वैभववाडीची ती भयानक रात्र

marathi bhutanchya katha

वैभववाडी हे कोकणातील एक प्रसिद्ध गाव आहे. मुंबईत आणि इतरगावी राहणारे कोकणी लोक वर्षातून एकदा तरी गावात फेरी टाकतातच. सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. अचानक गावी कोणा नातेवाईकाचे मयत झाल्याने मयताच्या दहाव्या आणि तेराव्यासाठी माझी आजी, मामा, मामी असे तीन जण वैभववाडीला गेले होते. गावाकडे खूप मोठी घर असतात, तसंच त्यांचं घर देखील तस मोठं होत. प्रशस्त वाडा त्यात एक मोठ माजघर त्यात शिरल्या शिरल्या डाव्या बाजूला पाहुण्यांसाठी बैठक केलेली आहे आणि बैठकीच्या बाजूलाच पुढे अजून एक दरवाजातून देवघर आणि दुसऱ्या दरवाजात धान्यांची रूम, तिथूनच पुढे स्वयंपाक घर. उजव्याबाजूला अजून दोन रूम आणि शेवटच्या रूम नंतर वर माळ्यावर जाण्यासाठी लाकडी जिना. माजघरातूनच स्वयंपाकघरात जाण्यासाठी दरवाजा असून तिथून अजून पुढे गेल्यावर पडवी आणि त्यामागे मोकळं परस त्यात सुपारी, रामफळ आणि काही आंब्याची झाडे आहेत. माजघरात दोन लाकडाचे खांब माडीच्या छताला आधार देण्यासाठी लावलेले आहेत. त्यातील एका खांबाला मयताचा एक फोटो लावलेला होता आणि दुसऱ्या एका कोपऱ्यात मयताचा दुसरा फोटो पाटावर ठेऊन त्यावर एका बाजूला एक समई पेटवलेली होती आणि तांदुळाचा एक ढेप ठेवलेला होता.

मयताच दहावं झाल्याच्या दिवशी माझी आजी, मामा आणि मामी ह्यांनी रात्री माजघरातच झोपण्याचा निर्णय घेतला कारण अस म्हणतात की जिकडे मयताची समयी लावलेली असते तिकडे झोपायचं असते आणि ती खोली निर्मनुष्य सोडायची नसते. त्याप्रमाणे त्याच्या घरातील इतर बायका एका बाजूला झोपल्या आणि माझी आजी, मामा आणि मामी हे दुसऱ्या बाजुला मयताचा फोटो लावलेल्या खांबाच्या बरोबर खाली झोपु लागले तेव्हा घरातली एक दुसरी आजी माझ्या मामाला म्हणाली की त्या खांबाच्या खाली झोपू नका कारण की मयताचा तो आवडता खांब आहे आणि मरणापूर्वी तो त्याच खांबाला टेकून बसायचा, त्यामूळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु माझ्या मामाला आणि मामीला ह्या सर्व गोष्टींवर अजिबात विश्वास नसल्याने ते म्हणाले की, अस काही नसतं आम्ही इकडेच झोपतो. असे म्हणून ते तिघेही झोपी गेले.

रात्री वादळी वारा सुटल्याने लाइट गेली होती आणि मयताच्या फोटोजवळील समई सोडली असता सगळीकडे गुडूप अंधार पसरला होता. मामा, मामी आणि आजी सारखे ह्या कुशिवरून त्या कुशीवर करत होते, गरमीमुळे त्यांना नीट झोप येत नव्हती आणि अचानक रात्री मामा, मामी आणि आजीला असे जाणवले की त्यांच्या आसपास आणि अंगावरून काहीतरी सरपटत आहे, काहीतरी चालत आहे. तिघांनाही एक विचित्र जाणीव होत होती शेवटी असह्य होऊन मामा उठला आणि मोबाईल टॉर्च लावून पाहिले तर थरकाप उडवणारे दृश्य होते. तो मोठमोठ्याने ओरडत वाचवा वाचव म्हणत घराबाहेर पळत असताना आजी आणि मामी पण उठून बसल्या असताना त्यांनीही ते दृश्य पाहून घाबरून आरडा ओरडा केला. सर्व गदारोळामुळे खोलीतील इतर बायका आणि अंगणात झोपलेल्या माणसांना पण ते दृश्य दिसले.

