आजपासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे. घरोघरी आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लहानथोर सुसज्ज झालेले आहेत तर सार्वजनिक मंडळे सुद्धा सजावट, मिरवणूक यामध्ये व्यस्त आहेत. आज बुलडाणा बाजारपेठेत सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती.
आपल्या चिल्यापिल्ल्यासह वडीलधारी मंडळी गणेशमूर्ती व हार फुले, डेकोरेशन सामग्री घेण्यात व्यस्त असलेले दिसून येत होते. अनेक ठिकाणी सकाळपासूनच तयारीस सुरुवात झाली दिसून येत होती. अनेक ठिकाणी बाप्पाचे आगमन झालेले दिसून आले तर अजूनही काही मंडळे आपली तयारी करण्यात व्यस्त होती. अनेक सुंदर व आकर्षक मूर्ती आज बाजारात विक्रीस उपलब्ध होत्या. ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात सुरु झालेला हा उत्सव येत्या नऊ दिवस सुरु राहणार आहे. येत्या नऊ दिवसासाठी अनेक मंडळांनी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्वत्र हेच भक्तिमय वातावरण राहणार आहे. त्या नंतर लगबग सुरु होईल बाप्पास निरोप देण्याची.