पिंपळवाडीत गणप्या हाच खरा मार्गदर्शक आहे. कुणाला नोकरीसाठी, तर कुणाच्या आजारावर उपचारासाठी. गावातील लोक म्हणतात की, त्याच्यावर वेशिवरल्या श्री महादेवाचं पाणी आहे. आता पाणी असणं हे सर्वांनाच माहित नसेल, म्हणून सांगतो. पाणी असणं म्हणजे एखादा देव माणसाच्या अंगात येऊन लोकांच्या व्यथा दूर करण असा समज आजही गावातील लोकांचा आहे.गावात आजही कुणाला ना कुणाला भुतबाधा झाली की आधी गणप्याच्या घरीलोकांची झुंबड लागते.
आमच्या आजोबांचा मी एकुलता एक नातू. माझे नाव देवांशु . पण मला सारे आवडीने देव्या म्हणतात. मी जेव्हा जेव्हा सुट्टीतगावी जातो तेव्हा ते नेहमी मला त्यांनी पळवलेल्या भुतांच्या खऱ्या गोष्टी सांगतात. अशीच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी मला सांगितलेली ही कथा आज एमएच २८. इन च्या माध्यमातून वाचकांसमोर मांडत आहे.
दिवस पावसाळ्याचे होते. बाहेर मुसळधार पाऊस तांडव घातली होता आणि त्यातच रात्रीचे नऊ वाजले होते. वेळ खूप तरीही आजोबांची गुरं घरी आली नव्हती. नेहमी गुरं चरवून रानातून सातच्या सुमारास घरी येणारे गणप्या आजोबा आज अजून घरी कसे आले नाहीत म्हणून आजीने डोक्यावर खोलडा घेतला. हातात बॅटरी घेतली आणि आजोबांना शोधण्यासाठी त्या मुसळधार पावसात एकटी बाहेर पडली. आमची आजी गंगाबाईम्हणजे वाघीणच. एरव्ही तिला कधी आजोबांबद्दल काळजी वाटत नसायची पण , आज मात्र तिला जास्तच काहूर लागला होता. म्हणतात ना एखाद्या संकटाची चाहूल लागली की, आपल्या जवळच्या व्यक्तीला कळते, की आपल्या आप्तगणवार किंवा सग्या जिवलगावर संकट येणार आहे, कदाचित तसंच होतं त्या दिवशी बहुदा. आजोबांवर येणाऱ्या संकटाची चाहूल कदाचित आमच्या आजीला लागली होती, म्हणूनच आजी ताडताड त्या मुसळधार पावसात ‘माडवण्यात’ {एका जागेचे नाव, जिथं गुरं चरवण्यासाठी आमची भली मोठी कुंपण केलेली जागा होती}. आजोबांना शोधायला गेली. काही वेळाने आजी माडवण्यातून आजोबांच्या नेहमीच्या परतीच्या वाटेने घरी पोहचली तरी आजोबांचा काहीच पत्ता लागला नाही व गुरेही कुठे दिसली नाहीत. आता रात्रीचे दहा वाजले तरी आजोबांचा ठाव ठिकाण नाही म्हणून पिंपळवाडीतील सारी लोकं गोळा झाली. सर्वांनी आजीशी बोलणे केले आणि सर्वांनी रानात शोधायला जायचं असं ठरवलं. तेवढ्यात आजीच्या काय मनात आले कुणास ठाऊक, तिने घरीजाऊन एक नारळ आणला आणि अंगणाच्या उत्तरेकडे जाऊन जोराने ओरडली… “ए म्हादेवा… अरं असा कसा झोपलास रं बावा? कुटं हायेस कुटं? अरं हा बग नारल देताय तुज्या नावानं, येउ दे तुज्या भक्ताला सुकरूप घरात!” आणि दाणकन् नारळ फोडून टाकला. सारी पिंपळवाडी आजीकडे नुसती बघतच राहिली. नारळ फोडून झाल्यावर तिने लोकांना थोडा वेळ वाट बघूया असे सांगितले. आजीच्या मनात जरी धिटाई होती तरी चेहऱ्यावर अत्यंत्य काळजी दिसत होती. आजीला धीर देण्यासाठी सारी पिंपळवाडी आमच्या अंगणातच बसली होती.
