भक्तांचा आनंद उत्सव श्रीदत्तात्रेय जयंती
मार्गशीर्ष पोर्णिमा – श्रीदत्तात्रेय जयंती
छानसं निसर्ग रम्य ठिकाण, हिरवी हिरवी झाडे, पशु- पक्षांचा किलबिलाट, सुंदर सुगंधी फुलझाडे त्यांवर बागडणारी फुलपाखरे, ऋषि मुनींची तपोभुमि, जीवनाचे रह्स्य उलगडणारे उंच उंच शिखरांचे पर्वत, लहान मोठया दिसणार्या खोल दऱ्या, खळखळणारे सुख दुःखाचे धबधबे धडधडून वाहत होते. सर्व ऋषि मुनिंची गर्दी, स्तुती स्तोत्रे, मंत्र जपणारे तपस्वी तिथे उपस्थित होते. अशा निसर्गरम्य ठिकाणी झाडांच्या मधून डोकावत होता एक डोलदार आश्रम, सर्वांचे जीवन आनंदी, पण अत्री ऋषि उदास होते. कारण त्यांना मुलगा नव्हता. एका पायावर उभे राहून त्यांनी शंभर वर्षे तपश्चर्या केली तेव्हा दुर्वास व सोम जन्मले पण समाधान नाही. खडतर तपश्चर्ये नंतर…जन्मस्थानी बद्रिकाश्रमी हिमालयी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष वेळ प्रातः प्रहरी ५ वाजता स्वयंभू अवतार श्रीदत्तात्रय प्रभूंनी अनुसया मातेला मान देऊन अवतार घेतला. हेच ते सैंग मुनी. पुढे तिन्ही देवांना दान देऊन श्रीदत्तात्रेय झालेत. प्रभूंनी चोवीस गुरूंना मान दिला.
२४ गुरु पृथ्वी,वायू,आकाश,जल,अग्नी,चंद्र,सूर्य,कपोत,अजगर,समुद्र,पतंग,मधमाशी,गजेंद्र,भ्रमर,मृग,मत्स्य,पिंगला,टिटवी,बालक,कंकण,शरकर्ता,सर्प,कोळी,कुंभारीण माशी आणि स्वतः असे मिळून २५ गुरु त्यांनी केलेत. त्यांच्या कडून गुण घेतले. साक्षात परमेश्वराने मानव वेश घेऊन स्वतः ज्ञानमय असूनही गुरू केलेत.
हा महान संदेश त्यांनी कृतीतून सर्व जीवांना दिला. की प्रत्येकाने जीवनात गुरू केले पाहिजेत कारण गुरू शिवाय ज्ञान नाही, आणि ज्ञाना शिवाय मुक्ती नाही. अमोघ दर्शन असणारे श्रीदत्तात्रेय प्रभूंनी बद्रीकाश्रम येथे अवतार घेतला. ते नित्य काशीला स्नान करतात, कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचाळेश्वर भोजन करतात व माहूरला निद्रा घेतात. हा त्यांचा नित्य नियम आहे.
तसेच दत्तोपासना ही सर्वत्र आहे नाथ संप्रदाय, चैतन्य, महानुभाव. असे इतर श्री दत्तउपासनेला मानतात. महानुभाव पंथात श्रीदत्तात्रयांना आराध्य मानले जाते. महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये दत्त उपासना घरोघरी केल्या जाते. असे अनाथांचे नाथ, त्रैलोक्याचे राणा, ज्यांच्यामध्ये सृष्टीची शक्ती उत्पत्ती, स्थिती आणि लय समाहित आहे. साधक ज्या माध्यमाने ईश्वराला एकरूप होतो ते माध्यम म्हणजे योग आत्मा आणि परमात्मा यांच्या योग साधनेने जन्मला दत्त. ईश्वर आणि गुरु यांची एकरूपता म्हणजे श्रीदत्तात्रेय यांना श्रीगुरुदेव, गुरूंचे पण गुरु सद्गुरू, जगत गुरु सुद्धा म्हटल्या जाते. गुरु वंशातले प्रथम गुरु म्हणजे श्रीदत्तात्रेय.
श्रीदत्त भक्त आणि श्रीदत्त महात्म सांगणारा पवित्र ग्रंथ ‘श्रीगुरुचरित्र’ या पावन ग्रंथाचे पारायण मार्गशीर्ष शुक्ल सप्तमी पासून मार्गशीर्ष पौर्णिमा पर्यंत केल्या जाते. भगवान दत्तात्रयांना स्मृतिगामी म्हटल्या जाते ज्यांच दर्शन कधीच वाया जात नाही. त्यांच्या दर्शनासाठी त्रेलोक्याला सुदधा आतुरता लागलेली असते.
आपल्या अनन्य भक्ताला संकटातून मुक्त करणे, भक्तांची रक्षा करणे हेच श्रीदत्तात्रयांसाठी आनंद उत्सव आहे. देवी- देवता ज्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात,ज्याला दर्शन झाले त्याला क्षणात ज्ञानप्राप्ती होते त्यांच्या अमृतवाणीने सर्व क्लेश दूर होतात, त्यांचे नाव जरी घेतले तर मनाला शांतता लाभते, साक्षात परब्रह्ममूर्ती जगद्गुरू म्हणून जे सर्वकाळ विश्वविंद आहेत अशा करुणेच्या महासागराला भगवान श्रीदत्ताला आपण शरण गेलो तर त्यांचे शाश्वत प्रेम ते आपल्याला देतील व नक्कीच आपल्याला परमानंद लाभेल व आपल्या जीवनाचे सार्थक होईल.
अशा परब्रह्म परमेश्वर सृष्टी संचालक भगवान श्रीदत्तात्रय प्रभू यांच्या अनन्य भक्तांचा उत्साहाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा श्रीदत्त जयंती. श्रीदत्तात्रयप्रभू महाराज यांना कोटी कोटी प्रणाम.