घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खणाणला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी… ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! त्यामुळे त्या सोयऱ्याच्या गावाला जायची गडबड सुरु झाली. रात्रीच्या गाडीने निघायचे होते. त्यामध्ये आम्ही फार लहान होतो. आम्हांला घरी सोडूनही कसे जावे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत घेऊनही कसे जावे ? हाच प्रश्न बाबांना पडला होता. एकवेळ बाबा म्हणालेही, तुम्ही भावंडे घरीच राहा, आम्ही जाऊन उद्या परत येतो. पण आपल्या वासरांना एकटे सोडून निघेल ती माय कसली. तिने हट्टच धरला ! त्यांना एकटे सोडून जायचे नाही, आपल्या सोबतच घ्यायचे. मग अशा वेळेला नाही म्हणणे तरी कुठे जमणार होते. म्हणून त्यांनाही लगेच होकार दिला आणि आवरून निघालोच आम्ही गावी जायला.
रात्रीची एकच ट्रेन होती आम्हांला त्या गावी जाण्यासाठी, तिनेच लवकर पोहोचू या विचाराने ती ट्रेन पकडली. कारण मरते वेळी आपण तिथं नव्हतो निदान मयतीला (मयत विधीला) तरी हजर पाहिजेच, ह्याच विचाराने बाबांची घाई सुरू होती. रात्रीचा प्रवास, कडाक्याची थंडी आणि झोपेची घाई, सर्व काही एकदमच. पण प्रसंग आणि ओढच अशी होती की, काही केल्या पोहोचायचेच होते लवकर. ते गावही तसे फार दूरच होते आणि ट्रेनने जायचे तर एका दुसऱ्या स्टेशनला उतरून पुढे मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा होता.
रात्री अंदाजे २ वाजता आम्ही त्या स्टेशनवर उतरलो . सर्वत्र अंधार पसरलेला. स्टेशनही असे सामसूम होते. बराच वेळ स्टेशनच्या बाहेर थांबलो, पण चिटपाखरूही दिसत नव्हते. पुढे जाण्यासाठी एखादी गाडी येते का ? याची आम्ही वाट पाहत होतो. तितक्यात एक ट्रक समोरून आला. थोडं बरं वाटलं, चला जास्त वाट पहावी लागली नाही. पण जसं ठरवलं तसं न होणेच, असेच काही आज नशिबी होते. बाबांनी ट्रक वाल्याला थांबवले, त्याला सांगितले की आम्हांला अमुक-तमुक गावी जायचे आहे, पण तो म्हणाला, “”म्या तर दुसरीकडं चाललोया बघा, पण तुम्हांसनी त्या फाट्यावर सोडितो. बघा जमतंय का. तिथून गाव फार लांब नाय. तिथून कोणचंही वाहन (गाडी) भेटलं तुमासनी”
एवढ्या रात्री दुसरी गाडी मिळणेही अशक्य होते म्हणून त्या ट्रकने जायचे बाबांनी ठरवले आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर कापताच त्या ड्रायवर ने सांगितल्या फाट्यावर येऊन पोहोचलो. आम्हांला तिथे उतरवून तो ट्रक त्याच्या मार्गी लागला. फाट्यावर सर्वदूर अंधार पसरलेला. ज्या दिशेला जायचे होते, त्या दिशेच्या रस्त्याच्या कडेला आम्ही थांबलो होतो. पुढे जाण्यासाठी काही गाडी येते का याची वाट पाहत. पण दूर दूरवर कुठलीही गाडी येताना दिसत नव्हती. फार अंधार होता म्हणून साहजिकच आईला अगदी खेटून आम्ही उभे होतो आणि ह्या अंधारात आम्ही घाबरू नये ह्याची ती देखील काळजी घेत होती. तितक्यात जणू दोन काळ्या सावल्या आमच्या पुढ्यातून समोरच्या झाडीत शिरल्याचे जाणवले. आई-बाबा, आम्ही सर्वांनी ते दृश्य पाहिले, अगदी छातीत धडकीच भरली. काय होते ते ? कोण गेले तिकडे ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण आईचा माझ्या हातावरच्या घट्ट झालेला हात पाहून, नक्कीच ते काहीतरी विचित्र होते हे मला कळून चुकले. त्यात तीही पूर्ण घाबरली होती हे ही मला समजले.
त्यावेळेस माझे वय इतके होते की, भुतं तर दूरच पण नुसता अंधार जरी म्हंटला तरी चड्डी ओली व्हायची. त्यातच पहिल्यांदा असे काही पाहिले, जे खरोखर भयानक होते. कारण आम्ही सोडून तिथे कोणीही दुसरे नव्हते आणि अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या.बाबांनी देखील सावध पवित्र घेतला होता. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला आणि हा नक्कीच भास नव्हता. आता तर आमची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कारण घडलेल्या घटना नक्कीच साधारण नव्हत्या, पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत… पुन्हा आमच्या समोरच्या झाडीत, पण थोड्या दूरवर आम्हाला त्या दोन काळ्या सावल्या धावताना दिसल्या. मी तर एवढा घाबरलो की तिथेच आई-आई ओरडत तिला घट्ट पकडू लागलो. आम्हांला सावरण्यासाठी लगेच बाबा म्हणाले, ” एखादं कुत्रं बित्रं असलं तिकडं दुसरं कुणी नाहीये तिकडं”.
बाबा आमचे लक्ष्य वळवीत होते, हे आम्हांला कळून चुकले होते. तितक्यात पुन्हा तोच टाळ्यांचा आवाज आणि ह्यावेळेस आमच्या कानाच्या फारच जवळ. आम्ही सारेच दचकलो. आईने लगेच देवाचा धावा केला आणि जोरजोरात मोठ्या आवाजात देवांचे नाव घेऊ लागली. कारण आमच्या बरोबर जे घडत होते, ते नक्कीच काहीतरी विपरीत होते. पुढ्याच क्षणाला त्या दोन काळ्या आकृत्या दूरवरून कसले तरी हातवारे करत आमच्या दिशेने चालत यायला लागल्या. आतातर बाबांचेही भान हरपले होते. तेही अगदी आम्हांला येऊन खेटून उभे राहिले. कर्रर्रर्रर्रर्रर्रर…. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र….. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. आवाज कानी ऐकू येऊ लागला आणि मधेच पुन्हा तो टाळ्यांचा आवाज. आवाज, टाळ्या, सावल्या…. आवाज, टाळ्या, सावल्या… आवाज, टाळ्या, सावल्या…. त्या सामसूम ठिकाणी, अंधाऱ्या रात्री कुठला खेळला जात होता हेच कळत नव्हते आणि ह्यावर करायचे तरी काय ? हाच प्रश्न आम्हां सर्वांना पडला होता. त्या काळ्या आकृत्या आमच्याच दिशेने येत होत्या. इकडे आईचे देवाचे नामस्मरण चालूच होते. ती जोरजोरात देवाचा धावा करू लागली.
तितक्यात जोरजोरात हॉर्न वाजवत एक अँबेसिडर आम्हांला आमच्या दिशेला येताना दिसली. दूरवरून तिची दिसणारी हेड लाईट हा आशेचा किरण म्हणावा की निराशेचा, हे काहीच कळत नव्हते. कारण रात्रीच्या वेळेस जिथे अगदी सुमसाम मोकळा रस्ता आहे, त्या ठिकाणी ही व्यक्ती जोर जोरात हॉर्न वाजवत का येत होती ? आम्ही लगेच रस्त्याच्या कडेने त्या गाडीला हात करू लागलो. ती गाडी आली आणि नेमकी आमच्या समोर येऊन थांबली. एक पांढरी शुभ्र कार, त्या अंधाऱ्या रात्रीत मस्त चमकत होती. बाबा लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला ला अमुक-तमुक गावी जायचे आहे असे सांगितले. पण तेही काही विचित्रच होते. एक पांढरी शुभ्र कार, जोरजोरात हॉर्न वाजवत अचानक आमच्या पुढ्यात येऊन थांबते. त्या गाडीच्या वाहन चालकाचा पेहराव म्हणावा तर, अगदी पांढरे कपडे घातलेली जणू काही मोठी आसामीच होती. अगदी गोरापान, सरळ उभं नाक असलेला असं त्याचं वर्णन होतं. साधारणतः गावी सगळेच पांढरा पोशाख घालतात, पण ह्या महाशयांचा पेहराव काही वेगळाच होता. त्याने जरूर आमच्या समोर गाडी थांबवली, पण त्याने मान वळवून आमच्याकडे एकदाही पाहिले नाही. तो एकटक सरळच पाहत होता, त्याच दिशेला ज्या दिशेने त्या काळ्या सावल्या आमच्याकडे येत होत्या. बाबा पुढे सरसावले त्यांनी त्याला सांगितले की, आम्हांला त्या-त्या गावी जायचे आहे, त्यावर तो लगेच म्हणाला, “”मला माहित आहे तुम्हांला कुठे जायचंय ते, बसा लवकर गाडीत”.
पण एवढेही बोलताना देखील त्याने बाबांकडे काही पाहिले नाही. आम्ही लगेच गाडीत शिरलो. पण बसता – बसता आईने आणि मी मागे वळून पाहिले, तर चमत्कार असा की त्या दिसणाऱ्या सावल्या, आकृत्या जणू कुठेतरी नाहीशा झाल्या होत्या. बाबा बऱ्याच गोष्टी काढत त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती व्यक्ती काही केल्या बोलायचं नावं घेत नव्हती. एकदाही मान वळवून बाबांकडे अथवा आमच्याकडे पाहत नव्हती. माघे बसलेली आई आणि मी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही आवभाव नव्हते. तो फक्त पुढे बघत गाडी चालवत होता. बराच बोलायचा एकांगी प्रयत्न केल्यानंतर, आता बाबा शांत झाले होते. पण त्या गोष्टीने आमची धाकधूक फारच वाढली होती. पुढे आमचे काय होणार, हे त्या ईश्वरालाच ठाऊक होते आणि त्याचाच धावा आई सतत करत होती. ह्या सर्व घटनेत सकाळचे ५ केव्हा वाजले कळले नाही. काळरात्र बाजूला सारत पहाटेचा प्रकाश तिची जागा घेऊ लागला आणि आम्ही शेवटी त्या गावी पोहोचलो. जसे पोहोचलो तसे पटकन आम्ही सारे गाडीच्या खाली उतरलो. बाबांनी त्या व्यक्तीला पैसे देऊ केले, पण ते न स्वीकारता आणि बाबांकडे न बघता, फक्त हात नकारार्थी हात हलवत तो व्यक्ती गाडी पुढे घेऊन निघून गेला.आम्ही सुखावलो होतो, कारण सरतेशेवटी सुखरूप आम्ही त्या गावाच्या स्टँडवर पोहोचलो होतो. पण एक प्रश्न मात्र, आमच्या सर्वांच्या मनात तसाच अनुत्तरित राहिला… हा गाडीवाला नक्की होता कोण ?