यंदाचा गणेशोस्तव डीजे विना

Buldhana District official website

गणेशोस्तव जवळ येवून ठेपला आहे त्यामुळे मंडळांची लगबग सुद्धा वाढली आहे परंतु या वर्षी विना गोंगाटाचा हा सोहळा होणार आहे. कारण ठाणे पोलिसांनी ‘डीजे’ वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे मालकांचे साहित्य जप्त करण्याचा इशारा दिल्याने डीजे मालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी यंदा उत्सवांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे यंदा उत्सवात ध्वनिवर्धक आणि डीजेंचा दणदणाट ऐकायला मिळणार नसल्याने जनसामान्यांतून याचे स्वागत होत आहे.
नक्कीच ही वार्ता चांगली आहे. सर्वसामान्य लोक याचे स्वागत करीत आहेत. आपणास आठवत असतील ज्या वेळेस डीजे वगैरे नव्हते त्या वेळेस का गणेशोस्तव साजरा होत नव्हता? पण आता गणेशोस्तवच्या नावाखाली नुसता थिल्लरपणा वाढत चालला आहे. त्याला ही चांगली चपराक आहे. हीच पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात राबविली गेली तर किती तरी वेळ, पैसा वाचेल शिवाय ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. परंतु राजकीय पक्षांशी संबंधित मंडळे आणि मुजोर आणि स्वार्थी कार्यकर्ते यांच्यामुळे इतर लोकांस सुद्धा हा त्रास सहन करावा लागतो. शिवाय पोलिस सुद्धा काही करू शकत नाही. आपली राजकीय ताकद वापरून दादागिरी करणाऱ्या ह्या राजकीय धेंडामुळे पोलीस किंवा प्रशासनालाही मूग गिळून गप्प बसावे लागते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीच्या मर्यादेबाबत नियम आखून दिले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. मात्र यंदा आवाजाच्या पातळीची मर्यादा ओलांडल्यास सहा महिन्यांसाठी ध्वनिक्षेपकाचे साहित्य जप्त करण्यात येईल किंवा तीन वर्षे कारावास किंवा पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा होईल, अशी तंबी देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशी स्थिती दिसून आल्यास नक्कीच बर वाटेल.