मराठा क्रांती मूकमोर्चा साठी बुलडाणा सज्ज

मराठा क्रांती मूकमोर्चा बुलडाणा येथे आज सोमवार २६ ला अखेर निघणार आहे. सोशल मीडिया, तोंडी, जाहिरात, बॅनर द्वारे सर्वत्र गेल्या महिनाभरापासून हाच विषय चर्चेत होता आणि अखेर तो दिवस आला. ह्या मोर्चासाठी जय्यत तयारी झालेली असून जिल्हाभरातून अनेक जण बुलडाणा शहरात दाखल झाले आहेत. बोथा घाटातील अपघात वगळता अजूनतरी कुठेही अनुचित कार्य घडलेलं नाही. मोर्चासाठी तोबा गर्दी होणार हे सर्वश्रुत आहे आणि त्याची जाणीव इतर ठिकाणी झालेल्या मोर्चा मधून दिसून आलेली आहेच.

मराठा क्रांती मूकमोर्चासाठी जयस्तंभ चौकात पूर्ण तयारी झालेली असून पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे. सतर्कता व मोर्चा शांततेत आणि कुठलेही अनुचित कार्य घडू नये या करीत पोलीस बंदोबस्त तैनात असून जिल्ह्यातून आणि इतर ठिकाणाहूनही पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. सर्व कार्यालयीन कामकाज, शाळा- कॉलेज व दळणवळण यंत्रणा सुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी भल्या पहाटेच बुलडाणा शहराबाहेर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत वातावरण बघून संपूर्ण शहर भगवेमय होणार यात तिळमात्र शंका उरली नाही आहे.

अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट, atrocity act म्हणजे काय ?

सध्या सर्वत्र एकच वादळ उठलेलं दिसतंय. सर्वत्र चर्चा, बॅनर, सोशल साईट वगैरे ठिकाणी अ‍ॅट्रॉसिटी कायदा (atrocity act) रद्द करा आणि मराठा समाजाचा मूकमोर्चा असा तो विषय. नेमकं हा विषय काय आहे आणि काय चालू आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कित्येक जण तर कुठलाही विचार न करता फक्त आपला पाठिंबा देत आहेत. कुणी जातीमुळे तर कुणी काही चांगलं असेल तर कुणी इतर करत आहेत म्हणून आपण सुद्धा अनुकरण करतोय याची सुद्धा कल्पना नाही. असो, नेमकं अ‍ॅट्रॉसिटी कायदा आहे हे जाणून घेऊया.

हा कायदा विश्वनाथ प्रताप सिंहांच्या कारकिर्दीत निर्माण झाला. दलितांना आणि आदिवासींना यामुळे सरंक्षण मिळाले आहे. असे असले तरी या कायद्याची बाजू पकडून या ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’चा वापर करून खोट्या केसेस फाईल केल्या जातात, असे म्हणणारे सुद्धा चुकीचे नाहीत. अशा केसेस होत असतील किंवा झाल्यासुद्धा असतील. प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कुठलीही गोष्ट चांगल्यासाठी निर्माण होत असते परंतु त्याचाच चुकीचा वापर केला तर त्याच्या चांगला हेतू नष्ट होतो. गेल्या अनेक वर्षांमध्ये जे काही कायदे निर्माण करण्यात आले, त्यात दलितांना आणि आदिवासींना एका कायद्याचे संरक्षण देण्यात आले तो कायदा म्हणजे ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’. या कायद्याला अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 असे संबोधण्यात येते. फक्त जातीवाचक बोलले तर ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट'(atrocity act) लागतो असे नाही तर या कायद्या अंतर्गत कुठली कलम लागू होतात ते बघूया.

अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तीला –योग्य वा अयोग्य पदार्थ खाण्या-पिण्याची सक्ती केल्यास कलम 3(1)1, इजा/अपमान करणे व त्रास दिल्यास कलम 3(1)2, नग्न धिंड काढणे, मानवी अप्रतिष्ठा केल्यास कलम 3(1)3, जमीनीचा गैर प्रकारे ताबा घेणे कलम 3(1)4 नुसार, मालकीच्या जमिन, जागा पाणी, वापरात अडथळा निर्माण केल्यास कलम 3(1)5, बिगारीची कामे करण्यास जोर जबरदस्ती केल्यास कलम 3(1)6, मतदान करण्यास भाग पाडणे वा धाक दाखवल्यास कलम 3(1)7, खोटी केस, खोटी फौजदारी केल्यास कलम 3(1)8, लोक सेवकास खोटी माहिती पुरवल्यास कलम 3(1)9, सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्यास कलम 3(1)10, महिलेचा विनयभंग केल्यास कलम 3(1)11, महिलेचा लैंगिक छळ केल्यास कलम 3(1)12, पिण्याचे पाणी दुषित करणे वा घाण केल्यास कलम 3(1)13, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारल्यास कलम 3(1)14, घर, गांव सोडण्यास भाग पडल्यास कलम 3(1)15, खोटी साक्ष व पुरावा दिल्यास कलम 3(2)1,2, नुकसान करणे हेतू आग लावल्यास कलम 3(2)3, प्रार्थना स्थळ अथवा निवाऱ्यास आग लावल्यास कलम 3(2)4, कलम 3(2)5: IPC नुसार 10 वर्ष दंडाची खोटी केस करणे, पुरावा नाहिसा केल्यास कलम 3(2)6, लोकसेवकाने कोणताही अपराध केल्यास कलम 3(2)7 अशी तरतूद या कायद्या अंतर्गत करण्यात आली आहे. एवढया प्रकारे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा लावता येतो. भारतीय दंडविधान (IPC) नुसार कोणत्याही गुन्ह्यास 10 वर्षे शिक्षा आहे. परंतु अनुसूचीत जाती-जमातींच्या व्यक्तींच्या संबंधित कायदा असेल तर जन्मठेप होऊ शकते.

तर अशी आहे ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ नुसार होणारी शिक्षा. कोपर्डी प्रकरणामुळे दोन गटांत असलेला वाद हा सध्या गाजतोय आणि त्या अनुषंगाने ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’ हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. तर असा आहे हा ‘अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट’(atrocity act)!

चिकुन गुनिया ची लक्षणे आणि उपचार

चिकुन गुनियावर घरगुती उपचार

सध्या सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा झाला आहे तर काही ठिकाणी अजूनही सुरु आहे. सुखावह वाटणारा हा पाऊस येताच अनेक साथ आणि रोगांचे सुद्धा आगमन होत असते. अनेक ठिकाणी सध्या तापाची साथ सुरु आहे तर देशातील काही ठिकाणी चिकुन गुनियाचे रुग्ण सुद्धा आढळून आलेले आहेत. पावसाचे पाणी जमल्याने अनेक ठिकाणी मच्छर पैदा होत आहेत आणि त्यामुळे डेंग्यू व चिकुन गुनिया सारख्या तापाची साथ येत आहे.

चिकुन गुनिया हा एडिस मच्छर यांच्या चावण्याने होतो. डेंग्यू सारखीच लक्षणे ‘चिकुन गुनिया’ची सुद्धा दिसून येतात. लागण झाल्यापासून २-४ दिवसात याची लक्षणे दिसून येतात. सर्वप्रथम ताप येणे जो ३९ ते १०४ डिग्री पर्यंत सुद्धा जाऊ शकतो तर सर्दी, उल्‍टी, चक्‍कर आणि डोकेदुखी अशी लक्षणे अचानक दिसून येतात. कधी कधी शरीरावर पुरळ, खाज वगैरे सुद्धा होऊ शकते. अंग ठणकणे, सांधेदुखी जी लवकर ठीक होत नाही, डोळ्यात आग होणे, तीव्र डोकेदुखी तसेच दोन्ही हाथ आणि पाय दुखणे व थकवा जाणवणे ही सर्व लक्षणे ‘चिकुन गुनिया’ची आहेत .