रात्रीचे बारा वाजले होते आणि पाऊस काही कमी होण्याचा नाव घेत नव्हता. एवढ्यात सर्जा राजाच्या गळ्यातील घंटा वाजल्या आणि आजी वाड्याकडे धावली. तिच्या बरोबर गावही वाड्याकडे धावले. घराच्या दोनच मिनिटावर आमचा वाडा होता. सारेजण जाऊन बघतात तर वाड्याच्या पायरीवर आमचे आजोबा बसले होते. काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाले होते ते. घाबरलेही होते आणि त्यावर धिटाईने न घाबरल्याचे उसने अवसान ही आणून दाखवत होते. वाड्या बाहेर सर्जा राजा तांबू गाय आणि पवली गाय आणि छोटा पिंक्या अशी सारी गुरं काळजीनं आपल्या धन्याकडं बघत होती. आजीने गुरं बांधली आणि आजोबांना काहीच न विचारता घरी घेऊन गेली. त्या रात्री आजीने आजोबांना काहीच विचारले नाही आणि गाववालेही आजोबांची तब्बेत विचारून सारे झोपायला गेले. पण आजीने मात्र आजोबांना झोपताना आमच्या देवघरातील महादेवाचा अंगारा लावला होता आणि झोपायच्या आधी महादेवाचे मनोमन आभारही मानले होते.
दुसऱ्या दिवशी गणप्या आजोबांचे जिवलग मित्र आणि सख्खे मामा आणि सतत आजोबांची सावली बनून राहणारे पांडू आजोबा घरी आले. कालचा काय प्रकार बाबु असं फक्त विचारलं आणि आजोबांनी रात्रीचा प्रकारसांगायला सुरुवात केली. “पांडू मामा… ते परत आलेत…” “ते परत आलेत…” “मो बोललो व्हतो त्यांना अशी सोडू नका. नशीब काल मीच व्हतो आणि माजी गुरा माज्या सोबतीला व्हती आणि तो म्हादेव माज्यापाटीशी व्हता, नायतर आज मी जिवंत नस्ता मामानू!” काय बोलतोस काय गणप्या? पांडू आजोबा पुन्हा बोलले. “होय.. तो चेटूक आणि ती सोमी जखीण…” पुन्हा आलेत गावात… तेव्हाच त्यांचा बंदोबस्त केला असता तर आज ते परत गावात आले नसते. चक्क त्या रात्री दोन भयानक भूतांशी दोन हात करून माझे आजोबा घरी परतले होते. गुरं घेऊन येत असताना आजोबांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज पांढऱ्यापाण्याशी आला. पांढऱ्या पाण्याचा ओढा ओलांडल्यावर मुळूमुळू रडण्याचा कुठून आवाज येतोय हे बघण्यासाठी आजोबांनी ओढ्याच्या दिशेने मागे वळून पाहिले. आजोबा मागे वळून बघतात तर काय एक लहान मुलं उलट्या पायाचं ज्याचं अख्खं अंग आगीनं जाळून खाक झालं होतं. अंगातून चामडीच्या चिंध्या टपटप गळत होत्या. आजोबांनी मागे वळून बघताच ते मुलं जोराने अक्राळ विक्राळ हसायला लागलं. आजोबा लगेच समजून गेले. काहीतरी व्हायकल झाली. त्यांनी लगेच मनात मंत्र पुटपुटायला सुरुवात केली. तितक्यात ईईईईईईई हीहीहीहीहीही करत सोमी जखनीनं आजोबांवर उडी घातली. आपल्याला समोर भूत आलं की काही केल्या मंत्रांचा घोष मुळीच बंद पडू द्यायचा नाही असं नेहमी आजोबा सर्वांना सांगायचे. सोमी चेटकीण आजोबांवर उडी मारत आहे हे त्यावेळी