मलकापूर रोडला अवैध प्रवासी वाहतूकीचा जॅम !

Malkapur Road Buldana

बुलडाणा मलकापूर रोडवर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहतुकीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. त्यामुळे गर्दी होणे साहजिकच आहे. नगरपालिकेने जयस्तंभ चौकात भरणारा बाजार इतरत्र हलविल्याने त्याठिकाणी रहदारी कमी झाली परंतु मलकापूर रोड आणि इतर ठिकाणचे काय ? हा प्रश्न अजूनही तसाच आहे.

सोलापूर- मलकापूर हा महामार्ग बुलडाणा शहरातून जातो. त्यामुळे अनेक अवजड वाहने आणि बस, कार यांची वर्दळ रस्त्यावर असते. त्यातच रविवार सारखा दिवस असल्याने बाजाराच्या निमित्ताने भाजीपाला, धान्य विक्रेते आणि इतर व्यापारी बाहेर गावाहून शहरात येत असतात. परिणामी प्रचंड गर्दी झालेली दिसून येते. मलकापूर रोड वर रस्त्याच्या दुतर्फा हे व्यापारी बसत असल्याने वाहनांना येण्या जाण्यास अडचण निर्माण होत असते. शिवाय तलाठी कार्यालया समोर अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी रिक्षा तसेच इतर गाड्या सुद्धा असल्याने यातच भर पडत असते. ऐन रस्त्यात आपली वाहने उभी करून प्रवाशी भरण्याचे काम वाहनचालक करीत असतांना त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे सुद्धा भान नसते. अनेक वेळा रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या केल्याने मागे असलेल्या गाडयांना जाण्यास वाट मिळत नाही तर कधी हमरी तुमरी सारख्या घटना सुद्धा होत असतात. जयस्तंभ चौकात ट्रैफिक पोलीस उभे असलेले अनेकदा दिसून येतात तरीही असा प्रकार घडत असल्याने ह्यांना पोलिसांचे अभय आहे का ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.