Airplane Mode एयरप्लेन मोड म्हणजे काय

airplane mode

सध्याचं युग स्मार्टफोनचं बनलंय. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि तासंनतास त्यामध्ये डोकं खुपसलेली लोक दिसून येतात. मग ती पुरुष असो की स्त्री ! आपण प्रत्येक फोन मध्ये एक फिचर बघत आलोय, ते म्हणजे ‘एयरप्लेन मोड’ ! हे ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) म्हणजे नेमकं काय आहे आणि ते कसं आणि का वापरायचं हा प्रश्न अनेकांना पडलेला असेलच. काहींना त्याची माहिती असेल तर काहींना नाही. आज आम्ही आपणांस सांगणार आहोत ह्या ‘एयरप्लॅन मोड’ (Airplane Mode) मागचं रहस्य.

प्रत्येक फोन मध्ये असलेलं ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) हे ऑप्शन नावाप्रमाणे विमानासंबंधीच आहे. हे फिचर ज्या वेळेस आपण विमान प्रवास करतो त्यावेळी वापरावं लागतं. ‘एयरप्लेन मोड’ (Airplane Mode) चालू केल्यावर मोबाईलमधील डेटा, नेटवर्क सगळं बंद होतात. आजही विमानामध्ये बसल्यावर तुमच्याजवळ असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तुम्हाला एकतर बंद करावे लागतात किंवा Airplane Mode वर सेट करावे लागतात. तसा नियमच आहे आणी त्या नियमाचे प्रत्येक प्रवाश्याला पालन करावेच लागते. त्यामुळे Data काय किंवा Wifi काय कशाचाच वापर करता येत नाही. (आतासं कुठे काही विमान कंपन्यांनी विमानात Wifi देण्यास सुरुवात केली आहे.

मोबाईल बंद करणं कुणालाच आवडत नाही. प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की, तंत्रज्ञान एवढ सुधारलंय, फ्लाईट टेक्नोलॉजी अतिशय प्रगत झाली आहे, मग तरीही अजून या Airplane Mode वर उपाय का निघत नाही? मोबाईल जर Airplane Mode वर नाही ठेवला तर कुठे बिघडतं? खरतरं ही गोष्ट प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. एक असा समज होता की मोबाईल सुरु ठेवल्यास त्यातून निघणाऱ्या frequencies (लहरी) विमानाच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे विमान कोसळून त्याला अपघात होतो. पूर्वी अश्या काही विमान दुर्घटना घडल्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता. परंतु हा अंदाज चुकीचा ठरला. अधिकच्या निरीक्षणातून असे लक्षात आले की फोन/मोबाईल सिग्नल हे radio frequency मध्ये अडथळा आणू शकतात/आणतात. ही गोष्ट वारंवार घडत नाही पण जेव्हा घडते तेव्हा भयंकर परिणाम सोबत आणू शकते.

जेव्हा मोबाईल सिग्नल मुळे radio frequency मध्ये अडथळा येतो तेव्हा CD कशी अडकत अडकत चालते तसा आवाज येतो. या आवाजामुळे कानाला हेडफोन लावून बसलेल्या पायलटला अतिशय त्रास होतो. radio frequency च्या माध्यामातूनच पायलट आणि एयर ट्राफिक कंट्रोल एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच अतिशय महत्वपूर्ण माहितीची देवाण घेवाण करत असतात. पण फोन सिग्नल मुळे निर्माण होणाऱ्या, डोकं दुखावणाऱ्या आवाजामुळे त्यांना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसते. अश्यावेळेस केवळ काही सेकंदासाठी जरी त्यांचे बोलणे तुटले तरी ते धोकादायक ठरू शकते. तसेच विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी जर त्यांच्या मोबाईल Airplane Mode सेट केला नाही तर मोठ्या प्रमाणात Radio Pollution देखील होते. म्हणून प्रत्येक मोबाईल मध्ये Airplane Mode हे फिचर दिलेलं असतं.