होळीच्या रंगात रंगले बुलडाणा शहर

Holi in Buldhana

बुलडाणा शहर व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात होळी व धूलिवंदनाचा सण आज साजरा करण्यात आला. यावेळी अनेक ठिकाणी पारंपरिकरीत्या होळी व धुळवड साजरी करण्यात आली. बुलडाणा शहर आणि ग्रामीण भागात देखील पारंपरिकरीत्या गुरुवारी होळीचे दहन करण्यात आले.

सर्वप्रथम शहर आणि परिसरात काल ठिकठिकाणी होळी पेटवण्यात आली. यावेळी सुवासिनींनी होळीची पूजा केली. शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली. आज होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड. आज धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली. यामध्ये तरुणाईचा पुढाकार होता. शहरालगतचे हॉटेल, रिसॉर्टमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शिवाय शहराबाहेरील अनेक शेत-मळ्यात अनेकांनी मनसोक्त होळी खेळून आनंद द्विगुणित केला. धुळवड असल्याने अर्थातच व्यापारी प्रतिष्ठाने बंद असलेलीच दिसून येत होती. तर चौकाचौकात तरुणाई आपल्या मित्र आणि आप्त जणांसह होळीचा आनंद घेतांना दिसून येत होते. दिवस मावळतीकडे झुकलेला असतांना सुद्धा अनेक ठिकाणी धुळवड संपलेली नव्हती.

रंगांची उधळण – कविता होळीची

kavi in buldana

“रंगांची उधळण”

सप्तरंगातुन उधळून आली,
आनंदाची होळी.

मिळूनी सर्वानी खाऊया,
आज पुरणाची पोळी.
भांडण-तंटा, रुसवे-फुगवे,
मारा यांना गोळी.
नको नाही म्हणता म्हणता,
भिजली साडी अनं चोळी.

लाल-गुलाबी, निळा-जांभळा,
घेऊनिया रंग.
लहान-मोठे, सगे-सोयरे,
या माझ्या संग.
पिचकारीत रंग घेऊनी,
राधा ही आली.
कान्हाला या साद घालुनी,
रंग लाविला गाली.
गोकुळात या राधा-गवळणी,
झाल्या हो दंग. लहान-मोठे, सगे-सोयरे,
या माझ्या संग… या माझ्या संग…..

सौ. अनिता भागवत येवले
बुलडाणा

चला घरीच नैसर्गिक रंग बनवूया !

holi festival in Buldana

होळी हा रंगाचा उत्सव म्हणून साजरा केल्या जातो. सर्वत्र लहान मोठे रंगाची उधळण करीत असताना दिसतात. आधी सर्वत्र नैसर्गिक रंगाची होळी खेळल्या जायची परंतु आता सर्वत्र रासायनिक रंगाचा वापर होताना दिसून येतो. हे रंग आपल्या शरीरास हानिकारक असतात. अनेक त्वचेचे रोग, विकार, डोळ्यात जळजळ अशा समस्या उदभवताना दिसून येतात. कधी कधी सामान्य आणि काही कालावधीसाठी असणाऱ्या ह्या समस्या कायमस्वरूपी होऊ शकतात. त्यामुळे रंग खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगास प्राधान्य दिल्यास हे आपण टाळू शकतो. हे रंग घरच्या घरी कसे बनवता येतील हे आम्ही आपणांस सांगणार आहोत.

शक्यतो कोरडा रंग वापरल्यास उत्तम ! तो लगेच निघतो आणि त्वचेत खोलवर जात नाही त्यामुळे त्वचाविकार होण्याची समस्या खूप कमी होते. यासाठी गुलाल हा उत्तम पर्याय आहे. आपल्या रोजच्या वापरातील अन्न पदार्थांनी आणि फुलांनी तयार करा नैसर्गिक रंग. आणि आनंद घ्या या रंगमय होळीचा.

१) पिवळा रंग– झेंडूची फुलं किमान सहा ते सात तास गरम पाण्यात भिजवून ठेवली तर आपणांस पिवळा रंग मिळतो . गरम पाण्यात झेंडूची फुल भिजवून ठेवा आणि नंतर हे पाणी गाळून घ्या.तसेच हळद, कस्तुरी हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. कोरडा रंग म्हणून त्याची एकमेकांवर उधळण करता येते.कोरडा पिवळा रंग मिळवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. ‘हळद’ मुळातच औषधी गुणधर्माची असल्याने तुमच्या त्वचेचे रक्षणच होइल. हळदीच्या दुप्पट बेसनाचे पीठ घ्या. बेसनाऐवजी तुम्ही मुलतानी मातीसुद्धा वापरू शकता.

२) हिरवा रंग – हिरवा रंग मिळवण्यासाठी तुम्ही पालक, कोथिंबिर यासारख्या पालेभाज्या किंवा कडुलिंबाची पाने, हीनाची पावडर वापर करू शकता. पालकाची प्युरी करुन किंवा कडुलिंबाचा पाला वाटुन तो गाळून घ्या व हे पाणी मुलांच्या पिचकारीमध्ये भरुन द्या. कडुलिंब जंतूनाशक असल्याने या पाण्याचा फायदाच होईल. हीनाची सुकी पावडर किंवा पाण्यात टाकूनही तुम्ही वापरू शकता.

३) गुलाबी रंग – खाण्याचे बिट हे गुलाबी रंग मिळवण्यासाठी तुम्ही ‘वापर करु शकता. किसलेलं बीट पाण्यात टाकुन हे पाणी वापरल्यास कोणताही अपाय नाही.

४) नारंगी रंग – नारंगी रंग मिळवण्यासाठी डाळिंबाची साल गरम पाण्यात सात – आठ तास भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी तुम्ही गाळून वापरू शकता.
नारंगी रंग मिळवण्यासाठी तुम्ही केशराचा देखील वापर करू शकता. केशराच्या काही काड्या पाण्यात भिजवून ठेवा. काही तासांनंतर हे मिश्रण वाटून घ्या व आवश्यकतेनुसार पाण्यात मिसळून वापरा. आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्ण ‘पळसा’च्या फुलांनी होळी खेळत असत. त्यामुळे नारंगी रंग हा होळीतील एक प्रमुख रंग आहे. नारंगी रंग मिळवण्यासाठी तुम्ही पळसाची फुलं रात्रभर पाण्यात भिजवून किंवा पळसाची फुलं गरम पाण्यात उकळूनही ते पाणी वापरू शकता.

५) काळा रंग – नैसर्गिक पद्धतीने काळा रंग बनवायचा असल्यास आवळ्याची पुड सात – आठ तास लोखंडी भांड्यात किंवा कढईत भिजवून ठेवल्यास तुम्हाला काळा रंग मिळू शकतो. काळ्या द्राक्षांचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी गाळून वापरा त्यामुळे सुद्धा काळा रंग मिळू शकतो. या शिवाय घरात चूल असल्यास मिळत असलेले कोळसे बारीक कुटून घ्या. त्यापासून शुद्ध आणि नैसर्गिक कोरडा काळा मिळू शकतो.

६) लाल रंग – लाल रंग बनव्यासाठी रक्तचंदन चांगला पर्याय असू शकतो. रक्तचंदन आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. त्याचप्रमाणे हा रंग ‘गुलाल’ला अगदी सुरक्षित पर्याय आहे. जास्वंदाची फुलं सावलीत सुकवा आणि त्याची पावडर करून पिठात मिसळून वापरा. टोमॅटो व गाजराचा रस पाण्यात मिसळा व ते पाणी वापरा.