लोणार सरोवर पर्यटन महोत्सव ३ ते ५ मार्च रोजी

lonar website

जगप्रसिद्ध लोणार सरोवर पर्यटन महोत्सवाचे आयोजन येत्या ३ ते ५ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. त्यादृष्टीने लोणार सरोवराच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले आहे. लोणार सरोवर जगातील लोकांना बघता यावे.  त्याची माहिती आणि भेट देण्याच्या दृष्टीने http://lonarfestival.in संकेतस्थळाची स्थापना करण्यात आली आहे.

लोणार येथे ३ ते ५ मार्च दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ मार्च रोजी सकाळी ७.०० ते १०.०० वा. वेळेत सिंदखेड राजा ते लोणार महोत्सव ज्योत आहे.  त्या नंतर सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ होणार असून दुपारी ३.०० ते ५.०० सिंधुताई सपकाळ आणि डॉ. स्मिता देशमुख यांचे व्याखान होणार आहे. सायं. ७ ते १० या वेळेत स्वरानंद (डॉ. विकास आमटे निर्मित) यांचा आनंदवन तुमच्यादारी हा कार्यक्रम असेल.

दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी सकाळी ६.०० ते ७.०० वेळेत ‘मी धावतो लोणारसाठी ‘ ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. त्या नंतर सकाळी १०.०० ते २.०० वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोणार सरोवर महत्व व संवर्धन यावर दु. ४ ते ५ वेळेत परिसंवाद कार्यक्रम होणार आहे. चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांचा विनोदी कार्यक्रम सायं. ७.०० ते १०.०० या वेळेत होणार आहे.

४ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ योगाथोन, ८ ते ९ अजित कडकडे यांचा भक्ती संगीत कार्यक्रम होणार आहे. दु. १२ ते १ वेळेत प्रा. म. के. देशमुख हे संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित नाटिका सादर करतील. त्या नंतर सुरेखा पुणेकर यांचा ‘नटरंगी नार’ हा कार्यक्रम ७ ते १० वेळेत होणार आहे.

दरवर्षी लोणार महोत्सवाचे आयोजन व्हावे अशी पर्यटकांकडून मागणी होत होती. ती प्रशासनाने पूर्ण केली आहे. हा महोत्सव दर्जेदार होण्यासाठी सर्वच स्तरातून जोरदार प्रयत्न होत आहेत.

लोणार सरोवर

लोणार सरोवर

लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खार्‍या पाण्याचे एक सरोवर आहे.लोणार सरोवर याची निर्मिती एक उल्केमुळे झाली. उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर लोणार सरोवर असून औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या सरोवराची निर्मिती मंगळावरील अशनी आदळल्याने झाली असावी असा दावा काही संशोधक करतात. हा दावा प्रबळ करणारा पुरावा डॉ. तांबेकर यांच्या या संशोधनामुळे सापडला आहे.

सुमारे पन्नास हजार वर्षांपूवीर्च्या या लोणार सरोवर मध्ये मंगळावरील विषाणू सापडला असून ‘बेसिलस ओडीसी’ असे त्याचे नाव आहे. इ.स. २००४ मध्ये नासाच्या अंतराळयानाने मंगळावरील मोहिमेत या विषाणूचे अस्तित्त्व शोधले होते. लोणार सरोवर परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. पौराणिक आख्यायिकेनुसार लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास लोणार सरोवर हे नाव मिळाले. ब्रिटीश अधिकारी जे. ई. अलेक्झांडर यांनी इ.स. १८२३ मध्ये या विवराची नोंद केली. तसेच आईना-ए-अकबरी, पद्म पुराण व स्कंध पुराण यासारख्या प्राचीन ग्रंथातही विवराचा संदर्भ आढळतो. प्राचीन या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे.