोठे रिंगण आखतात त्याच्या मधोमध मोठा खड्डा तयार करतात त्या खड्ड्यात घट मांडणी करतात. वर्षा ऋतूतील चार महिन्यांची प्रतीके म्हणून चार मातीची ढेकळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेली छोटी घागर ठेवतात. घागर ही समुद्राचे प्रतिक मानल्या जाते. या घागरीवर पुरी पृथ्वीचे प्रतिक. पापड,सांडोयी-कुरडई चाऱ्याचे प्रतिक. वडा-भजा चवीचे प्रतिक. करंजी आर्थिक संपन्नतेचे प्रतिक. असे पदार्थ ठेवण्यात येतात. तसेच विड्याचे पान व सुपारी सुद्धा ठेवण्यात येते हे राजा व त्याच्या गादीचे प्रतिक आहे.
खड्ड्याच्या भोवती गोलाकार १८ धान्यांची रास मांडण्यात येते त्यात अंबाडी,सरकी,ज्वारी,तूर,मुग,उडीद,तीळ,भादली,बाजरी,हिवाळी मुग, धान, जवस, लाख, वाटाणा, गहू, हरभरा,करडी,मसूर. संध्याकाळी ही सर्व पूजाअर्चा विधिवत केली जाते. त्यानंतर सर्व घरी येतात रात्रभर याकडे कुणीही येत-जात नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी घट मांडणी ची बारकाईने पाहणी केली जाते रात्रभरात मांडणी मध्ये जो काही बदल घडून आला असेल त्यानुसार पिक पाणी, पर्जन्य, याविषयावर अंदाज व्यक्त करण्यात येतो.
चंद्रभान महाराजांचा जयजयकार करण्यात येतो. त्यांचे वंशज एक एक करीत सर्वच अंदाज व्यक्त करतात आणि शेतकरी बांधव ते लिहून घेतात व त्या प्रमाणे पिक पाण्याचे नियोजन केले जाते.

भेंडवळ च्या घट मांडणीतील यावर्षी २०१६ चे अंदाज : हे वर्ष भूमीपुत्रासाठी लाभदायक राहणार असल्याचे भेंडवळ घट मांडणीतून दिसून येते. यंदाचा पाऊस साधारण स्वरूपाचा राहील तसेच पहिल्या महिन्यात साधारण पण अधून मधून पाऊस पडेल. दुसऱ्या महिन्यात चांगल्या पावसा सह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर तिसरा महिना उत्तम पावसा सह अतिवृष्टी चा इशारा. अशा प्रकारचे अंदाज व्यक्त करण्यात आलेत. संपूर्ण देशात गुरांसाठी चारा-पाणी टंचाई राहील,तीळ हे पिक साधारण असून मुग,उडीद या पिकांची काही भागात नासाडी होण्याची शक्यता वर्तवली आहे. जवस तांदूळ या पिकांची सुद्धा नासाडी संभवते,गहू,हरभरा या पिकांना बाजारपेठेत तेजी मंदी असू शकते.
तसेच परकीय शत्रूंमुळे देशावर संकट येऊ शकते त्यामुळे संरक्षण विभागावर ताण वाढण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशावर आर्थिक स्थितीचे सावट येऊ शकते. राज्याला हे वर्ष ठीक नसून त्याच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकट येऊ शकतात. असेही अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. हे कितपत तंतोतंत खरे होऊ शकते हे ईश्वराला माहित. कारण आपण ईश्वर नसून आपण सामान्य माणूस आहोत त्यामुळे आपण विश्वास आणि श्रद्धेच्या बळावर फक्त तर्क वितर्क लावू शकतो. यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हा श्रद्धेचा विषय आहे.

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा

Buldhana hot in May2016

सध्या उन्हाळा सुरू असून त्यात सुद्धा मे महिना चालू आहे. रणरणत उन आणि जीवाची होणारी लाहीलाही यामुळे मनुष्य फारच वैतागलाय. काही वर्षाआधी उन्हाळा आला तरी जास्तीत जास्त तापमान हे २५ सेल्सीयस च्या घरात असायच त्यामुळे गरम वाटत असला तरी आल्हाददायक असायचा. परंतु काही वर्षापासून हाच उन्हाळा नकोसा वाटायला लागलाय. २५ सेल्सीयस च्या घरात असलेले तापमान आता ४० च्या वर गेले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करणे आणि आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात स्वत:ची काळजी कशी घ्याल ?
उन्हातून फिरताना डोळ्यांवर गॉगल घालावा. टोपी, स्कार्फ, सनकोट यांचा वापर करावा.
तसेच सनस्क्रिन लोशनही वापरावे. उन्हाचा त्रास होऊन मळमळत असेल तर वाळ्याचे पाणी प्यावे.
कमळाची फुले टाकून पाणी प्यावे. नैसर्गिक आंबट पदार्थ खाणे. उदा. चिंच, लिंबू, आमसूल, कैरी आदी. याच पदार्थांची सरबतेही मोठ्या प्रमाणात प्यावीत.
डोळ्यांची आग होत असेल तर, डोळ्यांवर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्यात. तसेच काकडी, कलिंगडाच्या साली डोळ्यांवर ठेवाव्यात. तळपायांची, हातांची आग होत असेल तर, खाद्य चंदनाची पाव चमचा पावडर नियमित खाणे.
पिंढ-या दुखत असतील तर, उन्हाळी फळे मोठ्या प्रमाणात खावीत. उदा. कलिंगड, खरबुज, शेंदाडं, द्राक्ष, काकडी आदी. डिहायड्रेशन होत असेल तर, इलेक्ट्राल पावडर पाकिटावर दिलेल्या प्रमाणातच पाण्यात मिसळून प्यावी. लाल तांदूळ किंवा अख्खा बासमती तांदूळ एक चमचा घेऊन त्यामध्ये एक ग्लास पाणी घालावे. ते उकळून त्यांची पेज करावी व तूप, मीठ घालून खावे. जुलाब/अपचन होत असेल तर, कुटज आणि सुंठाची पावडर करून अर्धा चमचा खावी.
उन्हाळी लागली तर, एक चमचा धने, एक चमचा जिरे पावडर एक लिटर पाण्यात 12 भिजवून ते पाणी प्यावे. वारंवार अपचन/अजीर्ण होत असेल तर बेलफळाचा मुरंबा खावा किंवा बेलफळाचे सरबच प्यावे.
अंगावर रॅश, घामोळे येत असेल कर वाळा व चंदन पावडर अंगाला लावावी. उन्हाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करावी. आंघोळीच्या पाण्यात वाळा, चंदन, नागरमोथा, कमळाच्या फुलांचे चूर्ण, गुलाब पाकळी मिसळून आंघोळ करावी. अतिउष्णतेने डोके दुखत असेल तर जेवणात नियमित कांदा खावा. उन्हाळ्यात लसूण खाऊ नये.
हे सर्व जर आपण नियमीत केलेत तर हा उन्हाळा सुद्धा आपल्याला आल्हाददायक जाणार यात शंका नाही.

