एसटीची चाके दुसऱ्या दिवशी सुद्धा थांबलेलीच !

ST Stand Buldhana

ऐन दिवाळीत मंगळवारी ‘एसटी’तील विविध कामगार संघटनेच्या वेतन वाढीच्या मागणीवरून सुरू झालेल्या बेमुदत राज्यव्यापी संपाला आज २ रा दिवस उजाडला परंतु तरीही संप सुरूच एसटीची चाके दुसऱ्या दिवशी सुद्धा थांबलेलीच होती. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल चालू आहेत. अनेक प्रवाशी बस स्थानकावर उभे असल्याचे चित्र बुलडाणा बस स्थानकावर दिसायला मिळत आहे. कदाचित अचानक संप संपेल आणि  एखादी गाडी सुटेल अशी आशा त्यांना वाटत असावी.

बुलडाणा जिल्ह्यातून पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई सारख्या ठिकाणी अनेक जण नोकरी आणि शिक्षण घेत आहेत. दिवाळीमुळे या सर्वांची चांगलीच गैरसोय झाली आहे. तर दिवाळी घरी साजरी करण्यासाठी अनेकांनी एसटीचे आगाऊ आरक्षण केले होते, परंतु एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हे प्रवासी बसफेऱ्या बंद असल्यामुळे पुण्या मुंबई ला अडकून पडले आहेत. मात्र  ऐन दिवाळीच्या तोंडावर हा संप पुकारला गेल्याने खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांचे भले झाले आहे.

आधीच दिवाळी हंगामात अव्वाच्या सव्वा भाडेवाढ करणारे ट्रॅव्हल्स यावेळी मनमानी करताना दिसून येत आहेत. काही जणांनी या परिस्थितीचा फायदा घेत औरंगाबाद बुलडाणा मार्गावर गाड्या सुद्धा सुरु केल्या आहेत.

सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या संपामुळे ऐन दिवाळीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी संप पुकारला आहे. पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि सरकार यामध्ये तोडगा कधी निघणार ? हा संप अखेर संपणार कधी ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भाऊबीज सारखा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे अनेक जण आतापासून नियोजन करतांना दिसत आहे.