परवा एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो होतो. त्या ठिकाणी जमलेल्या मंडळींनी तिसऱ्या एका नातलगांच्या मुलाचं लग्न काय धुमधडाक्यात झालं यांवर चर्चा रंगवली. धुमधडाक्यात म्हणजे काय हो ? असा आपसूकच प्रश्न त्यांना केल्यावर हजारो रूपांचा डीजे, आतिषबाजी आणि मद्य असा काय थाट होता असं साहजिक उत्तर मिळाले. यामधून एक प्रश्न पडला की हे लग्न होतं की पार्टी ? ज्या व्यक्तीला भविष्याची चिंता नाही किंवा पैसा कमविताना ज्याला श्रम लागले नाहीत ते असं काही करताना कुठलाही विचार करणार नाही. परंतु ज्यांना रोज खाण्यासाठी कष्ट करावे लागतात त्यांनी सुद्धा असे फसवे आणि पोकळ शोक का करावे ? असा प्रश्न पडला म्हणून न राहवून थोडं लिहावंसं वाटलं.
झालं मग लग्न ठरलं आणि सुरु झाली लगबग मंडप बुक करा, कपडे, पत्रिका छापणे आणि हो महत्वाचं म्हणजे डीजे साउंड सिस्टीम ते तर राहूनचं गेलं. ते कसं सोडायचं. तो तर प्रतिष्ठेचा प्रश्न. लोक काय म्हणतील, जर डीजे नाही वाजवला तर ? असा प्रतिपश्न सुद्धा काही जण करतात
विवाह सोहळा म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाला लाभलेले अतिमहत्त्वाचे वळण होय. हिंदू विवाहास सोळा संस्कारापैकी एक संस्कार म्हणतात. उपवर स्त्री पुरुष सर्व नातेवाईकांच्या संमतीने आशीर्वादाने ब्राह्मण व अग्नीदेवाच्या साक्षीने विवाहबद्ध होऊन पती-पत्नी या नात्यात बांधले जातात. त्यांच्या जीवनातील हा अतिमहत्वाच्या प्रसंग आहे. अग्नीला सात प्रदक्षिणा घालणे म्हणजेच सप्तपदी व सात वचने घेऊन दोघांचे शरीर, दोघांचे मन, दोघांचा आत्मा एका पवित्र बंधनात बांधला जातो. हिंदू विवाहात पतिपत्नींमधल्या शारीरिक संबंधांच्या जोडीने आत्मिक संबंधांनाही महत्त्वाचे व अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या दोन जीवांचे मिलन घडवून आणणारा हा विवाह. हिंदू मान्यतेनुसार मानवी जीवनास (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम व वानप्रस्थाश्रम) या चार आश्रमांत विभागले गेले आहे. त्यांतील गृहस्थाश्रमासाठी पाणिग्रहण संस्कार/विवाह हा अत्यावश्यक आहे. हिंदू विवाहानंतर पतिपत्नींमध्ये घडून येणारा शारीरिक संबंध फक्त वंशवृद्धीच्या उद्देशानेच व्हावा अशी आदर्श कल्पना आहे. विवाह संस्कार हा मनुष्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार होय. याच दोघांच्या संसाराला रथ असे संबोधले जाते व या संसार रुपी रथाची ही दोन चाकं म्हणजे पती-पत्नी होत.
काय आहे हा विवाह सोहळा ?
आई-वडील मामा-काका नातेवाईक यांची परीक्षा म्हणजे विवाह सोहळा. परीक्षा म्हणणे वावगे ठरणार नाही कारण हा विवाह सोहळा आनंदात पार पाडणे व त्या नवदाम्पत्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी या वरिष्ठ लोकांची ही तारेवरची कसरतच असते जणू. मुलगा मुलगी उपवर झाले म्हणजे त्या उपवर मुला-मुलींसाठी स्थळ शोधणे. पसंती-नापसंती दर्शविणे, त्यांच्या इच्छा अपेक्षा यांचा ताळमेळ बसवून. सर्वांचा मान-सन्मान, परंपरा,रीती-रिवाज यांचे पालन करून ठरवला जातो हा विवाह सोहळा. ब्राह्मणदेवांना घरी बोलावून तिथी, मुहूर्त, सर्व शास्त्रानुसार वधू आणि वर पक्षाच्या संमतीनुसार कोणत्या दिवशी काय करायचं कधी करायचं हे सर्व ब्राह्मणश्रेष्ठांकडून रीतसर काढल्या जाते.
विवाहापूर्वी मुहूर्त काढणे, हळकुंड फोडणे, हळद दळने असे काही विधी घरातील महिला करतात. लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा घालणे, देवकुंडी बसवणे असे विधी करण्याची प्रथा आहे. हिंदू विवाहा प्रमाणे हिंदू लग्नात लाजाहोम, कन्यादान आणि सप्तपदी हे तीन विधी अत्यावश्यक मानले गेले आहेत. या जोडीने विवाह संस्कारात गणपती पूजन, कुलदेवता पूजन, मधुपर्क, संकल्प, कन्यादान, अक्षतारोपण, मंगल सूत्र बंधन, पाणिग्रहण, होम, लाजाहोम, अश्मारोहण, सप्तपदी, अभिषेक, मंगलाष्टके असे विधी होतात. त्याशिवाय काही ठिकाणी कंकण बंधन, गाठ बांधणे, झाल, रुखवताचे भोजन, असे विविध विधी परंपरागत चालत आलेले आणि सर्व शास्त्रानुसार पार पाडला जाणारा हा संस्कार लोप पावत चालला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
आधुनिक पद्धतीतील विवाह
हिंदू विवाहास प्रत्येक घरातील मग वधू पक्ष असो की वर पक्ष जर सर्व विधी शास्रानुसार करण्यावर भर देतात. लग्नाचा मुहूर्त काढावाच लागतो, तिथी बघावीच लागते, कुंडली मिलान आवश्यकच आहे, कुंडली दोष आहे का? वधू-वर यातील कुणाला मंगळ, किंवा गुरु आहे का ? हे जर सर्व शास्त्रा नुसार बघितल्या जाते. तर मग आपण खरोखरच ज्यावेळी लग्न मुहूर्त काढतो तेव्हा ज्या शास्त्राला मान देऊन हे तिथी मुहूर्त काढले ते पाळतो का ? नाही पाळत. कारण पारंपरिक विवाह सोहळाच ज्याला आपण एक संस्कार म्हणतो तो जणू आपण नष्ट करायला निघालोत. पारंपरिक आपल्या संस्कृतीशी निगडित असे आपण काहीही करत नाही. वधू किंवा वर पक्षांतील कुणाची तरी तीव्र इच्छा असतेच की कर्णकर्कश आवाज असणारा डीजे साउंड सिस्टीम आपल्या लग्नात असायलाच हवी. यावर नकार दिला तर लग्न मोडण्यापर्यंत गोष्ट मोठी होते. मग यांची परिस्थिती शारीरिक,आर्थिक, मानसिक असो व नसो ते आवडत असो व नसो पण हे केल्याशिवाय पुढच्या विधी होणे अशक्यच. यावर सर्रास बोलल्या जाते की, लग्न हे एकदाच होत असते म्हणून एवढं तेवढं चालून जाते. यामध्ये वरिष्ठ मंडळी सुद्धा खतपाणी घालतात. लहानांना जरी कळत नसलं तरी मोठ्यांना न कळणे ही खेदाची बाब नाही का ? याचा अर्थ काय घ्यायचा की, आपणही थोडं ध्वनी प्रदूषण करायला पाहिजेत.? फटाके फोडून वायू प्रदूषणात आपला हातभार लागला पाहिजेत. पर्यावरणाचं तर काही देणंघेणं नाहीच आपल्याला पण आपल्या लग्नात आपण बोलावलेल्या आपल्या वरिष्ठ व वयोवृद्धांना त्या कर्कश ध्वनीचा त्रास होईल त्यांची प्रकृती बिघडेल याची सुद्धा दखल आपल्याला घ्यावी वाटत नाही काय ? काय तर म्हणे डीजे, आतिषबाजी, ह्या प्रतिष्ठेच्या गोष्टी आहेत. यात कसली आली प्रतिष्ठा !
हा प्रतिष्ठेचा नाही तर आपण निरक्षर आणि मूढ असल्याचं प्रमाण आहे. यावर विचार करणे अत्यावश्यक आहे. ब्राम्हणांशी चर्चेत वेळ घालवून आपण मुहूर्त काढतो आणि तोच मुहूर्त ऐनवेळी चुकवायचा. हे पटण्याजोगं आहे का ?
आपल्या लग्नाला आलेल्या नातलग व मित्रांना ताटकळत ठेवणे व सकाळचे लग्न दुपारी, दुपारचे लग्न संध्याकाळी व संध्याकाळचे लग्न रात्री पार पाडणे. याला वेळेस महत्व देणं म्हणतात का ? आज आपणच हा नियम ही रीती परंपरा आपली संस्कृती घेऊन नाही चाललो तर येणाऱ्या पिढीला आपण काय शिकवणार? नावापुरते राहिले सर्व जागच्या जागी. आपल्या संस्कृतीनुसार आपण काय करतो यावर विचार करणे ही आजची काळाची गरज आहे. हा आजचा सर्वत्र साजरा होणारा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने नसून आधुनिक पद्धतीने साजरा होतोय. पण यावर विचार करायला कुणालाच सवड नाही कारण सर्वांना या आधुनिकतेची भारी हौस आहे. निदान हा विचार तरी करायलाच हवा की कर्णकर्कश आवाजमुळे होणारा त्रास आणि अतिषबाजीमुळे रस्त्यावर जो कचरा होतो त्याचं काय ? तो कचरा कुणी उचलायचा? फक्त फटाके फोडणं हे आपलं काम आहे का ? नक्कीच नाही. मग हे थांबायला नको का ? याचा इतरांना सुद्धा त्रास होतच असेल.
भारतीय संस्कृतीत लग्न ही महत्वाची बाब आहे. त्यामुळेच लग्नसंबंधी सर्व गोष्टी तपासून पहिल्या जातात. गुण, स्वभाव वगैरे. इ गोष्टी इतर बाहेर देशात लग्न करतांना आढळून येत नाहीत. त्यामुळे तिथे हा संबंध; मन जुळतं की नाही आणि आवड निवड यावर अवलंबून असतात. त्यातच एक नव्हे तर अनेक लग्न आणि घटस्फोट सारखे प्रमाण सुद्धा जास्त असते. परंतु हिंदू रितीरिवाजानुसार होत असलेल्या लग्न आणि कुंडली मिलनामुळे लग्नानंतर घटस्फोट होणे बाब नगण्य ठरते. तरीही अनेक जण ह्या गोष्टीच्या विरोधात असतात. ह्या सर्व चालीरीती, प्रथा काही नसतं. जोड्या कुठेही देव ठरवत नसतात. अशी उदाहरणे देऊन मोकळे होतात. हीच लोक आपल्या संस्कृतीच्या विरोधात असताना मात्र परंपरेने चालत आलेले इतर सण का साजरे करतात हा वादग्रस्त प्रश्न अनुत्तरित राहातो.
ज्यांना पाशात्य देशात चालणारे विवाह आवडतात. त्यांनी सुद्धा तिकडे होणाऱ्या विवाह प्रसंगी कुठलंही कर्णकर्कश डीजे किंवा इतर वाद्य वाजत नसते. तर हा सोहळा शांततेत आणि आनंदात साजरा होतो. हे विसरून चालायला नव्हे. अनेक चित्रपटात आपण बघत असतो की कुठल्या तरी हिरो आणि हिरोईनचं लग्न असतं आणि त्या प्रसंगी भटजी असतो. आणि बॅकग्राऊंड मध्ये सुरेख शहनाई वाजत असते. ह्या नट नट्या यांना फॉलो करणाऱ्यांनी हे विसरता कामा नये की, ह्यांचे लग्न सुद्धा शांततेत आणि विधिवत पद्धतीनेच होत असते. कारण त्यांना सुद्धा ‘लग्न म्हणजे आयुष्यातील एकमेव प्रसंग आहे’ याचे भान असते. याला काही जण अपवाद असतात तो भाग वेगळा. आनंदात आणि संपूर्ण आयुष्य सुखकर करण्याकडे त्यांचा कौल असतो. म्हणून गाजावाजा आणि आकर्षित करणाऱ्या इतर बाबी किंवा क्षणभंगुर गोष्टीकडे लक्ष न देता किंवा इतरांनी केलं म्हणून आपण सुद्धा केलंच पाहिजेत असा अट्टाहास योग्य नव्हे. असे करणे म्हणजे निव्वळ पैशाचा अपव्यय नव्हे का ? निदान आपण काय करतो किंवा मनुष्य म्हणून काय करायला पाहिजेत याची जाण असायला हवी.
शिवाय अन्नाची नासाडी हा एक महत्वाचा प्रश्न. पात्रात वाढलेले किंवा आजकालच्या बुफेमध्ये हाताने घेणे आणि उभे राहून खाणे. या दोन्हीमध्ये पात्रातील अन्न तसेच पडते आणि मग ते फेकून दिल्या जाते. हे कितपत योग्य आहे. आग्रह करून वाढणे ठीक आहे परंतु जर समोरचा खरंच नाही म्हणत असेल तर त्याला जबरदस्ती वाढणे आणि आपण किती “दिलदार व्यक्तिमत्व’ आहोत असं करणारी वाढेकरी मंडळी सुद्धा भान हरवून काम करीत असतात. यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आपणच म्हणतो की, “अन्न हे पूर्णब्रम्ह” तर मग त्याच अन्नपूर्णेचा हा अपमान नव्हे का ? यशिवाय जेवण झाल्यावर इतरत्र फेकून दिलेल्या प्लस्टिकच्या पत्रावळ्या शोभा वाढविण्याचे काम करतात का ? नक्कीच नाही. एकीकडे प्लास्टिकचा निषेध करतांनाच दुसरीकडे पर्यावरण आणि जनावरांसाठी घातक ह्या प्लास्टिक पत्रावळ्या बंद झाल्या पाहिजेत. भारताच्या दक्षिण भागात अजूनही कुठलाही छोटा वा मोठा उत्सव असला तरी गरीब आणि श्रीमंतांकडे जेवणाची शोभा वाढण्याचे काम केळीचं पानच करीत असतात. आपण केळीचं पण नाही पण पळसाची पत्रावळी वापरू शकतो. आपल्या परिसरात ही वनसंपदा मुबलक प्रमाणात आपल्याला मिळालेली आहे. आधी खाली बसून आणि पळसाच्या पानावर जेवण घेतांना जो आनंद मिळायचा किंवा तृप्त होऊन ढेकर निघायची ती पण काळाच्या ओघात येणे बंद झाले आहे की काय ? असा प्रश्न पडतो.
आपणच आपल्या पारंपरिक संस्कृतीचा उदो उदो करत फिरत असतो मग आपले पारंपरिक वाद्य आपणच का संपुष्ठात आणायला निघालोत ? आपल्या भावी पिढीला आपण काय शिकवण देणार ? भावी पिढी तर पूर्णत:च संस्कृती विसरलेली असेल ? थोडा विचार करा व या आधुनिकीकरणाला थोडं थांबवा. पर्यावरणाचा विचार करणे यातच आपल्या सर्वांचं हित आहे .
– श्रीकांत बगाडे