स्वयंपाकासाठी उपयुक्त अशा टिप्स..

स्वयंपाक करतेवेळी बऱ्याचवेळा मुलींची, नवनवरीची तारांबळ उडत असते.घरातील मोठ्या महिलांना तर दीर्घ अनुभव असतो स्वयंपाकाचा. पण नवं युवतींचे काय ? होतात चुका मग अशावेळी काय करायचं हे एन वेळेवर आठवत नाही. कधी भाजीत मीठ जास्त होते, तर कधी भाजी वेगळी व रसा वेगळा पळतो, तर कधी खूपच पातळ रसा होतो, चांगला तांदूळ वापरला तरी भात काही पांढरा शुभ्र होत नाही, भांड्यांना कांद्याचा लसणाचा वास राहतो, पुऱ्या बनवताना खुसखुशीत होत नाहीत. अशा विविध समस्या स्वयंपाक बनवताना येतात. तर आज आपण याच अडचणी दूर करण्यासाठी यावर काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत.

१) तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला. भात पांढरा होतो.

२) भाजीचा रसा घट्ट, स्वादिष्ट होण्यासाठी शेंगदाण्याचे किंवा तिळाचे कूट, नारळाचा किस करून भाजीच्या रस्यात टाका.

३) कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, चविष्ट होते.

४) भांडय़ाला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं. वास निघून जातो.

५) हाताला किंवा पाटा-वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा लिंबू चोळा.

६) पुरीसाठी पीठ भिजवतांना त्यात थोडं दूध व बेसन किंवा गरम तेल. पुर्‍या खुसखुशीत बनतील.

७) मसालेदार पदार्थांची रस्सा घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा.

८) डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे मिक्सर मधून बारीक करून टाका.

९) दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी टाका. दूध खाली लागणार नाही.

१०) हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईत बनवा. त्यात लोहाचे प्रमाण वाढते.

११) जर भाज्या, कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका. यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते, हे पाणी भाजीत किंवा कणीक भिजवतांना ही वापरता येते. भाज्या, कडधान्य उकळून न घेता हे वाफेवर ही शिजवू शकता.

१२) आपण भाज्या किंवा फळे ४-५ तास आधीपासून कापून ठेवू नये. यात असलेले व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन नष्ट होतात. म्हणून भाजी करतेवेळी आणि फळे खाणार असाल तेव्हाच कापावीत. वेळेच अभाव असल्यास फळे, भाज्या आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा.

१३) पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सर मधुन बारीक करून घ्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा. खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा. यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावला छान वास लागतो. स्वादही वाढतो.

१४) आपण ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही. गोल थापली जात नाही. या वेळी पीठ भिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा. यामुळे भाकरी मोडत नाही.

१६) वरणासाठी डाळ शिजवताना त्यात थोडी चिंच टाकावी म्हणजे वरण रुचकर होते आणि चविष्ट बनते.

१७) कोणत्याही गोड पदार्थात चिमुट भर मीठ घातल्यास छान चव लागते.

१८) रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं किसणीवर किसावीत. छान रस निघतो.

१९) पोहे बनवल्यावर त्यावर खोबरं किस रंगीत करून वापरावा. म्हणजे दिसायला सुंदर दिसते व चवीलाही छान.

२०) काजू बदाम सुकामेवा डब्ब्यात भरणीत भरून ठेवता ? त्याला कीड लागण्याची शक्यता असते म्हणून त्यात २-३ लवंग टाकून ठेवा.

२१) कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालविण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या मिठ लावून ठेवा व काहीवेळाने धुवून त्याची भाजी करा.

२२) शिरा बनवताना रवा थोडा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा किस घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा.जास्त स्वादिष्ट होतो.

२३) ब्रेड उरली असेल तर ब्रेडचे तुकडे तुपात फ्राय करावे नंतर साखरेच्या पाकात विलायची आणि सुकामेवा टाकावा त्यात हे तुकडे टाकावे स्वादिष्ट लागतात.

२४) रात्री पोळ्या उरल्या तर पोळ्यांचा जाडसर भुगा करावा व पोह्याप्रमाणे फोडणी देऊन पोळ्यांचा चिवडा बनवावा हा चिवडा लहान-मोठ्या सर्वांना आवडतो.

२५) धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा. त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात.