साद माणुसकीची मित्र परिवाराची 'माणुसकीची भिंत '

buldana news

बुलडाणा शहरात अनेक गोरगरीब भटकतांना दिसून येतात ज्यांना घालायला कपडे नाहीत. थंडी, ऊन वारा पाऊस सर्व अंगावर झेलत ही लोक आपला बचाव करताना दिसून येतात. त्यांची गरज जाणून त्यांना मदत व्हावी या हेतूने साद माणुसकीची मित्र परिवार बुलडाणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘माणुसकीची भिंत’ उभारण्यात आली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना क्षणभर थांबायला लावणारी भिंत सध्या चर्चेत आहे. ज्याला लोकांनी पागल म्हणून हिनवले होते त्याला त्याच माणसानंमध्ये वावरण्या योग्य बनविले याचे समाधान साद माणुसकीची परिवाराच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

प्रत्येकाकडे जुने कपडे असतात जे आपण टाकून देतो अथवा दाराशी आलेल्याना देऊन त्या बदल्यात काही तरी वस्तू घेतो. हेच कपडे जर ह्या गरजुंना दिले तर त्यांची गरज पण भागेल आणि काही केल्याचं समाधान पण मिळेल. या विचारातून बुलडाणा येथील साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने शहरातील,आसपाच्या खेड्यातील वंचितांना गरजेच्या वस्तू, कपडे,स्वेटर, भांडी, लहान मुलांचे,पुरुषांचे,स्त्रियांचे कपडे व इतर साहित्य दान करण्याचा उपक्रम राबविला आहे. इथे उभारलेल्या ‘माणुसकीच्या भिंतीवर’ आपल्याला नको असेलेले ती वस्तू देतात तर गरजवंत ‘घेऊन जातात’. प्रशंसनीय असलेल्या उपक्रमात रितेश खडके, सुरेश कावळे, महेंद्र सौभागे, अजय दराखे, योगेश सुरडकर, राहुल दराखे,न रेंद्र लांजेवार यांचा समावेश आहे.

ज्यांच्या जवळ जे जास्त असेल त्यांनी ते द्यावं,आणि ज्यांना नसेल त्यांनी घेऊन जावं. बस्स येव्हड साधं सोप्प गणित आहे ! आपण दान करू शकतो ते सर्व आपल्याला इथे देता येतील!! मोठ्या मनाने दान करा! दिल्याने कधी कमी होत नाही!! तरी आम्हाला हात द्या,वंचितांना साथ द्या आणि माणुसकी जपण्यास मदत करा असे आवाहन साद माणुसकीची मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

केळवद च्या युवकाचा प्रशंसनीय उपक्रम

uddhav gadekar

मुलींची घटणारी संख्या ही गंभीर बाब आहे. याला आळा घालण्यासाठी अनेक क्लुप्त्या तसेच गर्भलिंगनिदान बंद करण्यात आले आहे. आधी सर्रास दिसणारी सोनोग्राफी सेंटर सुद्धा बंद झाली आहे आणि कारवाई होण्याची भीती असल्याने अनेक डॉक्टर सुद्धा यापासून दूर राहणेच पसंद करू लागलेले आहेत. गर्भपात आणि त्यामुळे होणारी मुलींची कमी संख्या यामुळे शासनाने ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ ही योजना सुद्धा चालू आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना यावर कार्य करताना दिसून येतात. काही ठिकाणी तर डॉक्टर सुद्धा मुलगी झाल्यास दाम्पत्याकडून फी घेत नाहीत.

असंच काही केळवद ता. चिखली येथील युवकाने ठरविले आणि मुलगी वाचण्यासाठी आपले योगदान दिले आहे. केळवद ता. चिखली येथे उद्धव गाडेकर यांचे हेअर कटींग सलून आहे. याठिकाणी त्यांनी जर कुणाला मुलगी झाली तर त्या मुलीच्या पित्यास सहा महिने दाढी-कटिंग मोफत तर त्या मुलीचे जावळे सुद्धा मोफत काढून देऊ अशी संकल्पना करून ‘बेटी बचाओ’ या अभियानास त्यांनी साद दिली आहे. त्यांचा हा उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. इतरांनी सुद्धा त्यांच्या ह्या उपक्रमातून शिकले पाहिजेत. अशा प्रकारे जर प्रत्येकाने आपला सहभाग दिला तर नक्कीच लवकर मुलींच्या घटत असलेल्या गंभीर समस्येला आळा बसण्यास मदत होईल.

संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

Buldana News

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आणि महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, माटरगाव तसेच पूर्णाकला महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचायत समिती शेगांव येथील श्री. जाधव सर यांच्या निदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक बस स्थानक परिसरात आज सकाळी ११ वाजता ग्राम स्वच्छतेचे प्रणेते संत श्री गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरकर) यांच्या महानिर्वाण प्रसंगीचे स्मृती वाहन लोकांना स्वच्छतेकडे प्रेरित करीत होते. ज्या वाहनामध्ये संत गाडगेबाबा यांनी प्रवास केला ते त्यांचे स्मृतिचिन्ह ट्रकमध्ये सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा आपल्या हातात खराटा घेऊन गावोगावात स्वच्छता करीत आणि आपल्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून स्वच्छतेसह जनजागृती करीत असत. त्याचप्रमाणे आज रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन स्मरीत ग्राम स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला

गावागावात जाऊन ग्राम स्वच्छतेचा संदेश देणे आणि ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने माटरगाव सह जलंब, पहूरजिरा यांसह इतर छोट्या मोठ्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.