आजोबांना कळले नव्हते. ते एकटक त्या जळालेल्या चित्रविचित्र हसणाऱ्या मुलाकडे बघत होते. सोमीची अक्राळविक्राळ किंकाळी मात्र आजोबांनी ऐकली होती पण ती बाई आजूबाजूला आजोबांना कुठंच दिसत नव्हती. पण त्या चेटकिणीची चाल बहुदा आमच्या सर्जा बैलाने पहिली होती. जवळ येऊन आजोबांवर ती झडप घालणार एवढ्यात सर्जाने आपल्या जोरदार डोक्याच्या टक्करीने चेटकिणीला दूर उडवले होते. जेव्हा तिला सर्जाने टक्कर मारली तेव्हा तिचे ते भयानक कुरूप आजोबांच्या नजरेस पडले. म्हणतात ना जनावरांना भूतं दिसतात, येणाऱ्या संकटांची चाहूल लागते. आज त्याची अनुभूती आजोबांना आली होती आणि सर्जाने आजोबांचे प्राण वाचवले होते. अंगातून किडे आणि पातळ घाण वाहत होती त्या चेटकिणीच्या. आज जणू ती माय लेकरं आजोबांचा जीव घ्यायलाच तिथं आली होती. पण वेळीच आजोबांनी सावध होऊन आपल्या प्रिय देवतेच्या मंत्राचा जाप सुरु केला. एवढ्यात त्या चेटूकाने पुन्हा आजोबांवर दहाड मारली यावेळी पुन्हा सर्जाने त्यालाही अडविले. पण आजोबा मात्र त्या धकाधकीत खाली पडले. आजोबांचे डोके बाजूला असलेल्या एका दगडावर जोराने आदळले, त्यामुळे आजोबा तिथे बेशुद्धावस्थेत पडले. त्याच संधीचा फायदा घेऊन चेटकिणीने आणि चेटूकाने आळीपाळीने आजोबांच्या अंगात प्रवेश करून आधी सर्व गुरांनां बेदम मारले आणि नंतर आजोबांना त्रास देण्यासाठी काट्यांच्या जाळींमध्ये तर मोठं मोठ्या खड्ड्यात जोर जोराने आजोबांच्या शरीरासह स्वतःला झोकून दिले. तर स्वतःच्याच नखांनी सर्वांगावर ओरबाडे काढले. पण आजोबांना सिद्धी प्राप्त असल्याने त्या दोन्ही भयंकर भुतांना त्यांचा मनावर ताबा करता आला नव्हता. परंतु त्यांची जीभ वळत नसल्याने त्यांना मंत्र बोलणे अशक्य होते. तरीही मनातून त्यांचा महादेवाचा जाप करणे मात्र थांबले नव्हते. पण शरीर भुताच्या काबूत असल्यामुळे त्यांची प्रार्थना महादेवांपर्यंत पोहचत नव्हती. काही वेळाने आजोबांचा जीव मेटाकुटीला आला होता. आजही ते लिहिताना माझ्या अंगावर शहरे उमटले आहेत. म्हणतात न देवावर अपार श्रद्धा असली की तो आपल्या प्रत्येक प्रसंगात आपण न बोलावताच आपली मदत दुसऱ्याकडून करून घेतो. तसेच आमच्या आजोबांच्या बाबतीत त्यावेळी झाले. आजोबा संकटात आहेत याची चलबिचल आजीच्या मनात होते आणि तिचे आपोआप महादेवाच्या नावाने नारळ फोडणे हे सुद्धा त्या परमेश्वराने करवून घेतलेले कार्यच होते व न सांगता केलेली मदत होती. त्या घनघोर संकटातून आजोबांचा जीव वाचला होता. लोकांची भूतबाधा दूर करणारे आज स्वतः भुतांच्या तावडीतून सुखरूप घरी पोहचले होते. परंतु संकट अजून टळले नव्हते. त्या संकटांचा बंदोबस्त करून टाकायचा हे आता त्यांनी मनात ठाम केले होते.
