मराठी चित्रपटसृष्टी मधील नावाजलेल्या अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे निधन झाले. त्याना कॅन्सर झाला होता. 2010 पासून त्यांची कॅन्सर विरोधात असलेली झुंज अखेर निकामी ठरली. त्यानी मुंबईतील जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. स्मिता तळवलकर यांचे पार्थिव सकाळी १० वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून तेथूनच त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अनेक मराठी मालिकांची निर्माती, दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. ‘तू तिथे मी’, ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘सातच्या आत घरात’ या दर्जेदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. मृत्युसमयी त्यांचे वय 59 वर्ष होते. त्यांच्या अचानक निघून जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रख्यात गीतकार सुधीर मोघे काळाच्या पडद्याआड
प्रख्यात कवी, गीतकार व संगीतकार सुधीर मोघे यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्यांचा… फिटे अंधाराचे जाळे… सांज ये गोकुळी… एकाच या जन्मी जणू… अशी एकापेक्षा एक अजरामर गीते त्यांनी लिहिली.
गीत लेखनसोबतच सुधीर मोघे यांनी संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन अशा अनेक प्रांतात यशस्वी कामगिरी केली. या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. जानकी, पुढचं पाऊल, शापित, हा खेळ सावल्यांचा, कळत-नकळत, चौकट राजा, आत्मविश्वास, एक डाव भुताचा, लपंडाव, सूर्योदय अशा ५०हून अधिक सिनेमांसाठी त्यांनी गीत लेखन केलं.
शांता शेळके, सुधीर फडके, श्रीधर फडके यांच्या सोबतची त्यांची गाणी विशेष गाजली. कविता-गीतलेखनाचं काम करत असतानाचा त्यांनी काही मालिका, सिनेमांनाही संगीत साज चढवला. झी मराठीवर गाजलेला ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाचं यशस्वी सादरीकरणही केलं होतं. साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चारवेळा पटकावला होता