पीएफ काढणे झाले आता सोपे

प्रॉव्हिडंट फंडची (पीएफ) रक्कम काढण्यासाठी आता पुरावे म्हणून कागदपत्रे न जोडताही केवळ ऑनलाइन अर्ज करून कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’ काढता येणार आहे. नोकरी सोडली असल्यास ‘पीएफ’ची पूर्ण रक्कम, आणि नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्याला घर खरेदी करण्यासाठी शंभर टक्के, शिक्षण आणि लग्नासाठी ५० टक्के, तर वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी सहा महिन्यांच्या वेतनाच्या रकमेएवढा ‘पीएफ’ काढता येणार आहे.

‘ईपीएफओ’ ने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘ईपीएफओ’ च्या कार्यालयात घालावे लागणारे हेलपाटे आणि एजंट यांच्यापासून कर्मचाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. ‘पीएफ’ ची रक्कम ही कर्मचाऱ्याची असली, तरी ती काढायची असल्यास वेळ द्यावा लागतो ‘पीएफ’ कशासाठी काढायचा, याबाबतच्या कारणांपासून ते विविध कागदपत्रे जोडण्यापर्यंतचे विविध कार्य करावे लागतात, पण आता यातून कर्मचाऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर किमान पाच दिवसांत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. त्यासाठी कोणतीही कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत. मात्र, आधार क्रमांकाची नोंदणी असलेल्या आणि यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असलेल्याच कर्मचाऱ्यांनाच हा लाभ घेता येणार आहे.

एखाद्या कामगाराने नोकरी सोडली किंवा नोकरीत बदल केला की बहुतांश कामगारांकडून ‘पीएफ’ ची रक्कम काढून घेण्याकडे कल असतो. वास्तविक दुसरीकडे नोकरी केल्यास तोच ‘यूएएन’ नंबर ठेऊन ‘पीएफ’ ची रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. मात्र, अनेक कर्मचारी हे ‘पीएफ’ ची रक्कम काढून घेत असल्याचे ‘ईपीएफओ’ च्या निदर्शनास आले. याबाबत विभागीय ‘पीएफ’ आयुक्त अरुण कुमार म्हणाले, ‘पीएफ काढण्यासाठी ‘ईपीएफओ’ने ऑनलाइन क्लेम फाइल करण्याची व्यवस्था केली आहे. ही सेवा युनिफाइड पोर्टलवर सुरू झाली आहे. त्यासाठी या पोर्टलवर आधार क्रमांक, यूएएन क्रमांक आणि संबंधित ‘पीएफ’ धारकाच्या बँक खात्याचा क्रमांक द्यावा लागणार आहे.’

‘ऑनलाइन ‘पीएफ’ काढण्यासाठी नागरिकांना यूएएन नंबर, आधार कार्ड नंबर देणे सक्तीचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण केलेल्याच कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘ईपीएफओ’च्या कार्यालयात येण्याची गरज नाही.

‘ईपीएफओ’ च्या वेबसाइटरवर ऑनलाइन क्लेमचा ऑप्शन असेल. तेेथे ‘यूएएन’ नंबर आणि आधारकार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. त्यानंतर क्लेम स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट लिंक वर क्लिक करा.
 
http://www.epfindia.com/site_en/