मैद्याचे पदार्थ खाण्याचे दुष्परिणाम

आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक पदार्थ हा चोथायुक्तच असला पाहिजे यावर भर दिला जातो. गव्हाच्या पिठाचा कस काढून तयार केलेले पांढरेशुभ्र पीठ म्हणजे मैदा.
मैदा बनवताना गव्हाचे साल काढून टाकले जाते. गव्हामधील सर्व कोंडा बाजूला काढून टाकला जातो. या कोंडय़ातच सर्व प्रकारचे खनिजद्रव्ये असल्याने मैदा हा निसत्व होतो. त्याचा आरोग्यासाठी काहीही उपयोग होत नाही.परंतु मैद्यापासून पदार्थ बनविण्यास सोपे व झटपट करता येत असल्यामुळे हॉटेलपासून ते स्वयंपाक घरापर्यंत सर्वच ठिकाणी मैद्याने प्रवेश केलेला आहे. त्याचे गुणधर्म जाणून न घेता सर्वचजण रोजच्या आहारामध्ये मैदा वापरतात.

उदाहरण – बिस्किट्स नानखटाई, पाव, खारी, ब्रेड, टोस्ट, समोसा, पॅटीस, शंकरपाळे, करंज्या, बेकरी प्रॉडक्ट्स, स्नॅक्स, नूडल्स, कचोरी, सामोसे, असे बरेच पदार्थ हे मैद्यापासून बनविले जातात आणि हे पदार्थ लहान मुलांपासून गृहिणी ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच आवडतात.

मैदा बनविण्याची प्रक्रिया: गव्हाला थोडे पाणी लावून दळल्यावर त्यातील चोथा बाजूला करून अगदी मऊ असे पीठ शिल्लक राहते त्यालाच मैदा असे म्हणतात. हा मैदा अगदी पांढरा शुभ्र दिसण्यासाठी रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. तो मैदा जास्त दिवस टिकण्यासाठी संरक्षकांचा (Preservative) वापर केला जातो. त्यामुळे तो आरोग्यास हानिकारक होतो. या सर्व प्रक्रियांमुळे गव्हाच्या सालीमधील ‘ड’ जीवनसत्व, खनिज द्रव्ये, स्निग्ध पदार्थ काढून टाकले जातात. गव्हामधील सर्व ९८ टक्के पौष्टिक सत्वयुक्त घटक नष्ट होतात व उरलेले पांढरे पीठ म्हणजेच मैदा होय.
गुणधर्म, खनिजद्रव्ये, ‘ड’, ‘ई’ जीवनसत्वे, क्षार यांचा अभाव मैद्यामध्ये असतो. मैद्यामध्ये फक्त कर्बोदक (carbohydrates) जास्त प्रमाणात असतात व त्यातून शरीराला फक्त उष्मांक (कॅलरिज) अधिक प्रमाणात मिळतात. त्यामुळे जास्त प्रमाणात मैद्यापासून बनविलेले पदार्थ खाल्ल्यास शरीर अनेक आजारांचे माहेर घर बनते. कारण शरीराचे पोषण न होता फक्त वजन वाढत राहते. सध्या त्यामुळे लहान मुलांमध्येही लठ्ठपणा हा आजार आढळून येतो. कारण, नूडल्स, केक, बिस्किट्स अशा प्रकारचे पदार्थ मुलांना फार आवडतात. सध्याच्या काळात आईलाही घरगुती पदार्थ बनविण्यास वेळ न मिळाल्यामुळे तीही मुलांना आवडीने हे पदार्थ खाऊ घालते.

मैदा हा अतिशय चिवट पदार्थ असतो. त्यामुळे पचनासदेखील जड असतो. आतड्यामधून तो लवकर पुढे सरकत नाही. त्यामुळे आम्लपित्त, अपचन, मळमळ, मलावष्टंभ, वायू असे पोटाचे विकार सुरू होतात. त्याचबरोबर शरीराला फक्त उष्मांक मिळाल्यामुळे लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह हे ही आजार वाढीस लागतात. पोटाचे आजार: मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे याच्या सेवनाने पोट खराब होते व बद्धकोष्ठताहोण्याची शक्यता असते.
अशक्तपणा: मैद्याचे पदार्थ नियमित खाल्ल्याने शरीरातील इम्‍यून सिस्‍टम कमजोर होते व शरीर अशक्त बनते नेहमी नेहमी आजारी पडण्याची शक्यता असते. असे विविध आजार होण्याची शक्यता बळावते. मैद्यामध्ये शरीराला पोषक अशी नैसर्गिक मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे, प्रथिने, चोथा नसल्याने त्याच्या अतिसेवनाने आरोग्य धोक्यात येते.

उदा- त्वचाविकार (तोंडावर पांढरट चट्टे येणे असे विविध), डोळ्याचे विकार (रातांधळेपणा), मुखपाक (तोंड येणे) असे विकार निर्माण होतात.
आधुनिक काळातदेखील मैदा हा आरोग्यास घातक आहे हे सिद्ध झाले आहे. मैदा करण्याच्या प्रक्रियेत क्रोमियम, झिक, तांबे व मॉलीबिडीनम यांसारखी शरीरवाढीस उपयोगी नैसर्गिक मूलद्रव्ये नष्ट होतात, म्हणून तो खाणे टाळावे, हि एक योग्य अशी आरोग्यासाठी टिप्स आहे. कारण, आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सर्व नैसर्गिक मूलद्रव्ये आवश्यक आहेत, परंतु समाजातील मोठे सुशिक्षित वर्गापासून ते औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारवर्ग, शाळकरी मुले मैद्याच्या पदार्थाना गैरसमजुतीने प्रतिष्ठा मिळाल्याने चविष्ट असल्याने अति प्रमाणात खातात.

पर्यायी पदार्थ – सर्व पदार्थ बनविण्यासाठी मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करावा. पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा मैद्याचे दुष्परिणाम लक्षात आल्यामुळे व्हाइट ब्रेडऐवजी गव्हाच्या कोंडय़ासह तयार केलेला ब्राऊन ब्रेड वापरतात. या ब्रेडमध्ये सर्व जीवनसत्त्वे असतात.
पालेभाज्या व डाळींचे थालिपीठ, नारळाची चटणी, मोड आलेले पदार्थ घालून केलेला पुलाव अशा प्रकारच्या सकस पदार्थाचा वापर करावा. गव्हाच्या पिठाचे गूळ घालून केलेले गुलगुले, पुरणपोळी, कापण्या, जाडसर गव्हाच्या भरडय़ाची लापशी, मुगाच्या डाळीचे धिरडे, गोड-तिखट पुऱ्या अशा विविध पदार्थाचा वापर करावा. कारण हे पदार्थ गव्हापासून बनविल्यामुळे त्यातील सर्व नैसर्गिक मूलद्रव्यांमुळे आरोग्य चांगले राहते. घरातील प्रत्येक गृहिणीने कौशल्यपूर्वक चौकस बुद्धीने जर घरगुती विविध पदार्थ बनविले, तर नक्कीच लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य अबाधित राहील यात शंका नाही.