उच्च शिक्षणात ऑनलाईन क्रांती

ऑनलाइन कोर्सेस हा प्रकार तसा फारचा नवीन नाही. पूर्वी इंटरनेट नव्हतं तेव्हाही ‘करस्पॉन्डन्स कोर्सेस’ असत. पत्रव्यवहार करुन दूरुन शिकता येई. परंतु इंटरनेट आलं आणि पोस्टाची गरज उरली नाही. इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन कोर्सेसचा उदय झाला. परंतु ऑनलाइन कोर्सेसना तितका मान नव्हता किंवा आजही नाही. ज्यांना मुख्य मार्गानी शिकता येत नाही, असे लोक ऑनलाइन कोर्सेस करताना दिसतात. परंतु अमेरिकेत एका कंपनीने हे समीकरण बदलायचा विडा उचलला आहे.
फेब्रुवारी 2013 मध्ये अमेरिकन काऊन्सिल फॉर एज्युकेशन या संस्थेने आपल्या सदस्य विद्यापीठांना ‘कोर्सेरा’ कंपनीच्या पाच कोर्सेसना (विषयांना) जमेस धरण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचाच अर्थ, काही विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी हे ऑनलाइन कोर्सेस केले असतील तर ते जमेस धरुन त्या विषयाची परीक्षा त्यांना त्या विद्यापीठात द्यावी लागणार नाही! ऑनलाइन कोर्सेसना मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रक्रियेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.