असंख्य मोठे काळे मुंगळे आणि वेगळ्याच प्रकारचे भुंग्यासारखे दिसणारे काळे कीटक ह्यांनी मामा, मामी आणि आजी जिकडे झोपले होते तिकडची लादीची जमीन व्यापून टाकली होती. तिकडच्या लादीचा रंग बदलून पूर्ण काळा काळा झाला होता. त्या किड्यांचा जणू गालीचाच अंथरला गेला होता. आधी सर्वाना असे वाटले की पावसाचे दिवस असल्याने जमिनीला ओल येऊन ते मुंगळे बाहेर आले असावेत पण तो मुंगळ्यांचा गालिचा फक्त त्याच जागी अंथरला होता जिकडे मामा, मामी आणि आजी खांबाखाली झोपल्या होत्या. इतर बायका ज्या ठिकाणी झोपल्या होत्या तिकडे एक ही मुंगळा नव्हता जमीन पूर्ण स्वच्छ् होती. हे बघून सर्वानाच आश्चर्य वाटत होते. हा भुताटकीचाच प्रकार आहे हे सर्वांच्याच लक्षात आल्याने सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. सर्व घराबाहेर थांबले असताना एक मिनिटं पण झाले नसेल आणि लाईट आली तसे सर्वजण पुन्हा घरात डोकावून पाहू लागले तर काय आश्चर्य की जमिनीवर एक ही मुंगळा नव्हता किंवा तशी काही खूण ही नजरेस पडली नाही. त्यानंतर माझा मामा, मामी, आजी परत त्या घरात झोपले नाहीत.

मेघलक्ष्मी सोबत काय झालं असेल ?

कोल्हापुरातील एक छोटेसे गाव ‘भिरवडी’. डोंगराळ भागात असलेले हे छोटेसे पण अतिशय सुंदर असे गाव. गावाजवळच एक छोटासा डोंगर होता. तेथून पुढे छोटेसे जंगल चालू होत होते. हे जंगल पार करून गेल्यास थेट दुसऱ्या गावाची वेस लागत होती. जंगल फार मोठे नसले तरी घनदाट होते. ‘मोघरान’ असे या जंगलाचे नाव होते. हे नाव का आणि कसे पडले हे माहित नाही पण गावातील लोक मोघ्याचे जंगल म्हणूनही संबोधित असत. गावातील लोक हे जंगल पार करायचे असल्यास मोठा चमू तयार करूनच येथून जात असत आणि ते हि दिवसा. रात्री कोणी येथून जाण्याची हिम्मत करीत नव्हते. आणि या गोष्टीला कारणही तसेच होते…

फार वर्षापूर्वी गावावर एका रात्री दरोडा पडला होता. तेव्हा गावातील लोकसंख्या फार कमी होती. दरोडेखोरांनी गावातील घर लुटली. सोने-नाणे, पैसा तसेच जो दिसेल तो मौल्यवान ऐवज त्यांनी लुटला. काही निर्भीड तरुणांनी खूप प्रतिकार केला पण त्यात त्यांना प्राण गमवावा लागला. त्या निर्दयी दरोडेखोरांच्या सरदाराच्या नजरेत एक स्त्री भरली. मेघलक्ष्मी असे तिचे नाव होते. त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला उचलले आणि आपल्या सोबत घेऊन गेला. भयभीत झालेल्या तिच्या नवऱ्यानेही काहीच प्रतिकार केला नाही. मेघलक्ष्मी रडत किंचाळत होती. दरोडेखोराच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती पण सारे निष्फळ ठरले.

