सम्याला मुलगा झाल्याचे कळाले आणि आम्ही सर्व चौकडी सम्याच्या सासुरवाडी राहुरीस जाण्यास निघालो. ठरल्याप्रमाणे किशोर त्याची स्कार्पिओ घेवुन शुक्रवारी तयारच होता, सर्वजण आपापली कामे आटपुन दुपारी २ वाजता राहुरीला जायला निघालो . संध्या. ५.३० वाजता सर्वजण राहुरीला पोहोचलो. सर्वांनी वहिनींचे अभिनंदन केले. त्यांच्याकडे पेढे मागीतले आणि काही वेळाने सर्वजण हॉस्पीटलच्या बाहेर आले. बराच वेळ हॉस्पीटलच्या बाहेर गप्पा झाल्यानंतर सम्याचे सासु-सासरे हॉस्पीटलमध्ये आले. त्यांनी जावईबापु आणि त्यांच्यासोबत मित्रांना पाहीले आणि घरी चालण्याबाबत सर्वांना आग्रह केला परंतु सम्याने मी आता लगेच घरी जावुन बॅग घेवुन निघणार आहे असे सांगीतले व आम्ही परतीच्या प्रवासास निघालो.
बरोबर १० वाजता आम्ही राहुरी सोडले आणि राहुरीच्या बाहेर आल्यावर एक चांगला धाबा बघुन गाडी थांबवली. त्यादिवशी चांगलीच थंडी पडली होती त्यामुळे यथेच्छ मद्यपान आणि जेवण करून रात्री ११.४५ वाजता आम्ही धाब्यावरुन निघालो. राहुरीपासुन ४०-५० किलोमिटर अंतर पार झाले होते, आमची गाडी आता निर्जन रस्त्यावरून धावत होती, किश्या, विन्या, गोपाळ आणि अमितचे विमान कधीचेच उडाले होते, सम्याला आनंदामुळे झोप येत नव्हती. तो ड्रायव्हर शेजारी असलेल्या सिटवर बसला होता. अधुन मधुन ड्रायव्हरशी एखादा शब्द बोलत होता. अचानक त्या दोघांना गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली आणि लालबुंद चेहरा आणि टपोरे डोळे असलेली एक बाई रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसली. तिच्यासमोर काहीतरी होते. ड्रायव्हरने ती बाई जवळ येताच गाडीचा वेग एकदम कमी केला. आणि तिच्यापासुन काही अंतरावर गाडी थांबवुन सम्याकडे पाहीले. सम्याही त्या बाईकडेच पाहात होता. त्या बाईसमोर एक मोठ्ठी पत्रावळ होती आणि पत्रावळीमध्ये ढिगभर भात होता आणि ती बाई एकटक समोर पाहात होती आणि दोन्ही हाताने मुठभरुन भात घेवुन तोंडात अक्षरशः कोंबत होती. तिचा एकंदरीत अवतार पाहुन सम्याची नशाही खाडकन उतरली आणि त्याने घाबरुन अमितला हळु आवाजात हाका मारायला सुरुवात केली, सर्वांना हलवुन उठवण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वचजण गाढ झोपेत असल्यामुळे सहजासहजी ऊठेनात म्हणुन सम्या गाडीच्या मागील भागात गेला आणि त्याने जोरजोरात हलवुन एकेकाला जागे केले. काय झाले म्हणुन सर्वजण सम्याला विचारु लागले. त्यावेळी सम्याने गाडीच्या उजेडात बसलेल्या बाईकडे बोट दाखवले आणि समोरच्या काचेतुन बाहेर बघताच त्या बाईचा एकंदरीत अवतार पाहुन सर्वांची झोप आणि नशा एकाचवेळी उतरली. सर्वजण घाबरुन गेले होते आणि काहीही न बोलता फक्त एकमेकाकडे पाहात होते. सम्याने ड्रायव्हरला, बाईच्या डाव्या बाजुने गाडी जाण्याइतपत जागा आहे हे खुणेनेच दाखवले आणि गाडी तिकडुन घे असे सुचवले. त्याप्रमाणे चेह-यावर फारशी भिती न दाखवता ड्रायव्हरने गाडी बाईच्या डाव्या बाजुने वळवली आणि अगदी तिच्या जवळुन गाडी पुढे घेण्यास सुरुवात केली. गाडी बाई बसली होती त्या समांतर रेषेत आली असता एकदम कोणीतरी एकदम ताकदीने थांबवल्यासारखी थांबली. ड्रायव्हरने गिअर बदलुन पाहीले, एक्सलेटर पुर्ण दाबुन पाहीले पण गाडी काही केल्या पुढे सरकेना. ड्रायव्हरने हरत-हेचे प्रयत्न करुनही गाडी पुढे का सरकत नाही हे त्यालाही कळेना. रिव्हर्स गेअर टाकुन गाडी मागे घेण्याचा प्रयत्न केला तरीही गाडी तसुभरही हलायला तयार नव्हती. आता मात्र कडाक्याच्या थंडीतही सर्वांना घाम यायला लागला होता.