आजोबांच्या घराच्या अगदी बाजूला एक घर होतं. जेत्याला आज सारे भूत बंगला असे म्हणतात. एका महामारी झालेल्या माय लेकरानं स्वतःला जाळून घेतलं होतं. पण कालांतराने त्या घरात काही सुशिक्षित लोकं राहायला आली होती. सुरुवातीला त्यांना भुताखेताची मुळीच जाणीव झाली नाही. पण काही महिन्यांनी त्यांना रात्री मध्यरात्री विचित्र आवाज येऊ लागले, कधी कधी लाईटची बटणे आपोआप चालू बंद होऊ लागायची तर कधी लाईट नसेल तर रॉकेलची लावलेली चिमणी आडवी पडली तरी भडका न उडता साधेपणाने जळत राहायची. दारं खिडक्या आपोआप बंद व्हायच्या,मग त्यातच त्या माणसांनी जोराने जरी मदतीसाठी लोकांना हाका मारल्या किंवा किंकाळ्या ठोकल्या तरी आवाज बाहेर जायचा नाही. त्या सुशिक्षित माणसांना सुरुवातीला हे सारे अजिब प्रकार वाटले. आपल्या मनाचे भ्रम असतील असे वाटले. पण काही दिवसांनी हे प्रकार रोज घडू लागल्याने त्यांनी आमच्या गणप्या आजोबांना याची माहिती दिली होती. ती भली माणसं कुठल्या भयंकर संकटात सापडू नये म्हणून आजोबांनी त्या घरात घडलेल्या खऱ्या घटनेची माहिती सांगून टाकली. महामारीने कंटाळून स्वतःला जाळून घेतलेल्या त्या माय लेकराची होरळपणारी भयानक कथा ऐकून ते सुशिक्षित कुटुंब त्याच दिवशी ते घर व गाव सोडून निघून गेलं. आजोबांना मात्र आपल्या गावाची आणि गाववाल्यांनी काळजी होती. तडफडत मेलेली माणसं भूत झाली की लय जालीम असतात हे आजोबांना माहित होतं. उद्या त्यांनी गावातील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तर प्रकरण खूप वाढेल, म्हणून आजोबांनी त्या दोघांचा बंदोबस्त करायचा ठरवला. परंतु गावाच्या भल्यासाठी एखादी व्यक्ती चांगले काम करत असेल तर काही कुबुद्धीत माणसांना ते पटत नाही आणि ते आडकाठी घालतात तसेच झालं. आजोबांनी त्यावेळी काही लोकांचा विरोध असूनही त्या भुतांचा चांगलाच बंदोबस्त करून त्यांना त्याच घरात कैद करून ठेवले होते. मंत्राच्या पवित्र शब्दांनी व अनेक ठिकाणावरच्या पवित्र दगडांनी बांधलेल्या समाधीत त्या दोघांचे आत्मे कैद करून ठेवले होते आणि गावाला बजावले होते की उद्या काहीही होतो पण या समाधीचा एकही दगड हलता काम नये. ज्या दिवशी या समाधीचा दगड हलेल किंवा समाधीपासून वेगळा होईल त्या दिवशी या दोन आत्म्यांचा तांडव सुरु होईल. मग मीच काय महादेवही काही करू शकणार नाहीत. कारण तेव्हा हे आत्मे अधिक क्रोधाने प्रबळ आक्रमक झालेले असतील. त्यानंतर जवळ जवळ दहा वर्षाने त्या समाधी वरच्या घुमटाचे सर्वच दगड कुणीतरी काढून टाकले होते. जे काल रात्री झालेल्या प्रकार नंतर आजोबांनी भूत बंगल्यात जाऊन बघितले होते.
पुर्वीचे आत्मे पुन्हा मुक्त झालेत हे कळल्यावर सारे पिंपळवाडीतील लोक दहशतीनं हादरून गेले. दाटीवाटीनं ते गणप्या आजोबांना येऊन भेटू लागले. पण नक्की हे केले कुणी याचा मात्र थांग लागत नव्हता. आजोबांनाही काय करावे हे सुचत नव्हते. त्या दोघांनाही पकडण्याची ताकद आता आजोबांकडे राहिली नव्हती. पण बंदोबस्त करावाच लागेल आणि करणारच हि जिद्द मात्र आजोबांनी सोडली नव्हती. रोज दिवसरात्र ते त्याच विचारात असायचे. त्यांनी अनेक जाचक मंत्रांनी आपले घर आणि गावातील सारी घरं भारवून ठेवली होती. प्रत्येक गावकऱ्याला महादेवाची विभूती असलेली पवित्र पुडी दिली होती जी त्यांनी सतत आपल्यासोबत ठेवायला सांगितली होती.