दुसऱ्या दिवशी भयभीत झालेल्या मेघलक्ष्मी च्या नवऱ्याने काही गावकऱ्यांना सोबत घेऊन मेघलक्ष्मी चा शोध सुरु केला तेव्हा गावाजवळच्या जंगलात त्यांना मेघलक्ष्मी चा मृतदेह झाडाला लटकताना दिसला. अतिशय भयंकर असे दृश्य होते ते. मेघलक्ष्मीचे डोळे खोबणीतून बाहेर पडून लटकत होते. खोबणीच्या खालून सुकलेल्या रक्ताची काळी धार दिसत होती. विचकलेले दात एकमेकांवर दाबून ठेवले होते, आणि त्यावर सुकलेल्या काळ्या रक्ताची किनार. हाताचे दोन्ही पंजे दुमडलेल्या अवस्तेत आणि शरीर ताठ झाले होते. मृत अवस्थेतही मेघलक्ष्मीच्या चेहऱ्यावर जळजळीत क्रोध दिसत होता. सुंदर रूपवान मेघलक्ष्मी चा इतका करुण आणि निर्दयी अन्त पाहून लोक हळहळले. ते भयानक दृश्य बघून घाबरलेला तिचा नवरा ओरडत किंचाळत पळत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो सैरावरा पळत तेथून निसटला.

पोलिसांनी मेघलक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या नवऱ्याचा शोध सुरु केला. दोन दिवसांनी तिचा नवरा जंगलातील विहिरीजवळ मृत अवस्थेत सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते जणू मरताना समोर त्याने अति भयंकर असे काही पहिले असावे. तोंड सताड उघडे होते जणू मरताना त्याने मोठी भीतीदायक किंकाळी फोडली असावी.

काही लोकांच्या म्हणण्यानुसार मेघलक्ष्मीने आत्महत्या केली होती तर काही म्हणत दरोडेखोरांनी तिला मारले. मेघलक्ष्मी आणि तिच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल गावात मोठा शोक पसरला. बरेच दिवस चर्चा चालू राहिली. पोलिसांचे तपास सत्र चालू होते पण ठोस असे पुरावे काहीच मिळाले नाहीत. दिवस निघून गेले तशा चर्चा कमी होत गेल्या. गावातील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होऊ लागले. आणि पुन्हा एकदा अघटित घडले.

भिरवडी गावाच्या शेजारच्या गावात मोठा उरूस होता. दर वर्षीप्रमाणे भिरवडी गावातील लोक या यात्रेच्या निमंत्रणाला मान देऊन जात होती. बैलगाड्या, मोटार गाड्या भरून लोक यात्रा करून आले. यात्रा सुरळीत पार पडल्यानंतर जत्रेला उधान आले. तमाशाचे फड उतरू लागले तशे गावातील तरुणांची चलबिचल वाढू लागली. भिरवडी गावातील तरुण सुद्धा तमाशा बघायचा म्हणून घरातून रात्रीची निघत ते थेट सकाळी परत येत.

जत्रेचा तिसरा दिवस होता. रंगा रात्री तमाशाला जायचे म्हणून तयार होऊन बसला होता. भैरव त्याचा मित्र मोटार सायकल घेऊन येणार होता पण तो पायीच चालत त्याच्या घरी आला. मोटार सायकल बद्दल विचारल्यावर भैरवने मोटार सायकल बंद पडल्याचे सांगितले. रात्रीची वेळ होती. जायचे कसे हा विचार पडला होता. मुख्य रस्त्याने चालत गेलो तर खूप उशीर होणार, तमाशा पण बघायला मिळणार नाही आणि दमछाक होईल ती वेगळीच.

“रंग्या आजचा शेवटचा तमाशा हाय, बघितलाच पायजे गड्या”, भैरव.

“आर हो पर जायचं कस आता, समदी टाळकी पण गेल्याती आदीच, कोण म्हणून नाय आपल्यासोबत”, रंग्या.

मान गरागरा फिरवत भैरव उठला आणि म्हणाला, “ते काय न्हाय, उठ जंगलाच्या वाटेने जाऊ चल, पाटकन पोचतुय बघ”.

जंगलातून जायचे म्हटल्यावर रंग्या थोडा बावरला पण तमाशाचे खूळ डोक्यावर नाचत होते. दोघेही उठले आणि चालत माळावर येऊन पोचले. समोर घनदाट जंगल होते. आकाशात अर्धचंद्र आणि चांदण्या टीमटीमत होत्या. त्यांचा निळसर प्रकाश पडला होता. हातात छोटा दिवा घेऊन दोघेही जंगलात शिरले. पायाखालचा सुकलेला पाला पाचोळा कर्र्र्रर्र क्र्रर्र्र वाजवीत दोघेऊ घाई घाईत चढ उतर करीत निघाले होते. भयाण अशा रानात रंगा आणि भैरव दोघेच चालत होते. कधी कुत्र्याचे रडणे ऐकू येई तर कधी घुबडाचे घुत्कार. दोघेही आता जंगलाच्या मध्यावर येऊन पोचले होते. समोर मोठ मोठी झाड होती. हवेतला गारवा कमालीचा वाढला होता. आणि अचानक रंग्या चालता चालता थांबला…

“का रे काय झाल”, भैरव.

