बुलडाणा जिल्ह्यात एकमेव असलेलं अभयारण्य म्हणजे ज्ञानगंगा. बुलडाणा – खामगाव मार्गावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे, अस्वल, निलगाय, तडस, रानगवे इ. प्राणी आढळून येतात. बुलडाणाहून अमरावती कडे जाणारा मार्ग सुद्धा ह्याच ज्ञानगंगा अभयारण्यातुन जात असल्याने या रस्त्यावर साहजिकच वर्दळ सुद्धा वाढलेली असतेच. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना अनेकदा या मार्गावर वन्यप्राण्यांचे दर्शन झालेले आहे. शिवाय वन्यप्राण्यांचा मृत्यू सुद्धा वाहनांच्या धडकेने झाला आहे. त्यामुळेच रात्रीच्या वेळी हा मार्ग बंद करण्यात आला. गेली वर्षभराहून अधिक दिवसापासून बंद करण्यात आलेला हा बुलडाणा- खामगाव मार्ग रात्री पुन्हा सुरु होणार? असा प्रश्न सध्या चर्चेत येत आहे.
परंतु मार्ग बंद केल्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना मात्र नाहक नांदुरा मार्गे बुलडाणा गाठावे लागत आहे. शिवाय रात्री मार्ग बंद केल्याने ये जा करणारे ट्र्क आणि इतर वाहने इतर मार्गे जातात किंवा वरवंड फाटा किंवा बोथा येथे अडकून पडतात. त्यामुळे बुलडाणा शहराच्या विकासास ही बाब अडथळा ठरत आहे. हा मार्ग पूर्ववत चालू करावा म्हणून एक निवेदन सुद्धा प्रशासनास देण्यात आले होते. तर तो पुन्हा चालू न व्हावा म्हणून सुद्धा एक निवेदन त्या नंतर पर्यावरण मित्रांनी दिले होते. सदर समस्येवर तोडगा निघणे आवश्यक आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातुन जाणारा मार्ग हा अधिक अंतराचा असल्याने याठिकाणी उडडाणपूल बांधणे यासारख्या संकल्पना अधिक खर्चिक आणि सोईस्कर ठरणार नाही. शिवाय उडडाणपूलाचे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागू शकतो.. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतुर्फा जाळी लावणे आणि वन्यप्राणी आणि मनुष्य यांचा संपर्क टाळणे हा उपाय कामी येऊ शकतो. दुतर्फा जाळी लावणे यास उडडाणपुलापेक्षा कमी खर्च आणि काम पूर्ण होण्यास कालावधी सुद्धा कमी लागू शकतो त्यामुळे यावर हा उपाय वन्यजीव आणि मनुष्य यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासंबंधी प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.