वाईट विचार प्रवृत्तीचा नाश करणारी होळी

festival buldana

होळी हा संपूर्ण अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तर काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमा या दिवशी होळी साजरी केली जाते. “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या नावाने होळी साजरी केली जाते . महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करण्यासाठी होळी साजरी केली जाते.

फार पूर्वी राक्षसकुळात राजा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो फार क्रूर राजा होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवी व देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याने स्वतःलाच परमेश्वर म्हटले. व स्वतःचेच जागो जागी मंदिर उभारले.

राजा हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा सुंदर व गुणी मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून भगवान नारायणजींचा परमभक्त होता. प्रल्हाद हा दिवस-रात्र भगवान नारायणजींचा नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच राजा हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रल्हादला विविध दंड दिले. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेण्याचे ठरवले. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. कारण तिला तसा वरदान प्राप्त होता. म्हणून हिरण्यकश्यपूने पौर्णिमेला (आजच्याच तिथीला) लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु प्रल्हादाच्या भक्ति व साधनेमुळे उलटेच घडले. होलिका क्रूर राक्षसीण जळून खाक झाली. आणि नारायण भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. भक्त प्रल्हाद च्या भक्तीने प्रसन्न होऊन नारायणजी खांबातून नृसिंह रूपाने प्रकट झाले क्रूर राजा हिरण्यकश्यपूचा वध केला. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. एका ठिकाणी मध्यभागी खड्डा केला जातो त्यात सर्व प्रथम एरडांची फांदी लावतात, बाजूने जमवलेल्या गोव-या लावतात व त्यानंतर उभी लाकडे लावतात. अशी सुंदर होळी तयार करतात, बाजूने छान रांगोळी काढतात. संध्याकाळपर्यंत होळी छानशी रचून तयार करतात. साधारण सात ते आठ वाजता होळी पेटवली जाते. बायका पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन येतात. होळीची मनोभावे पूजा केली जाते. नैवेद्य दाखवून होळीला प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळही अर्पण केले जाते किंवा खोब-याच्या वाटया भाजून प्रसाद म्हणून होळीचे पूजन केले जाते.

होळी साजरे करण्यामागचा थोडक्यात उद्देश आहे की होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट रितीने झाला त्यामुळे वाईट आपल्या मनातील वाईट आचार-विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाऊ शकते.