“भैरू हे…हे म्होरच झाड बघ”, रंग्या चाचरत बोलला.

“का रे काय झालंय झाडाला?”, भैरव.

“हे… तेच झाड हाय. त्या मेघलक्ष्मीन हिथं….”, रंगा.

“आर..गप… कशाला न्हाय त्यो विषय… गप बस”, भैरव.

समोरचे ते मोठे झाड स्तब्ध उभे होते. गार वारा अंगाला झोंबू लागला होता. रंगा आणि भैरव दोघेही आता झपझप चालू लागले. थोडे अंतर चालून गेल्यावर एक छोटा ओढा लागला. रंगा आणि भैरव ओढा पार करण्यासाठी खाली उतरले. आणि अचानक सर्रर्रर्र सर्रर्रर्र करीत काहीतरी भैरवाच्या मागच्या बाजूने निघून गेले. दोघेही दचकले, गर्भगळीत झाले. घाबरून दोघेही इकडे तिकडे बघू लागले पण काहीच दिसले नाही. दोघांच्याही अंगातली थरथर आता वाढू लागली होती. पोटात गोळा आला होता. झपझप पाय टाकीत दोघेही ओढ्याच्या वर आले. एकमेकांचा हात पकडून दोघेही चालत होते आणि पुन्हा…

छम… छम…छम… छम…छम… छम…

पैंजणाचा आवाज कानावर आला तसे दोघेही घाबरले. अंगावर सरसरून काटा आला आणि मानेवरचे केस ताठ झाले. मागे वळून पाहिले तर कोणीच दिसत नव्हते. पण दोघेही आता चांगलेच गांगरून गेले होते. एकमेकांना घट्ट चिकटून दोघेही लटपटत चालू लागले. दहा बारा पावलं चालून जाताच एक भेदक किंकाळी दोघांच्याही कानावर आली दोघांनीही मागे वळून पहिले आणि त्याचक्षणी एक मुंडके सरपटत त्यांच्या दिशेने येताना दिसले. दात विचकलेले, डोळे बाहेर आलेले आणि पूर्ण चेहरा काळ्या रक्ताने माखलेले ते मुंडके त्यांच्याकडे बघून किंचाळत होते. मुंडक्याच्या मागे लांबलचक मान वळवळत होती आणि त्यामागे लिबलिबीत अशे शरीर सरपटत होते.

दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. पळून जाण्या इतकेही त्राण उरले नाही. पाय लटपटत होते थर थर कापत होते. एखाद्या अमानवी शक्तीने शरीर जखडून ठेवावे तशी अवस्था दोघांची झाली. एकमेकांचे घट्ट पकडलेले हात गळून पडले होते. ते मुंडके दोघांच्या दिशेने भर भर सरपटत येत होते काही क्षणातच त्या मुंडक्याने भैरवच्या दिशेने झेप घेतली ते सरळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावर आदळले. तत्क्षणी रंगाचे जखडलेले शरीर अचानक हलके झाले, विजेच्या चपळाईने तो तेथून पळत सुटला. धावता धावता एक भयंकर किंकाळी रंग्याच्या कानावर पडली.