विधानसभा निवडणुक 15 ऑक्टोबर

अखेर ठरल मग, विधानसभेचा बिगुल १५ ऑक्टोबर ला वाजनार. आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता प्रतिक्षा संपली असून सर्व राजकीय पक्ष आपापल्या कामाला लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 15 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने 20 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसुचना जारी होणार असून आचरसंहिता लागू करण्यात आली आहे.

उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठीची ही शेवटची तारीख 27 सप्टेंबर असून 1 ऑक्टोबर ला अर्ज छाननी होईल. त्या नंतर 15 ऑक्टोबर रोजी मतदान व 19 ऑक्टोबर ला मजमोजणी होणार आहे.

लिंबूपाणी – निरोगी आयुष्यासाठी

lemon, lime, लिंबूपाणी

चला आज आपण जाणून घेऊ या. लिंबूपाणी – निरोगी आयुष्यासाठी किती फायदेकारक आहे तर. लिंबूपाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच पोटॅशिअमचीही गरज पूर्ण होते. पोटॅशिअमुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि ब्लडप्रेशरवरही ताबा ठेवता येतो. तुम्हाला जर चहा कॉफीची सवय कमी करायची असेल तर लिंबूपाणी उत्तम.

लिंबूपाणी सेवनाचा आणखी एक फायदा तो म्हणजे रक्तशुद्धी ज्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होतेच आणि शरीर ताजेतवाने राहते. जीवनसत्वाने भरपूर आणि लाभदायक असे हे लिंबूपाणी कधीही सेवन केले तरी चालते मात्र रात्री जेवणानंतर घेऊ नये. हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

लय भारी च्या प्रमोशन दरम्यान १५ जखमी

अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी “लय भारी” चित्रपटाच्या प्रमोशन्स साठी औरंगाबाद मध्ये आला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जखमी झाले. औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्ये रितेश येणार अशी खबर मिळाल्याने अनेक तरुण-तरुणी मॉल मध्ये जमलेले होते. प्रोझोनचे तिन्ही जिने आणि फुटकोर्ट गर्दीने फुलून गेले होते. मात्र, रितेश आल्यानतंर त्याला एक नजर डोळा भरून पाहाण्यासीठी चाहत्यांनी रेटारेटी सुरु केली आणि गोंधळ उडाला. अनेकांचे कपडे फाटले तर, काहींचे महागडे मोबाईल आणि इतर वस्तू हरवल्या. मॉलमधील मुख्य स्क्रीनसमोर रितेश येऊन उभा राहिल्यानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. त्यातच हा प्रकार घडला. चाहत्यांची गर्दी एवढी होती की, उपस्थित असलेली पोलिस सुरक्षा व बाउन्सर कमी पडलेत त्याना गर्दी आवरने मुश्कील झाले होते.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला गारांचा तडाखा

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचे थैमान सुरूच आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्य़ांतील काही भागांना शनिवारी सलग सहाव्या दिवशी पाऊस आणि गारांनी झोडपून काढले. विदर्भात अकोला आणि बुलडाणा जिल्ह्य़ाला, तर मराठवाडय़ातील जवळजवळ सर्वच जिल्ह्य़ांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागला.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्याला, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगावलाही शनिवारी गारपिटीने तडाखा दिला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ठिकठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारांमुळे किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा चिखल झाला. मराठवाडय़ातील परळीमध्ये अवकाळी पावसाने शनिवारी दोघांचा बळी घेतला, तर तालुक्यात २२ जण जखमी झाले.

लोणार सरोवर

लोणार सरोवर

लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक सरोवर आहे.लोणार सरोवर याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर लोणार सरोवर असून औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे.

सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या लोणार सरोवर मध्ये मंगळावरील विषाणू सापडला असून ‘बेसिलस ओडीसी’ असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार सरोवर परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार सरोवर हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.