बुलडाणा शहरापासून अवघ्या १६ कि.मी. अंतरावर अजिंठा लेणी या मार्गावर गिरडा हे निसर्गरम्य अशा डोंगरदऱ्यांमधे वसलेले पर्यटन क्षेत्र व धार्मिक क्षेत्र देखील आहे. हे क्षेत्र डोंगरदऱ्यांमधे असल्याने येथे मोर, माकड व असे अनेक जंगली पशु, पक्षी व प्राणी येथे पाहण्यास मिळतात.
गिरडा येथे प्राचीन महादेव मंदिरामुळे या गावाला जुनी ओळख आहे.तसेच स्वयंप्रकाशबाबांची येथे समाधीस्थळ देखील या गावात आहे. एका आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना अर्जुनाने बाण मारुन इथे पिण्याच्या पाण्याचा स्रोत निर्माण केला होता. त्यातून पाच झरे निर्माण झाले त्याचेच पाणी गोमुखातून आजपर्यंत निरंतर बाहेर पडत आहे. या परिसराच्या लगतच जवळपास आठ हजार लोकांची लोकवस्तीचे गाव देखील आहे.
गिरडा येथे पंचझिरीचा निसर्गरम्य परिसर आणि त्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेत गजानन महाराज शेगांव संस्थानाने गिरडा हे गाव दत्तक घेतले. स्वयंप्रकाशबाबा ज्या झोपडीत राहत होते तो परिसर आणि त्यांच्या समाधीस्थळावर एका मंदिराची स्थापना संस्थानच्या मार्फत करण्यात आली. परिसराच्या विकासासाठी बुलडाणा जिल्हाधिकारी गणेश ठाकूर यांच्या सहकार्याने संस्थानाने पाच एकर जमिनीवर जलसंधारण व वृक्षारोपणाचे मोठे कार्य हे पूर्ण केले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज शेगांव संस्थानच्या मदतीने या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली करण्यात येत आहे. यामुळे गिरडा या निसर्गरम्य पर्यटन क्षेत्राला व धार्मिक क्षेत्राला अनेक पर्यटक भेट देतात तसेच या परिसरात शाळांच्या सहलींचे आयोजनही केले जाते.