अनेक दिवस विचार केल्यावर आजोबांना त्यांच्या वडिलांनी दीक्षा देताना सांगितलेला कानमंत्र आठवला. अतृप्त जुनाट आत्मा जेव्हा देवाच्या मंत्रांहुन अधिक प्रबळ होतो आणि कशालाही जुमानत नाही त्यावेळी त्याचा शेवट एक पवित्र आत्माच करू शकतो व त्याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. पण गावात तसा पवित्र आत्मा निदान त्यावेळी तरी शोधून सापडण्यासाखे नव्हते. दिवसेंदिवस आजोबांच्या मनाची बेचैनता वाढत होती आणि गावाच्या व गावातील लोकांच्या काळजीने ते स्वस्थ बसू शकत नव्हते. दोन दिवसांवर अमावस्या आली होती आणि अमावास्येच्या शेवटच्या प्रहरा नंतर एका शुभघडीच्या आरंभिला त्या दोन दृष्टआत्म्यांना मारण्याची संधी आजोबांकडे होती. पण त्यासाठी एक पवित्र आत्म्याची साथ असणे गरजेचे होते. कारण सामान्य माणूस त्या दुष्ट आत्म्यांवर विजय मिळवणे शक्य नव्हते.
अमावास्येच्या आदल्या दिवशी पिंपळवाडीतील प्रतिष्ठीत व्यक्तींना बोलावून आजोबांनी महायज्ञ करण्याची परवानगी घेतली आणि गावकऱ्यांचे सहकार्य मिळावे अशी विनंतीही केली. त्यानंतर आजोबांच्या जवळच्या सहकाऱ्यांना व पांडू आजोबांना सर्व कामे वाटून दिली.आजोबांनी अमावास्येच्या दिवशी पांडू आजोबांना महायज्ञ कसा करायचा आणि महादेवाला प्रसन्न केल्यावर त्या भुतांचा नायनाट कसा करायचा हे सर्व आधीच सांगून ठेवले. पण पांडू आजोबांना हे कळले नव्हते. महायज्ञ मी करणार मग गणप्या काय करणार हाच प्रश्न सारखा त्यांना सतावत होता. शेवटी ती वेळ जवळ आली महायज्ञ सुरु होणार यावेळी गावातील काही मोजकीच माणसं यज्ञाजवळ थांबवली होती आजोबांनी आणि बाकीच्यांना घराबाहेर न पडण्याची ताकीद दिली होती. आजोबांनी मंत्रोच्चार सुरु केले आणि महादेवाला प्रसन्न करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्या चेटूक आणि चेटकिणीलाही बोलावण्याचे मंत्र सुरु केले. भर आमावस्येला हे महायज्ञ चालू होते. सोसाट्याचा वारा सुरु झाला होता. काळ्या भयाण अंधारात झाडे जाणू तांडव करीत असल्याचा भास होत होता. अधून मधून दूर जंगलातून जनावरे रडल्याचे आवाज येत होते. अचानक सर्वत्र सोसाट्याचा वारा, झाडांचे तांडव , जनावरांचे आवाज आणि निरनिराळ्या मंत्रोच्चारांनी भोवताली मोठा गदारोळ झाला होता. आणि तेवढ्यातच ते दोन आत्मेही त्या ठिकाणी प्रकट झाले होते. आजोबांनी मंत्र वाचायला सुरुवात केली. आता फक्त समोर चेटूक आणि चेटकीण उरली होती. ते दोघे अनेक प्रयत्न करत होते पणआजोबांच्या मंत्रांपुढे त्यांचे काहीच चालत नव्हते. खूप वेळ झाल्यावर कसेबसे आजोबांनी त्या दोघांनाही बाटलीमध्ये बंद करून टाकले. आजोबांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्ठ युद्ध आणि महायज्ञ त्या दिवशी घडलं.