वैभववाडी हे कोकणातील एक प्रसिद्ध गाव आहे. मुंबईत आणि इतरगावी राहणारे कोकणी लोक वर्षातून एकदा तरी गावात फेरी टाकतातच. सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. अचानक गावी कोणा नातेवाईकाचे मयत झाल्याने मयताच्या दहाव्या आणि तेराव्यासाठी माझी आजी, मामा, मामी असे तीन जण वैभववाडीला गेले होते. गावाकडे खूप मोठी घर असतात, तसंच त्यांचं घर देखील तस मोठं होत. प्रशस्त वाडा त्यात एक मोठ माजघर त्यात शिरल्या शिरल्या डाव्या बाजूला पाहुण्यांसाठी बैठक केलेली आहे आणि बैठकीच्या बाजूलाच पुढे अजून एक दरवाजातून देवघर आणि दुसऱ्या दरवाजात धान्यांची रूम, तिथूनच पुढे स्वयंपाक घर. उजव्याबाजूला अजून दोन रूम आणि शेवटच्या रूम नंतर वर माळ्यावर जाण्यासाठी लाकडी जिना. माजघरातूनच स्वयंपाकघरात जाण्यासाठी दरवाजा असून तिथून अजून पुढे गेल्यावर पडवी आणि त्यामागे मोकळं परस त्यात सुपारी, रामफळ आणि काही आंब्याची झाडे आहेत. माजघरात दोन लाकडाचे खांब माडीच्या छताला आधार देण्यासाठी लावलेले आहेत. त्यातील एका खांबाला मयताचा एक फोटो लावलेला होता आणि दुसऱ्या एका कोपऱ्यात मयताचा दुसरा फोटो पाटावर ठेऊन त्यावर एका बाजूला एक समई पेटवलेली होती आणि तांदुळाचा एक ढेप ठेवलेला होता.
मयताच दहावं झाल्याच्या दिवशी माझी आजी, मामा आणि मामी ह्यांनी रात्री माजघरातच झोपण्याचा निर्णय घेतला कारण अस म्हणतात की जिकडे मयताची समयी लावलेली असते तिकडे झोपायचं असते आणि ती खोली निर्मनुष्य सोडायची नसते. त्याप्रमाणे त्याच्या घरातील इतर बायका एका बाजूला झोपल्या आणि माझी आजी, मामा आणि मामी हे दुसऱ्या बाजुला मयताचा फोटो लावलेल्या खांबाच्या बरोबर खाली झोपु लागले तेव्हा घरातली एक दुसरी आजी माझ्या मामाला म्हणाली की त्या खांबाच्या खाली झोपू नका कारण की मयताचा तो आवडता खांब आहे आणि मरणापूर्वी तो त्याच खांबाला टेकून बसायचा, त्यामूळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु माझ्या मामाला आणि मामीला ह्या सर्व गोष्टींवर अजिबात विश्वास नसल्याने ते म्हणाले की, अस काही नसतं आम्ही इकडेच झोपतो. असे म्हणून ते तिघेही झोपी गेले.
रात्री वादळी वारा सुटल्याने लाइट गेली होती आणि मयताच्या फोटोजवळील समई सोडली असता सगळीकडे गुडूप अंधार पसरला होता. मामा, मामी आणि आजी सारखे ह्या कुशिवरून त्या कुशीवर करत होते, गरमीमुळे त्यांना नीट झोप येत नव्हती आणि अचानक रात्री मामा, मामी आणि आजीला असे जाणवले की त्यांच्या आसपास आणि अंगावरून काहीतरी सरपटत आहे, काहीतरी चालत आहे. तिघांनाही एक विचित्र जाणीव होत होती शेवटी असह्य होऊन मामा उठला आणि मोबाईल टॉर्च लावून पाहिले तर थरकाप उडवणारे दृश्य होते. तो मोठमोठ्याने ओरडत वाचवा वाचव म्हणत घराबाहेर पळत असताना आजी आणि मामी पण उठून बसल्या असताना त्यांनीही ते दृश्य पाहून घाबरून आरडा ओरडा केला. सर्व गदारोळामुळे खोलीतील इतर बायका आणि अंगणात झोपलेल्या माणसांना पण ते दृश्य दिसले.
असंख्य मोठे काळे मुंगळे आणि वेगळ्याच प्रकारचे भुंग्यासारखे दिसणारे काळे कीटक ह्यांनी मामा, मामी आणि आजी जिकडे झोपले होते तिकडची लादीची जमीन व्यापून टाकली होती. तिकडच्या लादीचा रंग बदलून पूर्ण काळा काळा झाला होता. त्या किड्यांचा जणू गालीचाच अंथरला गेला होता. आधी सर्वाना असे वाटले की पावसाचे दिवस असल्याने जमिनीला ओल येऊन ते मुंगळे बाहेर आले असावेत पण तो मुंगळ्यांचा गालिचा फक्त त्याच जागी अंथरला होता जिकडे मामा, मामी आणि आजी खांबाखाली झोपल्या होत्या. इतर बायका ज्या ठिकाणी झोपल्या होत्या तिकडे एक ही मुंगळा नव्हता जमीन पूर्ण स्वच्छ् होती. हे बघून सर्वानाच आश्चर्य वाटत होते. हा भुताटकीचाच प्रकार आहे हे सर्वांच्याच लक्षात आल्याने सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. सर्व घराबाहेर थांबले असताना एक मिनिटं पण झाले नसेल आणि लाईट आली तसे सर्वजण पुन्हा घरात डोकावून पाहू लागले तर काय आश्चर्य की जमिनीवर एक ही मुंगळा नव्हता किंवा तशी काही खूण ही नजरेस पडली नाही. त्यानंतर माझा मामा, मामी, आजी परत त्या घरात झोपले नाहीत.