दुसऱ्या दिवशी रंगा गावाबाहेर सापडला. त्याच्या अंगावरचे कपडे मातीने माखलेले होते. केस पिंजारले होते. खाली बसून तो वेड्यासारखे काहीतरी बडबडत होता. ‘भैरूचा तमाशा झाला…मी वाचलो…मेघलक्ष्मी आली परत…’ अशी असंबंध आणि अखंड बडबड तो करीत होता. रंग्याला इस्पितळात दाखल केले गेले आणि भैरव चा शोध सुरु केला. जंगलाच्या मध्यभागी भैरवचा मृतदेह सापडला. त्याचे डोळे विस्फारलेले होते… तोंडाचा जबडा उघडा होता. शरीर रक्ताने माखलेले होते…

या घटनेला आता बरीच वर्ष उलटली. पण आजही या गावातल्या लोकांना जंगलातून चित्र विचित्र आवाज ऐकू येतात. जंगलाजवळील माळावर शेतात काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना येथून भर दुपारी किवां रात्री किंचाळण्याचे ओरडण्याचे आवाज ऐकू येतात. कधी पैंजणाचा आवाज, कधी मधुर आवाज देऊन बोलावणे तर कधी गुरगुर ऐकू येते.

दिपक कदम

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.

 

तो गाडीवाला नक्की कोण होता ?

घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खणाणला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी… ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! त्यामुळे त्या सोयऱ्याच्या गावाला जायची गडबड सुरु झाली. रात्रीच्या गाडीने निघायचे होते. त्यामध्ये आम्ही फार लहान होतो. आम्हांला घरी सोडूनही कसे जावे आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत घेऊनही कसे जावे ? हाच प्रश्न बाबांना पडला होता. एकवेळ बाबा म्हणालेही, तुम्ही भावंडे घरीच राहा, आम्ही जाऊन उद्या परत येतो. पण आपल्या वासरांना एकटे सोडून निघेल ती माय कसली. तिने हट्टच धरला ! त्यांना एकटे सोडून जायचे नाही, आपल्या सोबतच घ्यायचे. मग अशा वेळेला नाही म्हणणे तरी कुठे जमणार होते. म्हणून त्यांनाही लगेच होकार दिला आणि आवरून निघालोच आम्ही गावी जायला.

रात्रीची एकच ट्रेन होती आम्हांला त्या गावी जाण्यासाठी, तिनेच लवकर पोहोचू या विचाराने ती ट्रेन पकडली. कारण मरते वेळी आपण तिथं नव्हतो निदान मयतीला (मयत विधीला) तरी हजर पाहिजेच, ह्याच विचाराने बाबांची घाई सुरू होती. रात्रीचा प्रवास, कडाक्याची थंडी आणि झोपेची घाई, सर्व काही एकदमच. पण प्रसंग आणि ओढच अशी होती की, काही केल्या पोहोचायचेच होते लवकर. ते गावही तसे फार दूरच होते आणि ट्रेनने जायचे तर एका दुसऱ्या स्टेशनला उतरून पुढे मिळेल त्या गाडीने प्रवास करायचा होता.

रात्री अंदाजे २ वाजता आम्ही त्या स्टेशनवर उतरलो . सर्वत्र अंधार पसरलेला. स्टेशनही असे सामसूम होते. बराच वेळ स्टेशनच्या बाहेर थांबलो, पण चिटपाखरूही दिसत नव्हते. पुढे जाण्यासाठी एखादी गाडी येते का ? याची आम्ही वाट पाहत होतो. तितक्यात एक ट्रक समोरून आला. थोडं बरं वाटलं, चला जास्त वाट पहावी लागली नाही. पण जसं ठरवलं तसं न होणेच, असेच काही आज नशिबी होते. बाबांनी ट्रक वाल्याला थांबवले, त्याला सांगितले की आम्हांला अमुक-तमुक गावी जायचे आहे, पण तो म्हणाला, “”म्या तर दुसरीकडं चाललोया बघा, पण तुम्हांसनी त्या फाट्यावर सोडितो. बघा जमतंय का. तिथून गाव फार लांब नाय. तिथून कोणचंही वाहन (गाडी) भेटलं तुमासनी”