चिकुन गुनिया साठी मेडिकल स्टोअर मध्ये eupatperf 200 ही औषधी उपलब्ध आहे जी चिकुन गुनिया वर दिली जाते. याशिवाय अनेक घरगुती उपाय करून आपण हा आजार दूर ठेवू शकता. जसे, जास्तीत जास्त आराम करणे, बाहेरचं खाद्यपदार्थ खाणे टाळणे. विशेषतः तेलकट पदार्थ. सूप आणि नारळाच्या पाण्याचे सेवन करणे. जर आपणास लक्षणे दिसत असतील तर कडुनिंबाच्या पानाचा रस काढून प्यावा म्हणजे लवकर बरं होण्यास मदत होते. घराच्या आसपास कुठेही पाणी जमा होऊ न देणे, स्वच्छता राखणे. वर सांगितलेली कुठलेली लक्षणे आढळून आल्यास त्वरित आपल्या जवळील डॉक्टरांशी संपर्क करावा.

वरवंट बकाल येथे आज 'बेटी बचाव' आणि 'व्यसनमुक्ती' अभियान

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंगळवार दि. १३ रोजी मंडळातर्फे ‘बेटी बचाव अभियान’ आणि ‘व्यसनमुक्ती’ यावर आधारित गीतगायन आणि नाटिकेचे आयोजन केले आहे.

आज रात्री ८:३० वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन नवयुवक गणेश मंडळातर्फे करण्यात आले आहे.

नवयुवक गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

buldana news

संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वरवंट बकाल येथील नवयुवक गणेश मंडळातर्फे या गणेशोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या ११ दिवस रोज सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान, प्रश्नमंजुषा, व्यसनमुक्ती, सर्पमित्रांचे व्याख्यान, बेटी बचाव , आंबा बरवा येथील पारंपरिक आदिवासी नृत्य तसेच भजन वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

५ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता १५ सप्टेंबर ला बक्षीस वितरण कार्यक्रमाने होणार आहे. दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे रविवार ११ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये मंडळाकडून ६०-६५ युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उदघाटक संतोष टाकळकर, कृऊबासचे उपसभापती संजय राठोड यांच्या उपस्थितीत गणेश टापरे, प्रतीक राठी, राजू कुयटे, विनोद टाकळकर, गणेश अस्वार, सागर शेगोकार, नंदकिशोर राठी, चेतन बकाल, नितीन टाकळकर, जयेश दातार, वैभव डाबरे, निलेश भोपळे, सागर रौदळे इ. युवकांनी रक्तदान केले.

बुलडाण्यात गणेशोत्सवाची लगबग

आजपासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लहानथोर सुसज्ज झालेले आहेत तर सार्वजनिक मंडळे सुद्धा सजावट, मिरवणूक यामध्ये व्यस्त आहेत. आज बुलडाणा बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती.

आपल्या चिल्यापिल्ल्यासह वडीलधारी मंडळी गणेशमूर्ती व हार फुले, डेकोरेशन सामग्री घेण्यात व्यस्त असलेले दिसून येत होते. अनेक ठिकाणी सकाळपासूनच तयारीस सुरुवात झाली दिसून येत होती. अनेक ठिकाणी बाप्पाचे आगमन झालेले दिसून आले तर अजूनही काही मंडळे आपली तयारी करण्यात व्यस्त होती. अनेक सुंदर व आकर्षक मूर्ती आज बाजारात विक्रीस उपलब्ध होत्या. ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात सुरु झालेला हा उत्सव येत्या नऊ दिवस सुरु राहणार आहे. येत्या नऊ दिवसासाठी अनेक मंडळांनी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्वत्र हेच भक्तिमय वातावरण राहणार आहे. त्या नंतर लगबग सुरु होईल बाप्पास निरोप देण्याची.