हरफनमौला किशोर

Kishor Kumar

रात्रीची वेळ तरीपण १०-११ विजेची आणि जवळच असलेल्या रेडिओ संचावर आपल्याला जवळचा आणि परिचयाचा असलेला आवाज सुरु होतो काहीसा वेगळेपण आणि गाण्याची स्टाईल पण भन्नाट असेलेले गाणे हळूच आपल्या ओठी पण गुणगुणायला लागते नकळतच अप्रत्यक्षरीत्या आपण पण त्यास साथ देतो. ते गीत मग ‘दुःखी मन मेरे ‘असो वा ‘पग घुंगरू’ जागचे हलू सुद्धा देत नाही आणि तन मन प्रसन्न करून टाकते. अश्या अनेक गीतांनी आपला गतकाळ आणि वर्तमान सजविणारा अवलिया, कलंदर किशोर कुमार याचा आज वाढदिवस आहे.

४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशच्या खंडवा येथे कुंजीलाल यांच्या घरी ‘किशोर’ अवतरला तो देवाचा आशीर्वाद’ घेऊनच. हो तसेच म्हणावं लागेल कारण तर सांगावयास नकोच आपल्याला. जणू काही भगवंताने पाठविण्याआधी त्यास सांगितले होते की, “धरतीवर जाऊन अशी धम्माल उडवून दे आणि असं काही कर की तुझ्यासारखा पुन्हा होणे नाही” त्या प्रमाणेच आज पर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीस तसा कुणी लाभला नाही आणि लाभणार नाही. बालपणीचा हा ‘आभासकुमार’ अर्थात किशोर बेसुरा होता असं जर सांगितलं तर आज कुणी विश्वास ठेवणार नाही. लहानपणी आपल्या बेसुऱ्या आवाजाने कुणीही त्यास जवळ करीत नव्हतं परंतु कुठलंही कार्य घडवायचं असेल तर देव काहीतरी निमित्त लावतच असतो आणि ते पूर्ण करतो. त्या प्रमाणे घरात खेळात असतांना एक दिवस विळ्यावर आभास चा पाय पडला आणि लहान आभासने भोकांड पसरले ते एवढे की, थांबवल्या थांबेना ! जखम खोलवर झाल्याने खूप दिवस त्याचे रडगाणे बंद झाले नाही. परंतु पुढे काय होणार याची पुसटशी कल्पना बाळ आभास यांस नव्हती. या अपघातामुळे मात्र आभासचा एवढा रियाज झाला की त्या नंतर तो बेसुरा आवाज सुरीला कधी झाला हे पण कळले नाही. जी लोक त्याच्या पासून दूर पाळायची तीच त्याच्या जवळ राहायला लागली.

मोठं झाल्यावर इंदोर च्या ‘क्रिश्चियन’ कॉलेज मध्ये असताना कँटीन मध्ये उधारी करून स्वतः खायचे आणि मित्रांना पण खाऊ घालायचे. येथील उधारीवरूनच मालकाला उद्देशून ५ रुपया १२ आना गायचे आणि टाळाटाळ करायचे. यावरूनच पुढे ‘चलती का नाम गाडी’ मध्ये एक गीत आहे. कॉलेज जीवनात असताना त्यांच्या कुरापती बघून त्यांची तक्रार त्यांच्या वडिलांकडे करण्यात आली त्यामुळे कुंजीलाल यांनी आपला मोठा मुलगा ‘अशोक कुमार’ याकडे किशोरची रवानगी केली. परंतु गाव जरी बदलले तरी आभास बदलणारा थोडाच होता. तिथे पण शूटिंग च्या सेट वर काही ना भानगडी करणे सुरूच राहायचे. अशोक मात्र त्यास हिरो करण्यासाठी खटाटोप करत होता. अखेर ‘शिकारी’ या चित्रपटाद्वारे आभास ने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. परंतु ते तिथेही सिरीयस नव्हते. आणि नियतीला सुद्धा तसे होणे मान्य नव्हते. के एल सेहगल यांचा आभास वर चांगला पगडा होता त्यामुळे नेहमी आभास त्यांची नक्कल करून गाणे गायचा प्रयत्न करायचा. गायक होण्याचं स्वप्न होत. किशोर पहिल्यांदा ‘जिद्दी’ चित्रपटात देव आनंद साठी गायला. आजही ते ‘मरने की दुआए क्यों मांगू ” हे गाणे ऐकले तर हळूहळू आभास ते किशोर मधला फरक कळून येईल. ह्या पहिल्या गाण्याने थोडी ओळख मिळाली होती परंतु त्यांच्यापेक्षा दिग्ग्ज असलेले ‘रफी’ , ‘मुकेश’,’ मन्ना डे ‘ आधीच आपलं वर्चस्व निर्माण करून बसलेले होते त्यामुळे कुणी अनुभव आणि नवोदित किशोर यास काम देत नव्हते. कारण किशोर यांनी कुठल्याही प्रकारचे संगीत व प्रशिक्षण घेतले नव्हते. अनेक वेळा असं झाल्यावर संगीतकार एस डी बर्मन यांनी त्यांच्यातील कला ओळखली आणि किशोर ला संधी दिली. त्यांनी किशोरला सल्ला दिला की, के एल सहगल ची नक्कल केल्यापेक्षा स्वत: काही तरी कर. किशोर कडून बर्मन व इतर संगीतकारआधी हलक्या दर्जाचे गीत गाऊन घेत. परंतु 195६ ची फ़िल्म “फंटूस” च्या ‘दुखी मन मेरे गीत’ ने त्या वेळी संगीतकारांना विचार करण्यास भाग पाडले. आणि त्या नंतर त्यांची ओळख होऊ लागली तरीही ते प्रसिद्धी पासून दूरच होते.