एवढ्या रात्री दुसरी गाडी मिळणेही अशक्य होते म्हणून त्या ट्रकने जायचे बाबांनी ठरवले आणि आम्ही तिथून पुढच्या प्रवासाला निघालो. काही अंतर कापताच त्या ड्रायवर ने सांगितल्या फाट्यावर येऊन पोहोचलो. आम्हांला तिथे उतरवून तो ट्रक त्याच्या मार्गी लागला. फाट्यावर सर्वदूर अंधार पसरलेला. ज्या दिशेला जायचे होते, त्या दिशेच्या रस्त्याच्या कडेला आम्ही थांबलो होतो. पुढे जाण्यासाठी काही गाडी येते का याची वाट पाहत. पण दूर दूरवर कुठलीही गाडी येताना दिसत नव्हती. फार अंधार होता म्हणून साहजिकच आईला अगदी खेटून आम्ही उभे होतो आणि ह्या अंधारात आम्ही घाबरू नये ह्याची ती देखील काळजी घेत होती. तितक्यात जणू दोन काळ्या सावल्या आमच्या पुढ्यातून समोरच्या झाडीत शिरल्याचे जाणवले. आई-बाबा, आम्ही सर्वांनी ते दृश्य पाहिले, अगदी छातीत धडकीच भरली. काय होते ते ? कोण गेले तिकडे ? असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण आईचा माझ्या हातावरच्या घट्ट झालेला हात पाहून, नक्कीच ते काहीतरी विचित्र होते हे मला कळून चुकले. त्यात तीही पूर्ण घाबरली होती हे ही मला समजले.

त्यावेळेस माझे वय इतके होते की, भुतं तर दूरच पण नुसता अंधार जरी म्हंटला तरी चड्डी ओली व्हायची. त्यातच पहिल्यांदा असे काही पाहिले, जे खरोखर भयानक होते. कारण आम्ही सोडून तिथे कोणीही दुसरे नव्हते आणि अचानक त्या दोन सावल्या आमच्या समोरून त्या गर्द झाडीत शिरल्या.बाबांनी देखील सावध पवित्र घेतला होता. हे होत नाही तर तर लगेच आमच्या मागे कुणीतरी दोनदा टाळ्या वाजवल्याचा आवाज आम्हांला आला आणि हा नक्कीच भास नव्हता. आता तर आमची अवस्था पूर्णपणे बिकट झाली होती. कारण घडलेल्या घटना नक्कीच साधारण नव्हत्या, पण एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत… पुन्हा आमच्या समोरच्या झाडीत, पण थोड्या दूरवर आम्हाला त्या दोन काळ्या सावल्या धावताना दिसल्या. मी तर एवढा घाबरलो की तिथेच आई-आई ओरडत तिला घट्ट पकडू लागलो. आम्हांला सावरण्यासाठी लगेच बाबा म्हणाले, ” एखादं कुत्रं बित्रं असलं तिकडं दुसरं कुणी नाहीये तिकडं”.

बाबा आमचे लक्ष्य वळवीत होते, हे आम्हांला कळून चुकले होते. तितक्यात पुन्हा तोच टाळ्यांचा आवाज आणि ह्यावेळेस आमच्या कानाच्या फारच जवळ. आम्ही सारेच दचकलो. आईने लगेच देवाचा धावा केला आणि जोरजोरात मोठ्या आवाजात देवांचे नाव घेऊ लागली. कारण आमच्या बरोबर जे घडत होते, ते नक्कीच काहीतरी विपरीत होते. पुढ्याच क्षणाला त्या दोन काळ्या आकृत्या दूरवरून कसले तरी हातवारे करत आमच्या दिशेने चालत यायला लागल्या. आतातर बाबांचेही भान हरपले होते. तेही अगदी आम्हांला येऊन खेटून उभे राहिले. कर्रर्रर्रर्रर्रर्रर…. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र….. किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र…. आवाज कानी ऐकू येऊ लागला आणि मधेच पुन्हा तो टाळ्यांचा आवाज. आवाज, टाळ्या, सावल्या…. आवाज, टाळ्या, सावल्या… आवाज, टाळ्या, सावल्या…. त्या सामसूम ठिकाणी, अंधाऱ्या रात्री कुठला खेळला जात होता हेच कळत नव्हते आणि ह्यावर करायचे तरी काय ? हाच प्रश्न आम्हां सर्वांना पडला होता. त्या काळ्या आकृत्या आमच्याच दिशेने येत होत्या. इकडे आईचे देवाचे नामस्मरण चालूच होते. ती जोरजोरात देवाचा धावा करू लागली.

