बुलडाण्यात मुसळधार पाऊस

बुलडाणा शहर आणि परिसरात अनेक दिवसांपासून रखडलेला पाऊस आज अखेर धो धो कोसळला. पावसाळ्यास सुरुवात होऊन दीड महिना लोटला आहे. परंतु अजूनही म्हणावा तास पाऊस जिल्ह्यात झाला नाही. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसानंतर आपल्या पेरण्या आटोपल्या आणि त्या नंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असतानाच आज पावसाने हजेरी लावून शेतकरी वर्गास दिलासा दिला आहे.

अनेक दिवसापांसून आभाळ फक्त ढगांनी आच्छादलेले राहत होते परंतु पावसाचा थेंब सुद्धा पडत नव्हता. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी वर्ग सुद्धा पाऊस कधी पडणार या प्रतीक्षेत होता. परंतु आज दुपारी वरुणराजाने आपली कृपा केली. कालपासून शहर व परिसरात पावसाचे वातावरण तयार झाले होते आणि आज दुपारी १ च्या दरम्यान बुलडाणा शहर आणि परिसरात जोरदार पावसास सुरुवात झाली. तब्ब्ल दीड तास जोरदार पाऊस झाल्याने शहरातील जयस्तंभ चौक, बस स्टॅन्ड परिसरात पाणी साचले होते. त्यात आज रविवारचा दिवस आणि आठवडी बाजार असल्याने बाहेरगावाहून आलेल्या भाजी विक्रेत्यांची तारांबळ झाली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बसण्यास जागा उरली नाही. त्यामुळे कित्येक जण उभे राहून विक्री करताना दिसून येत होते. १ वाजेपासून सुरु झालेल्या पावसाची रिपरिप अजूनही थांबली नाही.