१९६९ साली आलेल्या ‘आराधना’ चित्रपटात त्यांनी “मेरे सपनो की रानी’ हे गाणे गायले आणि ते एका रात्रीत स्टार झाले याच चित्रपटही ‘रूप तेरा मस्ताना’ साठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कार सुद्धा मिळाला आणि चित्रपटसृष्टीला ‘स्टार’ मिळाला. त्या नंतर ७०-८० चा काळ फक्त त्यांचाच होता राजेश खन्ना, अमिताभ यासाठी गायलेली गाणी मध्ये खुद्द ह्या सुपरस्टार च्या शरीरात स्वतः किशोर गात आहे असे वाटायचे एवढा त्यांचा आवाज त्यांना अनुरूप होता. अनेक सुपरहिट गीतांची निर्मिती तेव्हा झाली आणि काळाच्या ओघात त्यांच्या सोबत असलेले गायक कधीच संपुष्ठात आलेत. आधी लता आणि नंतर आशा दीदी सोबत त्यांची जोडी छान जमली. ‘याडलिंग’ हा प्रयोग त्यांनी गाण्यात आणला आणि यशस्वी केला. गाणी गाताना ते नेहमी हसत खेळात राहायचे आणि त्यामुळेच ते गाणे संगीतकारास पाहिजेत त्या पेक्षा अधिक सरस होत होते. एकदा ध्वनिमुद्रण चालू असताना आर डी बर्मन आणि आशाताई सोबत होत्या आणि सर्व ठरले होते त्यानुसार रेकॉर्डिंग चालू झाली परंतु अचानक किशोर कुमार यांनी मध्येच तोंडातून वेडेवाकडे आवाज काढायला सुरुवात केली त्यामुळे आशाताई गांगरून गेल्या की हे अचानक काय झालं परंतु आर डी बर्मन यांनी इशाऱ्यानेच त्यांना गप्प राहण्यास सांगितले. नंतर हे गाणे सुपर हिट ठरले. असे अनेक प्रकार ते करीत आणि गाण्यास वेगळाच साज चढवीत त्यामुळे संगीतकार सुद्धा त्यांच्यावर बेहद्द खुश होते.

किशोर कुमार त्यांच्या वैयक्तिक जीवनात खूप दु:खी होते. त्यांचा संसार नीट झाला नाही. जो सेट आणि पडद्यावर नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून हसवून सोडायचा तोच किशोर वैयक्तिक जीवनात खूप दुःखी होता त्यामुळेच त्यांच्या अनेक “दर्दभऱ्या’ गीतात एक वेगळीच वेदना ऐकू येते. जणू काही आपलं दुःखच ते गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. गीत पडद्यावर साकारताना अभिनेता, गाताना किशोर आणि ऐकताना आपण सर्व त्यात गुंतून जातो आणि हे दुःख आपलंच आहे अशी जाणीव नकळतच होऊन जाते. आपल्या आयुष्यात किशोर यांनी ४ लग्न केलेत. पहिली पत्नी रुमा घोष यांच्याशी १९५०-५८ पर्यंत ते लग्न टिकले त्या नंतर ‘ चलती का नाम गाडी’, ‘हाफ टिकिट’ इ. चित्रपटामुळे मधुबाला आणि किशोर जवळ आले आणि त्यांनी दुसरे लग्न केले परंतु हे सुद्धा टिकले नाही मधुबाला १९६९ मध्ये निघून गेली त्यामुळे किशोर पुन्हा एकटे पडले त्या नंतर योगीता बाली आणि अखेर लीना चंदावरकर सोबत त्यांनी संसार थाटला. तेव्हा त्यांच्या जीवनात सुख आले होते. लीना त्यांची काळजी सुद्धा घ्यायची. त्यामुळे किशोर कुमार यांना हवा तास जोडीदार मिळाला होता.

भारतात १९७५ ला आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस सरकारी कार्यक्रमात गाण्यासाठी किशोर कुमार याना बोलावणे आले होते परंतु त्यांनी त्यास नकार दिल्याने सरकारने “आकाशवाणी’ वरून त्यांच्या गाण्यावर बंदी घातली होती. आणि त्यांच्या घरी आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले. परंतु त्यांनी तरीही आपत्कालीन स्थितीचे समर्थन केले नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की, अजूनही आयकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या काही फिल्म्स आयकर विभागात धूळ खात पडल्या आहेत.

त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कुमार यांचा वाढदिवस १३ ऑक्टोबर हाच दिवस किशोर कुमार यांचा शेवटचा दिवस ठरला. आपल्या राहत्या घरी आपल्या पत्नीसोबत थोडी बातचीत केल्यावर आपल्या अभ्यासिकेत जात असताना किशोरदा ना हृद्यविकाराचा झटका आला आणि एक हरफनमौला आपल्याला सोडून निघणं गेला. आज किशोरदा ला जाऊन अनेक वर्षे लोटली परंतु ते अजरामर आहेत. त्यांच्या सारखा ना झाला ना होणार. देवाने त्याला मनुष्याच्या मनोरंजनासाठी धरणीवर पाठवले होते परंतु नंतर खुद्द भगवंतास राहवले नाही आणि त्यांस पुन्हा आपल्याकडे बोलावून घेतले. अश्या ह्या अस्सल कलावंतांबद्दल लिहावे तेवढे थोडेच