तितक्यात जोरजोरात हॉर्न वाजवत एक अँबेसिडर आम्हांला आमच्या दिशेला येताना दिसली. दूरवरून तिची दिसणारी हेड लाईट हा आशेचा किरण म्हणावा की निराशेचा, हे काहीच कळत नव्हते. कारण रात्रीच्या वेळेस जिथे अगदी सुमसाम मोकळा रस्ता आहे, त्या ठिकाणी ही व्यक्ती जोर जोरात हॉर्न वाजवत का येत होती ? आम्ही लगेच रस्त्याच्या कडेने त्या गाडीला हात करू लागलो. ती गाडी आली आणि नेमकी आमच्या समोर येऊन थांबली. एक पांढरी शुभ्र कार, त्या अंधाऱ्या रात्रीत मस्त चमकत होती. बाबा लगेच पुढे सरसावले आणि त्यांनी त्या ड्रायव्हरला ला अमुक-तमुक गावी जायचे आहे असे सांगितले. पण तेही काही विचित्रच होते. एक पांढरी शुभ्र कार, जोरजोरात हॉर्न वाजवत अचानक आमच्या पुढ्यात येऊन थांबते. त्या गाडीच्या वाहन चालकाचा पेहराव म्हणावा तर, अगदी पांढरे कपडे घातलेली जणू काही मोठी आसामीच होती. अगदी गोरापान, सरळ उभं नाक असलेला असं त्याचं वर्णन होतं. साधारणतः गावी सगळेच पांढरा पोशाख घालतात, पण ह्या महाशयांचा पेहराव काही वेगळाच होता. त्याने जरूर आमच्या समोर गाडी थांबवली, पण त्याने मान वळवून आमच्याकडे एकदाही पाहिले नाही. तो एकटक सरळच पाहत होता, त्याच दिशेला ज्या दिशेने त्या काळ्या सावल्या आमच्याकडे येत होत्या. बाबा पुढे सरसावले त्यांनी त्याला सांगितले की, आम्हांला त्या-त्या गावी जायचे आहे, त्यावर तो लगेच म्हणाला, “”मला माहित आहे तुम्हांला कुठे जायचंय ते, बसा लवकर गाडीत”.

पण एवढेही बोलताना देखील त्याने बाबांकडे काही पाहिले नाही. आम्ही लगेच गाडीत शिरलो. पण बसता – बसता आईने आणि मी मागे वळून पाहिले, तर चमत्कार असा की त्या दिसणाऱ्या सावल्या, आकृत्या जणू कुठेतरी नाहीशा झाल्या होत्या. बाबा बऱ्याच गोष्टी काढत त्या व्यक्ती सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण ती व्यक्ती काही केल्या बोलायचं नावं घेत नव्हती. एकदाही मान वळवून बाबांकडे अथवा आमच्याकडे पाहत नव्हती. माघे बसलेली आई आणि मी एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही आवभाव नव्हते. तो फक्त पुढे बघत गाडी चालवत होता. बराच बोलायचा एकांगी प्रयत्न केल्यानंतर, आता बाबा शांत झाले होते. पण त्या गोष्टीने आमची धाकधूक फारच वाढली होती. पुढे आमचे काय होणार, हे त्या ईश्वरालाच ठाऊक होते आणि त्याचाच धावा आई सतत करत होती. ह्या सर्व घटनेत सकाळचे ५ केव्हा वाजले कळले नाही. काळरात्र बाजूला सारत पहाटेचा प्रकाश तिची जागा घेऊ लागला आणि आम्ही शेवटी त्या गावी पोहोचलो. जसे पोहोचलो तसे पटकन आम्ही सारे गाडीच्या खाली उतरलो. बाबांनी त्या व्यक्तीला पैसे देऊ केले, पण ते न स्वीकारता आणि बाबांकडे न बघता, फक्त हात नकारार्थी हात हलवत तो व्यक्ती गाडी पुढे घेऊन निघून गेला.आम्ही सुखावलो होतो, कारण सरतेशेवटी सुखरूप आम्ही त्या गावाच्या स्टँडवर पोहोचलो होतो. पण एक प्रश्न मात्र, आमच्या सर्वांच्या मनात तसाच अनुत्तरित राहिला… हा गाडीवाला नक्की होता कोण ?