भाताचे मोठे मोठे घास घेत ती बाई त्यांच्याकडे बघुन हसत आहे असा सर्वांना भास व्हायला लागला. बराच वेळ झाला तरी गाडी मागे पुढे सरकत नव्हती आणि त्या बाईच्या पत्रावळीवरील भातही संपत नव्हता. त्या सर्वांमध्ये सम्या बराच धीट होता त्याने गाडीच्या चाकाखाली एखादा दगड वगैरे आला की काय हे बघण्यासाठी तो गाडीखाली उतरायचे ठरविले. परंतु ड्रायव्हरने त्याचा हात धरला आणि म्हणाला “खाली उतरू नका , खाली उतरलात की संपले सगळे “! तुम्ही खाली उतरावे म्हणूनच हा प्रकार होत आहे. गाडीत तुम्हाला धोका नाही. ड्राइव्हरचे बोलून ऐकून सर्व घाबरले होत. ड्रायव्हरने सर्वांना धीर दिला. तेवढ्यात सम्याला काहीतरी सुचले त्याने गाडीतल्या मुझिक प्लेयर वर हनुमान चालीसा सुरु केले, आणि क्षणातच त्यांना काहीतरी वेगळे होत असल्याची जाणीव सर्वांनाच झाली. ती बाई एकदम बसल्या जागेवरून उठली आणि तशीच मागे चालू लागली. तिचे तोंड गाडीकडे होते परंतू ती पाठीकडे चालत होती. ती गाडीच्या प्रकाशाच्या पुढे गेल्यावर अंधारात दिसेनाशी झाली आणि सर्वांनाच एकदम सैल झाल्यासारखे वाटू लागले. ड्रायव्हरने परत पहिला गिअर टाकून गाडी पुढे घेतली. गाडी चक्क पुढे जावू लागली पण सर्वांनीच ड्रायव्हरला थांबवले आणि गाडी वळवून राहुरीकडे घ्यायला लावली. ती बाई ज्या दिशेला गेली होती तिकडे जायचे नाही , परत राहुरीला जावू आणि आजची रात्र तेथे थांबून सकाळी निघू असे ठरले. आणि आम्ही सर्वजण परत राहुरीला आलो. सम्यांच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये थांबल्या होत्या. घरी सासरे एकटेच होते,. त्यांनी दार उघडले आणि समीरला म्हणाले “जावईबापू तुम्ही परत आले ? ” सम्या काहीही बोलला नाही. सर्वजण दिवाणखान्यात आले आणि अमितची नजर कालनिर्णय वर गेली, आणि तो मोठ्याने ओरडला ” सम्या आज शनीअमावास्या आहे ” आणि हे ऐकताच सर्वांच्या मनात परत भीती दाटून आली होती. त्या रात्री कुणीच झोपलं नाही.
ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.